Strong return of rains in Khandesh
Strong return of rains in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून, मागील दोन दिवस अपवाद वगळता अनेक भागांत चांगला पाऊस झाला. काही मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंदही झाली आहे. यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.

मागील सात-आठ दिवसांपासून खानदेशात पावसाने दडी मारली होती. जळगाव जिल्ह्यात जळगाव, बोदवड, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, यावल, भुसावळ या भागात पावसाची प्रतीक्षा होती. मागील महिन्याच्या मध्यानंतरही १२ दिवस पावसाचा खंड होता. त्यात जळगाव, यावल, भुसावळ आदी भागांत सोयाबीन, ताग, उडीद, मूग, कापूस आदी पिके मोडण्याची वेळ आली होती.

दुबार पेरणीनंतर पुन्हा पावसाची प्रतीक्षा होती; परंतु शनिवारी (ता. ४) व रविवारी (ता. ५) जळगाव, भुसावळ, जामनेर, यावल, रावेर या पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागातही चांगला पाऊस झाला. चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातील काही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला.

पेरणी ८८ टक्‍क्‍यांपर्यंत; तर जळगाव जिल्ह्यात सुमारे ८७ टक्के, धुळ्यात ९० आणि नंदुरबारातही ८८ टक्‍क्‍यांपर्यंत पेरणी झाली. कोरडवाहू कापसाची लागवड अधिक झाली असून, ही लागवड खानदेशात मिळून सुमारे साडेआठ लाख हेक्‍टरपर्यंत पोचल्याचा अंदाज आहे. काही शेतकरी बाजरी, तागाची पेरणी करीत आहेत. जळगाव, अमळनेर, शहादा, तळोदा भागात काही शेतकऱ्यांनी रब्बीमधील आगाप कांदा, दादर ज्वारी पेरणीसाठी शेत नापेर ठेवले आहे.

सरासरीच्या २७ टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस खानदेशात अंदाजे सरासरीच्या २७ टक्के पाऊस झाला. धुळ्यात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे; तर नंदुरबारातही पाऊस चांगला झाला. जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्के पाऊस झाला आहे.

पाऊस कमी अधिक असला तरी सुरुवातीला पेरणी झालेली पिके आमच्या भागात चांगली आहेत. मागील दोन दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. - दिलीप पाटील, शेतकरी, चोपडा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT