देऊर, जि. धुळे: भाऊ बहिणीच्या रेशमी नात्याचा रक्षाबंधन सण अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. सध्या बाजारात रंगीबेरंगी राख्यांची रेलचेल आहे. मात्र याला अपवाद ठरवत परिसरातील उपलब्ध गिलके, लाल, पांढरी गुंज, रिठा, त्रिदेव आदी बियांपासून विघटनशील अर्थात पर्यावरणपुरक राख्या तयार केल्या आहेत. नांद्रे (ता.धुळे) येथील कृषिकन्या प्रांजली बोरसे यांनी हा उपक्रम राबविला आहे. या पर्यावरणपुरक राख्यांना राज्य, परराज्यातून मागणी आली आहे. ग्रामीण भागातील नागरिक आत्मनिर्भर झाले पाहिजे, याला चालना मिळावी यासाठी पुणे येथील अन्नदाता सहजीवन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत उत्पादनासाठी पर्यावरणपूरक राख्या तयार करून सुरूवात झाली आहे. या राख्या तयार करण्यासाठी नांद्रे गावातील वीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थी राख्या तयार करताना स्वकल्पकता वापरत आहेत. जीवन कौशल्याचे धडे कृतीतून घेत आहेत. आत्तापर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, हैद्राबाद. बंगळूरु येथे कुरिअरने राख्या पाठविल्या आहेत. २० जुलै पर्यंत राख्यांची मागणी नोंदवली गेली. आता उर्वरित राख्या स्थानिक बाजारपेठेत विक्री केल्या जाणार आहेत. राख्यांसाठी लागणाऱ्या बिया दोन वर्षांपासून संकलित केल्या. यामागे सृष्टी, व्यक्ती, शेती, माती, गाव, नगर ही नाती बळकट करण्याचा उद्देश आहे. यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्ष वेलींच्या रूपात बहीण भावाचे प्रेम वाढेल. आज संपूर्ण जग ज्या परिस्थितीचा अनुभव घेत आहे त्यातून धडा घेऊन सृष्टीशी स्नेहपूर्ण संबंध राखणारी जीवन शैली अंगीकारून या विचाराला बियांच्या राख्या वापरून कृतीची जोड दिली आहे.
प्रतिक्रिया ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेचे साधन म्हणून काम सुरू आहे. स्थानिक, हंगामी, शाश्वत उत्पादनाला महत्त्व देणाऱ्या उपक्रमाचा हा एक भाग आहे. पुणे येथे आठ स्टॉलवर या राख्या उपलब्ध आहेत - समाधी शेलार, अन्नदाता स्वयंसेविका, पुणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या पर्यावरण स्नेही जीवनशैली स्वीकाराची सुरूवात बियांच्या राख्यांपासून केली आहे. मातीतील झाडांची जोपासना करून त्यांचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होईल. - प्रांजली बोरसे, नांद्रे, ता. धुळे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.