Father Herman Bakhar, a supporter of the watershed movement, dies
Father Herman Bakhar, a supporter of the watershed movement, dies 
मुख्य बातम्या

पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर यांचे निधन

टीम अॅग्रोवन

नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य वेचत ‘इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून समृद्धी यावी यासाठी अखंड काम करणारे पाणलोट विकास चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर (वय ९७) यांचे स्वित्झर्लंड येथे मंगळवारी (ता. १४) निधन झाले. महाराष्ट्रात त्यांनी तब्बल साठ वर्षे शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम केले.

स्वित्झर्लंडमधील असलेले फादर हर्मन बाखर १९४८ मध्ये पुण्यात आले. धार्मिक संस्थात काम करण्यासाठी ते भारतात आल्यावर व प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची ज्ञानमाता विद्यालयाच्या वसतिगृहात नियुक्ती झाली. त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले. केंदळ, हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथे काम करत असताना तेथे असलेली ४० एकर पडीक जमीन त्यांनी विकसित केली. त्या वेळी त्यांना शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळले. त्यानंतर त्यांनी दुष्काळी भागात काम करण्याचा निर्णय घेतला. १९६६ मध्ये श्रीरामपुरात अहमदनगर सोशल सेंटर संस्थेची स्थापना केली. पुढे या संस्थेचे कार्यालय नगरला हलवले. संस्था आणि शासनाच्या मदतीने नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर अकोले तालुक्यांत पाणलोटासह शेतीविषयक कामे केले. १३ वर्षे काम केल्यावर १९८२ मध्ये जर्मन सरकारच्या मदतीने निधी उभा करत नाबार्ड मार्फत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून राज्यभर पाणलोट विकासाची कामे केली. 

नगर, पुणे, बीड, नाशिकसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत त्यांच्या पुढाकाराने मोठी कामे झाली आहेत. श्रमदान चळवळही महाराष्ट्रात त्यांनीच उभी केली. ‘माथा ते पायथा’ संकल्पना त्यांचीच होती. फादर हर्मन बाखर सुमारे साठ वर्षे भारतात राहिले. त्यातील बहुतांश काळ त्यांनी नगर जिल्ह्यात, दरेवाडी (ता. संगमनेर) येथील प्रशिक्षण केंद्रात असे. महाराष्ट्र शासनाने त्यांना १९९४ मध्ये कृषिभूषण, १९९६ मध्ये वनश्री आणि २०१० मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न या पुरस्काराने गौरविलेले आहे. जर्मन सरकारने त्यांचा ‘फेरडल क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरिट’ सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. 

निमगावा वाघा (ता. नगर) येथे फादर बाखर यांच्या मदतीने दुष्काळी भागाला बरकत आली, असे येथील कार्यकर्ते दत्ता उरमडे यांनी सांगितले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दुखः व्यक्त करत फादर हर्मन बाखर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जीवनप्रवास थोडक्यात...

  • भारतात तब्बल साठ वर्षे शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम
  • नगर जिल्ह्यासह राज्यात पाणलोटासह शेतीविषयक कामे
  • निधी उभा करत नाबार्डमार्फत राज्यभर पाणलोट विकासाची कामे
  • महाराष्ट्र शासनातर्फे कृषिभूषण, वनश्री आणि कृषिरत्न पुरस्कार
  • जर्मनी सरकारतर्फे ‘फेरडल क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT