चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी तापमानाची नोंद
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी तापमानाची नोंद 
मुख्य बातम्या

चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी तापमानाची नोंद

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील उकाड्यात सकाळपासून वाढ झाली आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूरमध्ये ४५.४ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.    मार्च महिन्यात कोकणातील भिरा येथे ४५.६ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा बुधवारी राज्यात ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून उकाडा जाणवायला सुरवात होत आहे. दुपारी उन्हाच्या कडाक्यामुळे तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे.

विदर्भात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. चंद्रपूरपाठोपाठ नागपुरातही कमाल तापमान ४३.२ अंशांवर होते. सकाळपासून तयार जाणवणाऱ्या उकाड्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. परिणामी नागरिकांना सर्दीसारखे आजार उद्भवू लागले आहेत. विदर्भानंतर कोकणातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे सर्वाधिक ४३.० अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मराठवाड्यातील परभणी येथे ४३.६ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.    कोकणचा दक्षिण भाग आणि गोव्याच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच हिंदी महासागर आणि मालदीवचा परिसर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.  कर्नाटक, रायलसीमा ते तमिळनाडूचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी (ता. २२) विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. २३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. आज आणि उद्या गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असले, तरी वातावरणात काही ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार असून, उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) ३५.६, अलिबाग ३४.२, रत्नागिरी ३५.०, डहाणू ३५.०, पुणे ३८.६, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३३.५, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.८, सांगली ३७.३, सातारा ३८.६, सोलापूर ४१.१, औरंगाबाद ३९.४, परभणी शहर ४३.६, अकोला ४४.०, अमरावती ४१.८, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४३.१, चंद्रपूर ४५.४, गोंदिया ४१.०, नागपूर ४३.२, वर्धा ४३.६, यवतमाळ ४२.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT