सोलापूर येथे द्राक्ष - डाळिंब प्रदर्शनाचे उदघाटन
सोलापूर येथे द्राक्ष - डाळिंब प्रदर्शनाचे उदघाटन 
मुख्य बातम्या

द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात दिमाखदार उद्‌घाटन

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने सोलापुरात भरवण्यात आलेल्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे गुरुवारी (ता. ४) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते दिमाखात उद्‌घाटन झाले. पहिल्याच दिवशी सोलापूरसह नजीकच्या जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. द्राक्षाच्या आधुनिक पद्धतीने बांधलेल्या कलम काड्या, द्राक्ष-डाळिंबाची नवीन वाणे, डाळिंब प्रक्रिया उद्योगातील संधी या अनुषंगाने नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासह ट्रॅक्‍टर, ब्लोअरसह शेतीतील उपयुक्त अवजारांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.

सिव्हिल चौकातील पोलिस हेडक्वार्टरसमोरील ॲचिव्हर्स मल्टिपर्पज हॉलमध्ये प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करंडे, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. टी. मेश्राम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

प्रदर्शनाचे दुपारी दोन वाजता उद्घाटन होते, पण सकाळपासूनच शेतकरी प्रदर्शनस्थळी येत होते. विविध स्टॉलवर शेतकरी आवर्जून थांबून माहिती घेत होते. द्राक्षाची विविध वाण विशेषतः कलमी वाण, राष्ट्रीय डाळिंब केंद्राने प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेला डाळिंबाचा ज्यूस, वाइन, तेल आदींसह औषधी उपयोगांसाठी तयार केलेली उत्पादने शेतकऱ्यांची खास आकर्षणे ठरली.

त्याशिवाय कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेले डाळिंबाचे रेडी टू सर्व्ह उत्पादन, विविध अवजारे, उपकरणे, इन्फास्ट्रक्‍चर (वायर आणि अँगल), टिश्‍युकल्चर, इक्विपमेंट, ब्लोअर, पॉवर टिलर, ट्रॅक्‍टर, शेततळे, शेडनेट व हेल ग्रीन नेट, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‌स, बायोफर्टिलायझर आदी विविध स्टॉलवरही शेतकरी माहिती घेत होते, आपल्या शंका विचारत होते. दिवसभर शेतकऱ्यांची रीघ प्रदर्शनस्थळी सुरूच होती. सोलापूरसह नजीकच्या उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर, उमरगा भागातूनही काही शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते.

‘चला, मिळून करूया संपन्नतेच्या प्रवासास सुरवात’, हे ब्रीदवाक्‍य घेऊन ‘सकाळ-ॲग्रोवन'ने हा उपक्रम आयोजिला आहे. सोलापुरात सलग तिसऱ्या वर्षी हे प्रदर्शन भरते आहे. शुक्रवार (ता. ५) आणि शनिवार (ता. ६) असे दोन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन खुले असेल. श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुदर्शन सुतार यांनी आभार मानले.

तज्ज्ञांची आज, उद्या चर्चासत्रे शेतकऱ्यांना नवीन ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी तज्ज्ञांच्या चर्चासत्रांची मेजवानी आयोजित केली आहे. शुक्रवारी (ता. ५) दुपारी १२ वाजता संगमनेरचे डाळिंब अभ्यासक, विषयतज्ज्ञ बाबासाहेब गोरे हे ‘शाश्‍वत डाळिंब शेती तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात तीन वाजता ‘ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे द्राक्ष व्यवस्थापन’ या विषयावर प्रयोगशील शेतकरी मारुती चव्हाण (पलूस) अनुभव सांगतील.

उद्या शनिवारी (ता. ६) दुपारी १२ वाजता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. एस. डी. रामटेके ‘द्राक्षातील सुधारित तंत्रज्ञान व संजीवकांचा वापर' यावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात तीन वाजता ‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व गटशेती’वर प्रयोगशील शेतकरी अंकुश पडवळे बोलतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

SCROLL FOR NEXT