गुऱ्हाळघर
गुऱ्हाळघर  
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात गूळ उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार

Raj Chougule

कोल्हापूर ः पुराचा फटका आता गूळ हंगामाला बसण्यास प्रारंभ झाला आहे. पुरामुळे यंदा गुळाची आवक चाळीस टक्क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. अजूनही बहुतांशी उसाच्या शेतात पाणी असल्याने पूर्ण क्षमतेने गूळ हंगाम दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. पहिल्या टप्प्यात तरी गुळाची आवक मंदावेल आणि गुळाचे दर प्रतिक्विंटलला ४००० ते ४५०० रुपये यादरम्यान राहण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला. गुजरातचे व्यापारी पितृपंधरवड्यानंतर खरेदी सुरू करण्याची शक्‍यता असल्याने गुळास पहिला टप्प्यात चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुळासाठीचा ऊस प्रामुख्याने करवीर तालुक्‍यात तयार होतो. पंचगंगेसह अन्य नद्यांच्या काठावर असणाऱ्या उसापासून तयार होणाऱ्या गुळाची चव ही अवीट असते. तालुक्‍यातील दहा ते बारा गावे यासाठी अग्रेसर असतात. व्यापारी भाषेत या भागात तयार होणाऱ्या गुळाला क्रीम गूळ असे संबोधले जाते. पण, ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे नेमका हाच ऊस पाण्याखाली गेला. नदीकाठी असल्याने अनेक उसाच्या प्लॉटमध्ये पाच ते दहा फूट पाणी साचले. यामुळे एक कांडीही ऊस शेतकऱ्यांच्या हाताला लागण्याची शक्‍यता धूसर बनली. याचा फटका आता दर्जेदार गुळाला बसू शकतो. नदीकाठची शेती अनेक दिवस पाण्याखाली असल्याने त्या भागातील ऊस गुऱ्हाळासाठी येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटू शकते. महापुरानंतर परत महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा पाणी आले. यामुळे ऊस वाचण्याची उरली सुरली आशाही संपुष्टात आल्याने यंदा नदीकाठावर असणाऱ्या उसाचे गुऱ्हाळ जवळ जवळ नसल्याचीच परिस्थिती आहे. ज्या उसात एक-दोन फूट पाणी आहे. तो ऊस मात्र गुऱ्हाळासाठी काही प्रमाणात येऊ शकेल. पण या उसात रस किती आहे, यावरच त्यापासून गूळ किती तयार होईल. याचा अंदाज लागणार आहे.  उसाची शोधाशोध सुरु अपवाद वगळता गूळ पट्ट्यातील गुऱ्हाळघरे शांतच आहेत. ऊस तोडणीसाठी तयार नसल्याने शेतकरीही हतबल आहेत. यामुळे अंदाज घेऊन गुऱ्हाळाची तयारी गुऱ्हाळमालकांकडून होत आहे. जो ऊस कमी प्रमाणात बुडाला आहे, अथवा पुराचा फटका न बसलेला ऊस शोधण्याचे काम गुऱ्हाळमालकांकडून सुरू आहे. उसाची जुळवाजुळव झाल्यानंतरच मजुरांना बोलावणार असल्याचे गुऱ्हाळमालकांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांकडून थंडा प्रतिसाद सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने गुजराथी व्यापारी या काळात शक्‍यतो गूळ खरेदी करायचे टाळतात. यामुळे शीतगृहातल्या गुळाला अद्याप मागणी नाही. कोल्हापूरचा गूळ अद्याप तयार नसला तरी, सांगली व कर्नाटकातून कोल्हापुरातील व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात गूळ येत आहे. तो स्थानिक ठिकाणी विकला जात आहे. पितृपंधरवडा झाल्यानंतर व्यापारी खरेदी सुरू करतील. या वेळी कोल्हापुरात तयार होणाऱ्या गुळास चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा गूळ उद्योगातून व्यक्त होत आहे 

प्रतिक्रिया  यंदा कोल्हापुरी गुळाला चांगला दर मिळेल अशी शक्‍यता आहे. महापुरामुळे आवक रोडावण्याची शक्‍यता असल्याने कोल्हापुरी गुळाचे दर पहिल्या काही महिन्यांमध्ये तरी निश्‍चित चांगले राहतील. - निमेष वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT