Grants for drones to agricultural graduates
Grants for drones to agricultural graduates 
मुख्य बातम्या

कृषी पदवीधारकांना ड्रोनसाठी अनुदान

टीम अॅग्रोवन

पुणे ः केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून कृषी पदवीधारकांना ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) ड्रोनसाठी साडेसात लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

राज्यातील शेतकरी पीक संरक्षणासाठी सध्या कीडनाशकांच्या फवारणी करण्यासाठी पाठीवरचे पंप, एसटीपी पंप, ट्रॅक्टरचलित पंप तसेच अतिउच्च क्षमतेचे विदेशी (इलेक्ट्रोस्टॅटिक ब्लोअर) पंप वापरतात.मात्र सध्याच्या तंत्रज्ञानाला काही मर्यादा आहेत. फवारणीसाठी मजुरांचा वापर करताना विषबाधेचे प्रकारही होतात.

त्यामुळे ड्रोनद्वारे कीडनाशकांच्या फवारणीचा पर्याय काही पिकांसाठी उपयुक्त ठरू शकतो, अशी शिफारस केंद्राकडे काही संशोधन संस्थांमधून गेली होती. ड्रोनद्वारे यापूर्वी देशाच्या विविध भागांत खासगी व सरकारी संशोधन संस्थांमार्फत गेल्या तीन वर्षांपासून चाचण्या सुरू होत्या. या चाचण्यांचे निष्कर्ष पाहून ड्रोनसाठी थेट अनुदान देण्याचा केंद्राने निर्णय घेतला व त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियानातील निधी वापरास मान्यता देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोनच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा होत असलेला प्रयत्न हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे कृषी पदवीधारकांना पाच लाखांपर्यंत, तर केवळ दहावी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला आता चार लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील अवजारे विभागाचे उपसंचालक विष्णू साळवे किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे देखील संपर्क साधता येईल, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

भविष्यातील आधुनिक शेतीत ड्रोनचा वापर ही अपरिहार्य बाब असेल. केंद्राने ड्रोनच्या अनुदान योजनेला मान्यता दिल्याने आता शेतकरी उत्पादक संस्था व अवजारे सेवा सुविधा केंद्रांना अर्थसाह्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी आयुक्तालयाने अनुदानासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नव उद्योजक, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक संस्थांनी या संधीचा लाभ घ्यायला हवा. - दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग

 ...असे असेल ड्रोन अनुदान धोरण

  • ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके कोण घेऊ शकते? ः कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी उत्पादन संस्था व कृषी विद्यापीठे
  • विद्यापीठे व सरकारी संस्थांना किती अनुदान मिळेल? ः ड्रोन खरेदीच्या १०० टक्के म्हणजे १० लाखांपर्यंत.
  • शेतकरी उत्पादन संस्थांना किती अनुदान मिळेल? ः  ड्रोन खरेदीच्या ७५ टक्के म्हणजे ७.५० लाखांपर्यंत.
  • संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास किती अर्थसाह्य मिळेल? ः प्रतिहेक्टरी ६ हजार रुपयांपर्यंत.
  • संस्थांनी ड्रोन प्रात्यक्षिके राबविल्यास किती अर्थसाह्य मिळेल? ः प्रतिहेक्टरी ३ हजार रुपयांपर्यंत.
  • अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदीसाठी किती अनुदान मिळेल? ः ड्रोन किमतीच्या ४० टक्के म्हणजे ४  लाखांपर्यंत.
  • कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास किती अनुदान मिळेल? ः ड्रोन किमतीच्या ५० टक्के म्हणजे ५ लाखांपर्यंत.
  • ग्रामीण नव उद्योजकाला किती अनुदान मिळेल? ः चार लाखांपर्यंत. मात्र तो दहावी उत्तीर्ण, तसेच मान्यताप्राप्त रिमोट ट्रेनिंग संस्थेकडून (दूरस्थ प्रशिक्षण संस्था) प्रशिक्षित असावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

    Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

    Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

    Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

    Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

    SCROLL FOR NEXT