The economic maths of farmers collapsed due to lack of milk prices
The economic maths of farmers collapsed due to lack of milk prices 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला चांगली मागणी असूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. दुसरीकडे चारा आणि पशुखाद्याच्या किमती वाढल्याने दुग्धोत्पादन शेतकरी अधिकच अडचणीत आले आहे.

पुणे जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे. विशेषतः आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात दुग्ध व्यवसाय वाढीस लागला आहे. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून पडल्याचे दिसून येते. सरकारने अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याचा थेट फायदा गावातील दूध उत्पादकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यात १०० हून अधिक खासगी दूध संघ आहेत. मात्र, या दूध संघांकडून गायीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

जिल्ह्यात गायीच्या दुधाचा दर २८ ते ३० रुपये लीटरपर्यंत होता. परंतु तो आता कमी होऊन १८ ते २४ रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हशीच्या दुधासाठी ३० ते ३५ रुपये दर मिळत होता. परंतु, या दरातही चांगलीच घसरण झाल्याचे दिसून येते. त्यातही डेअरीला दूध घातल्यानंतर वेळेवर पेमेंट मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या सहकारी व खाजगी दूध संघांकडून गायीच्या दुधाला ३.५/८.५  फॅटसाठी १८ ते २४ रुपये प्रति लीटर असा दर दिला जात आहे. हे संघ मातीमोल दराने दूध खरेदी करून उत्पादकांची फसवणूक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

पशुखाद्याचे दर वाढलेलेच पशुखाद्याचे एक पोते (५० किलो) १२०० ते १४०० रुपयांप्रमाणे खरेदी करावे लागत आहे. खापरी पेंडचा दर २२०० ते २४०० रुपये  प्रति ५० किलो, मक्याचा भरडा ८०० ते ९०० रुपये प्रति ५० किलो याप्रमाणे खरेदी करावा लागत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यांचा मेळ घालण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

सरकारने म्हशीच्या दुधाला ६० रुपये तर गायीच्या दुधाला किमान ४०  रुपये दर द्यावा. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांच्या कालावधीकरिता दुधाला १० रुपये प्रतिलीटर अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करावे. तरच शेतकऱ्यांचा थोड्याफार प्रमाणात तोटा  भरून निघेल. - घनश्याम तोडकर, शेतकरी, तळेगाव ढमढेरे, जि. पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT