मॉन्सून आजपासून परतीच्या प्रवासावर
मॉन्सून आजपासून परतीच्या प्रवासावर 
मुख्य बातम्या

मॉन्सून आजपासून परतीच्या प्रवासावर

वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) वायव्य भारतातून माघारी परतण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण देशाला पाऊस देणारा मॉन्सून आजपासून (ता ६) परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. सर्वसाधारण वेळेपेक्षा काहीशा उशिराने संपूर्ण देशात पोहोचलेल्या मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्तही लांबला आहे.   मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. यापूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मॉन्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख १५ ऑक्टोबर आहे.   यंदाच्या आगमनाचा विचार करता नियमित दीर्घकालीन वेळेच्या दोन दिवस उशीराने मॉन्सून केरळमध्ये (३ जून) दाखल झाला. केरळात दाखल होताच, मॉन्सून एक्स्प्रेसचा प्रवास सुसाट गतीने सुरू झाला. अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत मॉन्सून दोनच दिवसांत महाराष्ट्रात (५ जून) पोहोचला. मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच (१० जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता.  जम्मू-काश्मीरसह देशाच्या उत्तर भारतात ३० जूनपर्यंत पोहोचणारा मॉन्सून यंदा १७ दिवस आधीच (१३ जून रोजी) या भागात पोहोचला. १९ जून रोजी राजधानी दिल्लीसह वायव्य भारत वगळता देशाच्या उर्वरित भागात मॉन्सूनने दाखल झाला.   पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मॉन्सूनच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने मॉन्सूनचा पुढील प्रवास थांबला. त्यानंतर तब्बल २३ दिवसांनी वाऱ्यांनी वायव्य भारतात प्रगती केली. सर्वसाधारण वेळेच्या ५ दिवस उशिराने (१३ जुलै) मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला होता. 

देशभरातील आगमनानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे. ऑक्टोबर महिना सुरू होऊनही मॉन्सून मघारी फिरलेला नाही. यापूर्वी २०१९ मध्ये मॉन्सून आतापर्यंतच्या सर्वांत उशिरा ९ ऑक्टोबर रोजी माघारी फिरला होता. त्यानंतर यंदा पुन्हा वायव्य भारतातून मॉन्सून परतण्यास उशीर झाला आहे. अरबी समुद्रात आलेले शाहीन चक्रीवादळ ओमानकडे गेल्यानंतर वायव्य भारताच्या काही भागातून मोसमी वारे माघारी फिरण्यासाठी अनुकूल हवामान झाले आहे. आज (ता. ६) मॉन्सून परतीच्या प्रवासावर निघणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT