पिंपळवाड परिसरात पुन्हा बिबट्या
पिंपळवाड परिसरात पुन्हा बिबट्या 
मुख्य बातम्या

पिंपळवाड परिसरात पुन्हा बिबट्या

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे, जि. जळगाव ः चार महिन्यांपूर्वी पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) परिसरात बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पुन्हा या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. दोन महिन्यांपासून या भागात त्याने तळ ठोकला असून, आतापर्यंत सहा वासरू व आठ बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. या घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आज या भागात पिंजरा लावला.

पिंपळवाड म्हाळसा परिसरात विजय देशमुख यांच्या शेतात चार महिन्यांपूर्वी नर जातीच्या बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले होते. त्यानंतर वडगाव लांबे परिसरातही आणखीन एक बिबट्या पकडला गेला होता. त्यानंतर पिंपळवाड म्हाळसा परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. मात्र, पुन्हा बिबट्याचे हल्ले सुरू झाले. दोन महिन्यांपासून या भागात बिबट्या असल्याचे वेळोवेळी घडलेल्या घटनांवरून निष्पन्न झाले आहे. वरखेडे परिसरात दीड वर्षापूर्वी नरभक्षक बिबट्याने सात जणांचा बळी घेतला होता. या भागात पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वन विभागाने  या भागात पिंजरा लावला. वन परिक्षेत्र अधिकारी संजय मोरे, प्रकाश देवरे, अजय महिरे, श्रीराम राजपूत आदींनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर आज पिंजरा ठेवला. 

बिबट्याचे हल्ले सुरूच  पिंपळवाड म्हाळसा शिवारात बिबट्याने भूषण पाटील यांची वासरी, ज्ञानेश्वर पाटील यांची एक बकरी, श्रावण माळी यांची वासरी, शोभाबाई माळी यांची वासरी, विजय देशमुख यांच्या तीन बकऱ्या, जगदीश शेवरे यांच्या दोन बकऱ्या व सेवानगर तांडा येथील विष्णू राठोड यांच्याही तीन वासरासंह अनेक गुरांचा बिबट्याने फडशा पाडला असून अजूनही त्याचे हल्ले सुरूचा आहेत. उपखेड शिवारातही बिबट्याचा वावर असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. उपखेड गावालगत जंगल परिसर असल्याने बिबट्याला राहण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. पिंपळवाड शिवारात जेरबंद केलेल्या बिबट्याला वन विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात दूर जंगलात सोडले होते. आता असलेला बिबट्या कधी जेरबंद होईल, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे. 

मजुरांमध्ये भीती गिरणा परिसरात सध्या शेतांमध्ये कांदा काढणीची कामे सुरू आहेत. त्यासाठी मजुरांना शेतांमध्ये जावे लागते. सध्या बिबट्याच्या भीतीमुळे मजुर शेतांमध्ये जाण्यासाठी घाबरतात. महिला मजुरांनी तर बिबट्याची प्रचंड धास्ती घेतली आहे. वरखेडे परिसरातील बिबट्याचे हल्ले आजही मजुरांच्या छातीत धडकी भरवतात. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT