वादळी पावसाने पिकांचे नुकसान
वादळी पावसाने पिकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

वादळी पावसाने पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने रब्बी गहू, कांदा, हरभरा, उन्हाळी मका, टोमॅटो, काकडी, भाजीपाला पिके, आंबा, कलिंगड, डाळिंब, सीताफळ, केळीसह फळबागांना दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक, अौरंगाबाद, बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार वारे, गारपिटीसह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, विजा आणि झाडपडीच्या घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे.  सातारा जिल्ह्याला मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटांसह पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यात मणदुरे (ता. पाटण) येथे घराचे छप्पर अंगावर पडून दीपक पांडुरंग जाधव (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या असून, कऱ्हाड व पाटण तालुक्यातील आंबा, टोमॅटो, काकडी, वांगी, कलिंगड या पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. कऱ्हाडमधील कोपर्डे हवेली परिसरात गारा पडल्या. मसूर परिसरात आंब्यांच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला होता. खटाव तालुक्‍यातील बुध, राजापूर, औंधसह परिसरात मंगळवारी दुपारी व सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. 

पुणे जिल्ह्यात मंगळवारी  बारामती, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर, खेड तालुक्यांत तुरळक गारपिटीसह वादळी पावसाने दणका दिला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने विविध भागांत गहू, कांद्यासह भाजीपाला आणि केळी, डाळिंब, चिकू, सीताफळ, आंबा पिकांचे नुकसान झाले. दहीवडी (ता. शिरूर) येथे वीज कोसळून आठ मेंढ्या, एका बैलाचा मृत्यू झाला. तर इंदापुरात अंगावर झाड पडल्याने एक जण मृत्युमुखी पडला. 

सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूससह शिराळा तालुक्‍यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कोकरूड, बिळाशी, शेडगेवाडी, चरण, येळापूर, मेणी, गुढे पाचगणीसह परिसरात विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. नव्याने केलेल्या मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खिरवडे येथील चंद्रकांत ज्ञानदेव पवार हे सावताच्या डोंगरात जनावरे चारायला घेऊन गेले असता, त्यांच्या देशी गाय व रेडकावर वीज पडून मृत्यू झाला असून, यात त्यांचे १ लाखाचे नुकसान झाले आहे. 

नगर जिल्ह्यातील संगमनेर, कर्जत, पारनेर तालुक्‍यांत गारपीट, तर नगर, अकोले तालुक्‍यांत जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे फळबागांसह कांदा व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. नगर-जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील येथे काढून ठेवलेला कांदा व आंब्याचे मोठे नुकसान झाले. भंडारदरा परिसरात गहू व पेंढा यांचे नुकसान झाले. पांजरे येथे वीज पडून शांताबाई भोरू उघडे (वय ४०) व तुकाराम उघडे (वय ४५) गंभीर जखमी झाले. कर्जत तालुक्‍यातील राशीनसह परिसरात संततधार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. आंबा, चिकूच्या बागा आणि हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले. पारनेर तालुक्‍यातील कान्हुर पठार, काकणेवाडी, पिंपरी पठार येथे पाऊस झाला. गारगुंडी येथे तब्बल अर्धा तास गारांच्या पावसाने टॉमेटो, आंबा, भाजीपालासह अन्य पिकांना दणका दिला. 

नाशिक शहरासह, सटाणा, निफाड भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार अाहे. निफाड तालुक्‍यातील खेरवाडी, चांदोरी, सोनगाव, भेंडाळी, सायखेडा परिसरात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. द्राक्षबागांची कामे, गहू, उन्हाळी कांदा काढणीची कामे पावसामुळे खोळंबली. 

मराठवाड्यात बीड, लातूर, उस्मानाबादसह जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत वादळासह हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यांतर्गत कडा परिसरात दुपारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कडा जवळील देवी निमगाव येथे वीज पडून मंदा राजेंद्र राऊत या महिलेचा मृत्यू झाला. केरूळ येथे काही घरांवरील पत्रे उडून गेले. या घटनेत पाच जण जखमी झाले. पाटोदा परिसरात पावसामुळे मिरची, आंबा, टरबूज या पिकांना फटका बसला. उस्मानाबाद, लातूर शहरांतही सायंकाळी वादळी पाऊस झाला. जालना जिल्ह्यात रोहिलागड, किनगाव (ता. अंबड) परिसरात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरासह चित्तेपिंपळगाव, निपाणी, झाल्टा पाचोड, आडगाव व वैजापूर शहरांसह तालुक्‍यातील पावसाने हजेरी लावली. 

सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर बहुतेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा कहर केला. पंढरपूर, माढा, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, माळशिरस या तालुक्‍यांत पावसाने फळबागांचे नुकसान केलेच. वादळी वाऱ्याच्या या फटक्‍यात बैल, म्हैस आणि गाईसह पाच जनावरेही दगावली. दुपारी साडेचार ते रात्री नऊपर्यंत विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सतत सुरू होता.

धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांत ढगाळ हवामान, उकाड्यामुळे पिकांना फटका बसला अाहे. उन्हाचा चटका वाढल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांनी कामाच्या वेळा बदलल्या आहेत. वेलवर्गीय कलिंगड, कारल्यासह, केळीच्या बागांवर अचानक वाढलेल्या उन्हामुळे ‘सन स्ट्रोक''ची समस्या वाढली आहे. उन्हामुळे दूध उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वादळाने नुकसान... 

  • कोकणासह मराठवाड्यात आंब्याचे नुकसान
  • संगमनेर कारखान्याला ३० कोटींना झटका
  • विजा, झाडपडीमुळे जीवितहानी
  • अनेक भागात गारपिटीने नुकसान वाढले
  • वीजपुरवठा खंडित; वाहतूक काही काळ ठप्प
  •   या पिकांचे नुकसान 

  •  लेट रब्बी : गहू, हरभरा कांदा
  •  उन्हाळी पिके : मका, टोमॅटो, काकडी भाजीपाला आदी
  •  फळे : आंबा, काजू, केळी, कलिंगड, डाळिंब, सीताफळ अादी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT