नगर ः ऊसदराच्या अांदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची रुग्णालयात जाऊन खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
नगर ः उसाच्या दराबाबत आजीबात अवास्तव मागणी केली जात नाही. सरकार आणि कारखानदार मात्र ऊसदराचा प्रश्न जाणीवपूर्वक ताणून धरत आहेत. सहकारी साखर कारखाने खासगी मालमत्ता समजूनच काही नेते वागत आहेत. गोळीबार, गुंडागर्दी करूनच शेतकरी चळवळ मोडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला.
शेवगाव तालुक्यातील घोटण येथे मेळाव्यासाठी जाताना खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (ता. २६) सकाळी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की कोल्हापूर, सांगली भागांत साडेतेराच्या जवळपास साखर उतारा मिळतो आणि नगरसह अन्य भागात साडेनऊच्या पुढे उतारा का जात नाही याचा विचार केला पाहिजे. संपूर्ण राज्यात उसाला एकच दर मागण्यापेक्षा उताऱ्याची चोरी कशी थांबता येईल हे शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजे.
कारखानदार नियोजन करून उताऱ्याची चोरी करत आहेत. नगर जिल्ह्यामधील शेतकरी आमच्यासमोर उभा राहत नाही, आम्ही किंमत देत नाही असे कारखानदार म्हणतात. कारखानदार नेते शेतकऱ्यांच्या विरोधातच आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे, असा अारोप त्यांनी केला.
साखर कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ, वजन काट्यावर आणि साखरेची साठवण केली जाणाऱ्या गोडाऊनमध्ये ‘सीसीटीव्ही'' कॅमेरे बसवले पाहिजेत. उत्पादकांनी फुटेजची मागणी केली तर उपलब्ध झाले पाहिजे, अशी आम्ही मागणी केली आहे.
शेवगाव तालुक्यातील अांदोलनात गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले काम केले, त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करत आहोत, असे श्री. शेट्टी म्हणाले.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी सूकाणू समितीशी स्वाभिमानीचा फक्त कर्जमाफी एवढ्यापुरताच सबंध होता. त्यानंतर जर कोणी अन्य अांदोलनातबाबत बोलत असेल तर आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. राज्यात ऊसदराबाबत फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच काम करत आहे, असे स्पष्ट करत सूकाणू समितीत ‘मोठे’ नेते असल्याचा टोला त्यांनी मारला.
‘मुलांचे एसटी पास रोखू नका’
श्री. शेट्टी म्हणाले, की अांदोलनातून एसटीचे नुकसान झाले म्हणून घोटण, खानापूर भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना एसटी पास द्यायचे नाही अशी एसटी आगार प्रमुखांनी भूमिका घेतली ती योग्य नाही. एसटीवाल्यांनी वाकड्यात शिरू नये. पास तर रोखून बघा, बघू काय करायचे ते, असा इशारा त्यांनी दिला अाहे.