लाखगंगा, जि. औरंगाबाद : येथे आयोजित ग्रामसभेत उपस्थित दूध उत्पादक शेतकरी.
लाखगंगा, जि. औरंगाबाद : येथे आयोजित ग्रामसभेत उपस्थित दूध उत्पादक शेतकरी. 
मुख्य बातम्या

ठरलं...दूध फुकट घालायचं ! लाखगंगा ग्रामसभेचा ठराव

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व विविध डेअरींना दूध घातल्यापेक्षा ते फुकटचं देण्याचा ठराव दूध उत्पादकांनी घेतला आहे. जिल्ह्यातील लाखगंगा (ता. वैजापूर) या दूध उत्पादकांच्या गावातील विशेष ग्रामसभेनं शनिवारी (ता. २१) हा ठराव घेतला. शासनाच्या धोरणाचा अहिंसात्मक मार्गाने निषेध नोंदविण्याची भूमिका येथील दूध उत्पादकांनी घेतली आहे. जोपर्यंत जाहीर केलेले दर मिळत नाहीत, तोपर्यंत दूध फूकट घालण्याचा हा ठराव वैजापूर तहसीलदारांना पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी अौरंगाबादसह नगर जिल्ह्यातील काही गावातील दूध उत्पादक उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या संपादरम्यान शासनाने मान्य केलेल्या मागण्यांमध्ये दुधाला सत्तावीस रुपये प्रतिलिटरचा दर देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु जाहीर केलेला दर उत्पादकाला मिळाला नाही. काही दिवस काही भागांत पंचवीस रुपये प्रतिलिटरपर्यंत गेलेला दूध दर दहा ते बारा रुपयांनी खाली घसरला. त्यामुळे उत्पादनाचे गणित कोलमडलेले दूध उत्पादक अडचणीत आले. लाखगंगा या जवळपास दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात ८० टक्‍के लोक दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात. घसरलेल्या दुधाच्या दरामुळे हे सर्व दूध उत्पादक अडचणीत आले होते. यावर काय निर्णय घ्यावा म्हणून चिंतन करीत असलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दुधाच्या घसरलेल्या दराविषयी चिंतन करून निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेला लाखगंगा येथील दूध उत्पादकांसह पंचक्रोशीतील वैजापूर, नगर जिल्ह्यातील राहता तालुक्‍यातील वीस ते पंचवीस गावांतील दूध उत्पादक, काही गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन यांची उपस्थिती होती. 

शेतकरी नेते डॉ. अजित नवले, धनंजय धोर्डे यांनीही या ग्रामसभेला विशेष उपस्थिती लावली.  संपूर्ण चर्चेअंती येत्या ३ मेपासून सर्व दूध उत्पादक सोसायट्या व डेअऱ्यांना फुकट दूध घालतील, असा ठराव घेण्यात आला. या ठरावाचे सूचक राजेंद्र तुरकने, तर अनुमोदक विलास मोरे होते. .... असे झाले ठराव...

  • पंचक्रोशीतील ग्रामसभांमधून ठरावासाठी करणार जागर
  • प्रसंगी विविध तहसील कार्यालयावर वाटणार मोफत दूध
  • शासनाने जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलिटरचा दर देण्याची मागणी
  • प्रतिक्रिया...  तीन मेपासून फुकट दूध घालण्याचा निर्णय घेतला आहे. तो तहसील कार्यालयाकडे पाठवू;  शिवाय विविध तहसील कार्यालयांवर मोफत दूधवाटपाचा कार्यक्रमही ठेवू. - दिगंबर तुरकने,  सरपंच, लाखगंगा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.  .... लाखगंगा येथील विशेष ग्रामसभेनं घेतलेला ठराव प्रत्येक दूध उत्पादक गावातील ग्रामसभांनी घ्यावी, यासाठी जागर केला जाईल. यामधून शासनाला आश्वासीत दूधदराबाबत जागे करण्याचा प्रयत्न केला जाईल. - धनंजय धोर्डे,  शेतकरी नेते, वैजापूर, जि. औरंगाबाद.  .... जाहीर केलेल्या दराच्या तुलनेत दहा रुपयांचा दरोडा उत्पादकांच्या दुधावर टाकला जातोय. लाखगंगेची ग्रामसभा म्हणजे शासनाच्या धोरणावर दूध उत्पादकांनी व्यक्‍त केलेला संताप आहे. नगर जिल्ह्यात याविषयी जागर व ठिकठिकाणी मोफत दूध वाटपाचे कार्यक्रम घेतले जातील. पैसे नको म्हणून प्रतिज्ञापत्रही लिहून दिले जातील. किमान शासनानं आता तरी जागं व्हावं.  - डॉ. अजित नवले राज्य सरचिटणीस किसान सभा महाराष्ट्र .......... दूध दराचा मुद्‌दा औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्टॅंडींग कमिटीच्या मिटिंगमध्ये मांडणार. लाखगंगा येथील ग्रामसभेप्रमाणेच दूध उत्पादकांच्या हिताचा ठराव जिल्हा परिषदेनेही घेण्यासाठी आपण आग्रही राहू.  - पंकज ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य, औरंगाबाद. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT