कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर मंजूर
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर मंजूर 
मुख्य बातम्या

कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर मंजूर

टीम अॅग्रोवन

पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. नव्या कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी लवकरच शोध समितीची घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  भट्टाचार्य यांच्या कामाची पद्धत काही जणांना आवडत नव्हती. त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करून राज्यपालांकडे जाण्याची तयारी विद्यापीठातील एक गट करीत होता. तथापि, आपल्याला वादात नव्हे, तर कामात रस असल्याचे स्पष्ट करीत डॉ. भट्टाचार्य यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. डॉ. भट्टाचार्य यांनी एप्रिलमध्येच राजीनाम्याची तयारी केली होती. तथापि, कोकण कृषी विद्यापीठात महत्त्वाची संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे ते थांबले होते. एक जूनला त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवून पद सोडण्यासाठी तीन महिन्यांची नोटीस दिली होती.  ‘‘राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी दहा दिवस त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला नव्हता. मात्र, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी चर्चा करून राजीनामा मंजूर झाल्याचे कुलगुरूंना कळविण्यात यावे, अशी सूचना श्री. राव यांनी श्री. रेड्डी यांना केली. त्यानुसार ११ जून रोजी सचिवांनी एक पत्र काढून राजीनामा मंजूर केल्याचे डॉ. भट्टाचार्य यांना कळविले’’, अशी माहिती सूत्रांनी दिली.  राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार यांनादेखील डॉ. भट्टाचार्य यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे कळविण्यात आलेले आहे. ‘‘राज्यातील चार कृषी विद्यापीठांपैकी तीन कुलगुरू राज्याबाहेरील होते तर एक कुलगुरू अनिवासी भारतीय होता. त्यामुळे विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांमध्ये असंतोष खदखदतो आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. कुलगुरू निवडीत मराठी शास्त्रज्ञांवर अन्याय होत असल्याची उघड भूमिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेच्या दरम्यान घेण्यात आली. त्यातून काही जणांनी थेट राज्यपालांकडे देखील तक्रार केली होती. कुलगुरू निवडीसाठी वारंवार बदलले जात असलेले निकषदेखील संशयास्पद ठरत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT