sugar factories loss
sugar factories loss  
मुख्य बातम्या

कारखान्यांचा संचित तोटा अडीच हजार कोटींवर

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्याच्या सहकारात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचा संचित तोटा आता अडीच हजार कोटींच्या पुढे गेला आहे. साखर कारखानदारीतून राज्यात ३० हजार कोटींची उलाढाल होते. मात्र, कृषीआधारित ग्रामीण उद्योगाला बळकट करण्यासाठी सध्या सरकारकडे कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी धोरणात्मक चौकट किंवा यंत्रणा नाही. त्यामुळे काही साखर कारखाने तोट्यात, तर काही नफ्यात दिसतात. साखर कारखान्यांचे तोटे वेळीच नियंत्रणात आणले न गेल्याने अनेक कारखान्यांचे यापूर्वीच दिवाळे वाजले. असे कारखाने खासगी संस्थांना विकले गेले. मात्र, याच कारखान्यांचे खासगीकरण झाल्यानंतर काही ठिकाणी नफा झाल्याचे दिसून आलेले आहे. “राज्याच्या सहकारी कारखानदारीचे ताजे चित्र राज्य शासनासमोर ठेवण्यात आले आहे. त्यात ८९ सहकारी कारखान्यांचा संचित तोटा दोन हजार ५५७ कोटी रुपयांपर्यंत पोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. कारखान्यांमधील उधळपट्टी थांबवावी लागेल. तसेच, कारखान्यांच्याही समस्या विचारात घेत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी पालकत्वाची भूमिका घ्यावी लागेल. वेळीच मदत किंवा धोरणात्मक निर्णय घेतले गेल्यास कारखान्यांचे तोटे कमी होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. साखरेच्या दरात वाढ होऊन देखील सहकारी साखर कारखान्यांचे चालू तोटे १७७ कोटी रुपयांच्या घरात पोचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात, तसेच कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येते. “कारखान्यांच्या समस्या वेळीच समजावून घेतल्या जात नाही. महत्त्वाच्या निर्णयांसाठी ताटकळत ठेवले जाते. समस्या असूनदेखील काही कारखाने नफ्यात आहेत. त्यांचा चालू नफा १७० कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे शासनाचा पाठिंबा, साखरेला चांगला दर मिळत गेल्यास इतर कारखानेही नफ्यात येऊ शकतात,” असे कारखाना उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. संचित तोटा वाढलेल्या साखर कारखान्यांमध्ये अंबादेवी (अमरावती), अशोक (नगर), बाबूराव तनपुरे (नगर), छत्रपती (बीड), आदिवासी (नंदूरबार), जय भवानी (बीड), रामेश्वर (जालना), गंगापूर, शरद, संत एकनाथ (औरंगाबाद), मधुकर (जळगाव), कुंभीकासारी, भोगावती, उदयसिंहराव गायकवाड, अप्पासाहेब नलावडे, छत्रपती राजाराम, आजरा, (कोल्हापूर), वसंतदादा, माणगंगा (सांगली), भाऊराव चव्हाण (नांदेड), पूर्णा (हिंगोली), संत शिरोमणी (लातूर), राजगड, शंकरराव पाटील, भीमा-पाटस (पुणे), किसन वीर, बाळासाहेब देसाई, श्रीराम, खंडाळा, प्रतापगड (सातारा), छत्रपती (पुणे), बाबासाहेब आंबेडकर, बाणगंगा, विठ्ठल, वसंतराव काळे, भाऊसाहेब बिराजदार (उस्मानाबाद), मकाई, आदिनाथ, संत कुर्मदास, भीमाटाकळी, संत दामाजी, शंकरराव मोहिते, विठ्ठल, (सोलापूर) यांचा समावेश होतो. भांडवलपुरवठा, कर्जाचे पुनर्गठन गरजेचे साखरेचे कोसळलेले दर, निसर्गाची अवकृपा आणि त्यात पुन्हा सरकारी धोरणांचे वेळीच पाठबळ न मिळाल्याने कारखान्यांचे तोटे वाढलेले आहेत. केंद्राने जरी काही धोरणात्मक पावले टाकली असली, तरी तोट्यांमधून सुटका झालेली नाही. कारण, तोटे अगोदरच वाढलेले आहेत. आता कारखान्यांना वाचवायचे असल्यास तातडीने भांडवलपुरवठा, तसेच कर्जाचे पुनर्गठन अशा दोन पातळ्यांवर सरकारकडून मदत होण्याची आवश्यकता आहे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT