manure
manure  
मुख्य बातम्या

गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणी

टीम अॅग्रोवन

सासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी वाढली. त्यामुळे शेतीत सेंद्रिय खते वापरून पीक उत्पादन वाढविण्याचा प्रयोग केला. यात गांडूळ खत व व्हर्मी वॉशचा पिकात वापर यशस्वी झाल्यानंतर तोच गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय अधिक वाढवला. त्यातून सासवड (ता. पुरंदर) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी सचिन गिरमे हे खर्च जाऊन वर्षाला १० लाख रुपये कमवीत आहेत.  बोरावकेमळा रस्त्याशी गिरमेंची शेती आहे. यशस्वी प्रयोगातून ‘ग्रीन गोल्ड गांडूळ खत’ नावाने स्वतःच्या पडजागेत वर्षापूर्वी प्रकल्प उभारला. १८ फूट लांबी, ६ फूट रुंदी, २ फूट उंचीच्या २० टाक्‍या विटा-सिमेंटमध्ये बांधून वर शेडही बांधले. साडेतीन लाख खर्च आला. टाकीत गावरान गायीचे शेण टाकून ओलावा करून थंडावा झाला, की आयसेनिया फोटिडा जातीचे गांडूळ सोडले. एका टाकीत चार टन शेण व साधारणतः कुट्टी करून पाला, पाचोळा टाकला जातो. एक टाकीतून २.५ ते तीन महिन्यात सुमारे अडीच टन गांडूळ खत मिळते. वर्षात चार वेळा या प्रमाणे २०० टन खतनिर्मिती होते. १० रुपये किलो प्रमाणे विक्री केली जाते. शिवाय २५ रुपये लिटरने २,५०० लिटर गांडूळ पाणी (वर्मीवॉश) विकले जाते. पाच ते पन्नास किलो दरम्यान विविध आकारानुसार बॅग पॅकबंद करून विकतात.  या प्रकल्पासाठी गायीचे शेणखत एक रुपया किलो प्रमाणे विकत घेतले जाते. शेण भरणे, पाणी मारणे, खत चाळणे, वीज, वजनासह पॅकिंग, वाहतूक आदी कामे खर्चिक आहेत. स्वतः सचिनसह कुटुंबीय प्रकल्पात वेळ देतात, शिवाय एका कुटुंबातील चार जणांनाही रोजगार दिला. हा सारा खर्च वर्षाला १० लाखापर्यंत जातो. निव्वळ नफा म्हणून सुमारे १० लाख रुपये पहिल्या वर्षी मिळाले. याकामी सातारच्या पशुधन विकास अधिकारी अर्चना जठार-नेवसे, गडहिंग्लजचे दयानंद देसाई यांचे थेट मार्गदर्शन झाले. त्यातूनच हा प्रकल्प आज एमए., बी.एड. असलेल्या पत्नी उमादेवी गिरमे यांच्यासह कुटुंबाचा आधार झालाय.

  प्रतिक्रिया घरी ३० वर्षांची ५० झाडांची चिकूची बाग असून, काही झाडांना घरचे गांडूळ खत टाकले. हंगामात फळझाडांचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढले आहे. फळांचा आकारही २२५ ग्रॅमपर्यंत वाढला आहे. फळबागेत केवळ गांडूळ खत, वर्मीवॉशच्या वापराने उत्पादनात चांगली वाढ मिळाली. संपूर्ण शेतीत गांडूळ खताचा वापर सुरू केला. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी गांडूळ खताचे ग्राहक झाले आहेत. लोकांची मागणी वाढत आहे.  - सचिन गिरमे, युवा शेतकरी, संपर्क - ९९२२५५८०५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT