मुख्य बातम्या

कृषी कार्यालयात ‘चार्ज’ची भीती

टीम अॅग्रोवन

अकोला ः मोठ्या पदाचा चार्ज मिळावा म्हणून जिवाचे रान करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी पाहायला मिळतात. थेट मंत्र्यांपासून फिल्डिंग लावली जाते. परंतु अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी कार्यालय सध्या वेगळ्याच चर्चेत आले आहे. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार घ्यायची भीती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. या ठिकाणचा तालुका कृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यापासून रिक्त झालेल्या पदांवर जायला कुणीही तयार नाही. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना पदभार घेण्यासाठी एका मागोमाग पत्रे काढावी लागत आहेत. अशा कारभारामुळे कृषी विभागातील (कथित) नियम व शिस्तीची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत.  काही दिवसांपूर्वी या ठिकाणचा तालुका कृषी अधिकारी जलयुक्तचे देयक काढण्यासाठी लाच घेताना अडकला. आधीच मार्च महिना हा शासकीय विभागांसाठी आर्थिक खर्चाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र याच काळात लाचखोरी झाली व अकोट तालुका कृषी कार्यालयाच्या मागे शुक्‍लकाष्ट सुरू झाले. तालुका कृषी अधिकारी व एक कर्मचारी अडकल्यापासून या ठिकाणी असलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये एका अनामिक भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या दृृष्टीने अकोट हा जिल्ह्यातील एक चांगला तालुका आहे. येथील केळी विदेशात निर्यात होत आहे. या तालुक्‍यातील शेती सुपीक असून, सिंचनही बऱ्यापैकी आहे. शेतकरी फळबागांकडे वळाले आहेत. परंतु येथील कृषी विभागाची घडी मोठ्या प्रमाणात विस्कटली आहे. आता तालुका कृषी कार्यालयात केवळ चतुर्थश्रेणी कर्मचारी दिसून येतात. आधीच मंडळ अधिकारी, पर्यवेक्षकांची पदे रिक्त होती. तर आता या ठिकाणी कार्यरत असलेल्यांपैकी अनेक जण आजारी सुटीवर गेले आहेत. सुरवातीला पर्यवेक्षकांना पदभार स्वीकारण्याच्या आर्डर निघाल्या. एक एक करीत हा अतिरिक्त पदभार न घेणारे वाढल्याने आता हे रिक्त पद सांभाळण्यासाठी चक्क कृषी सहायकाच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना ऑर्डर काढण्याची वेळ आली आहे. यापूर्वी ज्या पर्यवेक्षकाकडे पदभार दिला होता त्यांनी आजारी रजा घेतल्याने हा पदभार कृषी सहायकाने स्वीकारावा, असे आदेश १० एप्रिलला काढलेल्या पत्राद्वारे देण्यात आला आहे. हे पत्र राज्यातील कृषी विभागाच्या विविध ग्रुपवर सध्या धुमाकूळ घालत असून, खात्याची लक्तरे मांडत फिरते आहे. 

कृषीच्या ‘आरोग्या’चीच तपासणी हवी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अकोट तालुका कृषी खात्यात सुरू असलेला सावळागोंधळ थांबता थांबेना अशा स्थितीत पोचला आहे. अनेक जण आजारी रजेवर गेले आहेत. जे कार्यरत आहेत त्यांना हा चार्ज नको आहे. एकूणच कृषी विभागाच्या बिघडलेल्या ‘आरोग्या’ची तज्ज्ञांकडून तपासणीची गरज व्यक्त होत आहे. 

कारवाई करणार कर्मचाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार न स्वीकारणे, आजारी रजेवर जाणे याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येथील त्रासामुळे कुणी पदभार घ्यायला तयार नसल्याचे सांगितले. कुणी अतिरिक्त चार्ज घेत नसल्याने कृषी सहायकाच्या नावे ऑर्डर काढली. टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. कामकाज ठप्प कृषी विभागातील अशा अनागोंदीमुळे अकोट तालुक्‍यातील कृषी विभागाचे कामकाज ठप्प झालेले आहे. मार्चअखेर विविध योजनांचा निधी खर्च झालेला नाही. योजनांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अकोला जिल्ह्यात सध्या चार तालुक्‍यांना पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी नाहीत. काही ठिकाणी मंडळ अधिकारी वर्षानुवर्षे पदभार सांभाळत आहेत. नवीन अधिकारी न देण्याचे कारण गुलदस्तात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT