दूध उत्पादकांना रोज सात कोटींचा फटका
दूध उत्पादकांना रोज सात कोटींचा फटका 
मुख्य बातम्या

दूध उत्पादकांना रोज सात कोटींचा फटका

Sudarshan Sutaar

सोलापूर : राज्यातील सहकारी दूध संघांनी गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर 27 रुपये इतका खरेदीदर द्यावा, असे बंधन घालूनही राज्यातील सहकारी दूध संघ अडचणींचा पाढा वाचत, या निर्णयाला जुमेनासे झाले आहेत. आता तर बहुतांश दूध संघांनी 27 रुपयांचा दर 20 रुपयांवर आणला आहे. परिणामी, प्रतिलिटरमागे सात रुपयांची तूट शेतकऱ्यांना सोसावी लागते आहे. राज्यात दिवसाकाठी एक कोटी लिटर दूध संकलन होते, या सगळ्याचा हिशेब घातल्यास दिवसाकाठी सात कोटींचा फटका सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांमार्फत सर्वाधिक गाईचे दूध संकलन होते. राज्यातील रोजचे संकलन जवळपास सव्वा कोटी लिटरपर्यंत आहे. त्यात सर्वाधिक 1 कोटी लिटर दूध गाईचे आणि 25 लाख लिटर म्हशीचे दूध संकलन होते. शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर 19 जूनला सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 37 रुपये इतका दर ठरवला. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तातडीने आदेशही काढले. पण सहकारी दूध संघांनी अडचणी सांगत या निर्णयाला विरोध केला.

त्यासाठी काही दूध संघांनी वेगवेगळ्या क्‍लृप्त्याही वापरल्या. त्यातून 27 रुपयांचा दर कधी 23, कधी 22 करत आता तो 20 रुपयांवर आणून ठेवला. मुख्यतः दुधाची गुणप्रत कमी दाखविणे, प्रोटिनची कमतरता दाखवणे, असे प्रकार करत दुधाचे दर उतरविले. त्याच्या जोडीला संघांची आर्थिक परिस्थितीही दाखवली आणि सरकारच्या आदेशाला "पद्धतशीर' पाकीटबंद करून टाकले.

सहकारी संघांच्या या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. म्हशीच्या दूधदराबाबत फारशी चर्चा होत नाही, पण गाईच्या दुधाचे संकलन जास्त असल्याने त्याच्या दराबाबत मात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक कोंडी केली जाते. सहकारी संघ आपल्या अडचणी मांडत सरकारशी भांडत आहेत, पण शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचा कोणीच विचार करीत नाही.

नोटिसांचा सोपस्कार राज्यातील कमी दर देणाऱ्या सहकारी दूध संघांना सहनिबंधकांनी (दुग्ध) यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामध्ये संघांना उत्तरासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती, त्यामध्ये या बेफिकिरीबद्दल संचालक मंडळावरही जबाबदारी निश्‍चित करण्याचे निर्देश दिले होते. पण संघांनीही नोटिशीतील कारणांना उत्तराचा सोपस्कार पूर्ण केला. पण पुढे काहीच झाले नाही.

खासगी दूध संघांचेही फावले दूधदराच्या या स्पर्धेमध्ये खासगी संघही चांगलेच हात धुऊन घेत आहेत. वास्तविक, या स्पर्धेत त्यांनी जादा दर देऊन संकलन वाढवले पाहिजे, पण तेही सहकारी दूध संघांच्या या भूमिकेचा फायदा घेत याच दराने शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करत आहेत.

लवकर तोडगा निघेल दूधदराबाबत समिती नेमली आहे, बैठकाही सुरू आहेत. कमी दराबाबत सहकारी दूध संघांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. वास्तविक, संघ आणि शेतकरी या दोघांचाही विचार आम्हाला करावा लागेल. लवकरच याबाबत काही तरी तोडगा निघेल, असे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आर. आर. जाधव यांनी स्पष्ट केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT