दुभत्या जनावरांचे दरही ४० टक्‍क्‍यांनी खाली
दुभत्या जनावरांचे दरही ४० टक्‍क्‍यांनी खाली Agrowon
मुख्य बातम्या

दुभत्या जनावरांचे दरही ४० टक्‍क्‍यांनी खाली

Suryakant Netke

नगर : सहा महिन्यांपासून दुधाला दर नसल्याचे गंभीर परिणाम दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही झाले आहेत. दूध व्यवसायाला सातत्याने प्राधान्य दिलेल्या नगर जिल्ह्यामधील नावाजलेल्या जनावरांच्या बाजारात दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत.

याशिवाय मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या खरेदी-विक्रीतही मोठी तफावत आहे. बाजारात दुभती जनावरे विक्री करतानाची शेतकऱ्यांची उलघालही त्रस्त करणारी आहे. राज्यात आठ महिन्यांपासून दुधाला दर नाही. दरवाढ होईल या आशेने शेतकरी तोट्यातला व्यवसाय सुरू ठेवत जनावरे संभाळली जात आहेत.

मात्र आठ महिन्यानंतरही शासन दुधाला दर देत नाही. सध्या प्रति लिटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्यामुळे राज्यात पाच दिवसांपासून मोफत दूधवाटप करून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे.

दुधाला दर नसल्याने शेतकरी त्रस्त आहेतच; पण दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही गंभीर परिणाम झाला आहे. नगर जिल्ह्यामध्ये लोणी (ता. राहाता) काष्टी (ता. श्रीगोंदे), घोडेगाव (ता. नेवासा) पाथर्डी, शेवगाव येथे जनावरांचे बाजार भरतात. या बाजारात दुभत्या गाई, म्हशींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काष्टी, घोडेगाव येथून तर मराठवाडा, पुणे, सोलापूर भागांतील शेतकरी जनावरांची खरेदी- विक्री करतात.

आठ महिन्यांपासून दर नसल्याने दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. बाजारातील आवक कमी झाली आहे. दर कमी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत, असे बाजार समितीमधील राजू चौधरी यांनी सांगितले. दुभत्या जनावरांनाच दर नाहीत, भाकड जनावरांना कोण घेणार, सध्या भाकड जनावरे वाटेल त्या किमतीत विकावी लागत असल्याचे विक्री घोडेगाव येथील दिलीप सोनवणे यांनी सांगितले.

शेतकरी, व्यापारी म्हणतात.... दुधाच्या धंद्याला लोक प्राधान्य देतात. जनावरे दावणीला दिसली तरी समाधान मिळते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून दर मिळत नसेल तर काय करणार, बाजारात दुभती गाय विकायला आणली तरी ग्राहक नाही. घेतल्या दरापेक्षा कमी दरात नाईलाने विकावी लागते.

- नारायण चौधरी, शेतकरी, घोडेगाव (ता. नेवासा) मी अनेक दिवसांपासून दूध व्यवसाय करतो. यंदासारखी परिस्थिती कधी झाली नव्हती. जनावरे विकायची वेळ आलीय, पण जनावरांनाही बाजारात दर मिळत नाही. मागील काही महिन्यांचा विचार करता तीस ते चाळीस टक्‍के कमी दराने विकावी लागत आहेत.

- भारत गारुडकर, शेतकरी, तिसगाव (ता. पाथर्डी) ‘‘दुभत्या गाईंचा मी खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतो. दुधाला दर नसल्याने खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दर मिळत नसल्याने काही प्रमाणात तोटा सोसावा लागतो.’’

- शेख सादीक रज्जाक, व्यापारी, कोरडगाव (ता. शेवगाव)‘‘दुधाला दर नसल्याचा सगळ्याच बाबत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना परवडत नसेल तर शेतकरी तरी काय करणार. बाजारात आवक कमी होत आहे. लोक परवडत नसेल तर खरेदी कशाला करतील?’’

- पिंटू गायकवाड, व्यापारी, घोडेगाव (ता. नेवासा)

Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT