पावसामुळे काजू पिकाला फटका बसला आहे
पावसामुळे काजू पिकाला फटका बसला आहे 
मुख्य बातम्या

काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार

एकनाथ पवार

सिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी, क्यार वादळ आणि ऑक्टोबर अखेरपर्यंतच्या मुसळधार पावसाचा प्रतिकूल परिणाम काजूपिकावर झाला आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांनी राज्यातील काजूबागा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम काजू हंगामावर होणार असून किमान ३० टक्के उत्पादन घटून सुमारे १५०० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

कोकणातील चार जिल्हे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यांत प्रामुख्याने काजू उत्पादन घेतले जाते. राज्यातील १.९१ लाख हेक्टर क्षेत्र काजूपिकांखाली आहे. त्यांपैकी अधिकतर क्षेत्र कोकणातील जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्गमध्ये ६७ हजार ६५९ हेक्टर क्षेत्र असून त्यातील उत्पादनक्षम क्षेत्र ४९ हजार हेक्टर आहे; तर रत्नागिरीत ९२ हजार ६०० हेक्टर असून, त्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. उर्वरित क्षेत्र रायगड ,पालघर व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा या दोन तालुक्यांतील आहे. प्रत्येक जिल्ह्याची उत्पादन क्षमता कमी जास्त असून राज्याचे सरासरी काजू उत्पादन २.६९ लाख मेट्रिक टन आहे.

कोकणात आंब्यापाठोपाठ काजू पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उलाढाल १ हजार २०० कोटी ते १ हजार ५०० कोटींपर्यंत होते. रत्नागिरी जिल्ह्यात काजूची उलाढाल सुमारे २ हजार २०० कोटींपर्यंत जाते. मात्र या वर्षीचा काजू हंगाम धोक्यात आला असून, काजू उत्पादकांचे अर्थकारण यंदा कोलमडणार आहे.  

काजू पिकातून सुमारे ५ हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. या वर्षी सरासरी काजू पिकाचे आजमितीस ३० नुकसान झाल्याने १५०० हजार कोटींवर फटका बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यात काजू चांगला होतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत हापूसपेक्षा कित्येक पटीने काजूची लागवड या भागात वाढली आहे. शेकडो बागायतदार पूर्णतः काजू लागवडीवर अवलंबून आहेत.   काजू पिकाचे नुकसान...

  • जुलैअखेर, ऑगस्ट प्रारंभीच्या अतिवृष्टीचा झाडांना फटका
  • १० ते १५ वर्षांची झाडे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाळून गेली
  • पाण्याचा निचरा न होणाऱ्या जागेतील बागा अक्षरशः काळवंडल्या
  • क्यार, महाचक्रीवादळामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाचा झटका
  • ऑक्टोबरमधील पहिली काजू पालवी आणि नंतरचा मोहर काळही लांबला
  • ६० टक्के काजू बागांना अद्याप पालवी आलीच नाही; चिंता वाढली
  • बागांना फांदीमर, शेंडेमर, पानगळ, ढेकण्या आदींचा प्रादुर्भाव
  • पावसामुळे शेतकऱ्यांना फवारण्या देखील करता आल्या नाहीत 
  • काजूचा हंगाम एक ते दीड महिना लांबणीवर जाणार
  • लांबलेला हंगाम उन्हाळ्यात सापडणार; नुकसानीची शक्यता
  • दृष्टिक्षेपात काजू लागवड...

  •  प्रमुख जिल्हे : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि कोल्हापूर
  • हेक्टरी लागवड : सरासरी २०० झाडे
  • एका झाडापासून सरासरी उत्पादन : ५ ते १५ किलो
  • काजूला मिळणारा दर : सरासरी १२० ते १७० रूपये. 
  • हेक्टरी उत्पन्न  ३ लाख रुपये
  •  प्रतिक्रिया पाऊस लांबल्यामुळे या वर्षी आंबा, काजू पीक उशिराने होणार हे जवळपास निश्‍चित आहे. काही भागातील काजूबागाचे पावसामुळे नुकसान झाले; परंतु पाण्याचा निचरा न होणे, झाडांना सूर्यप्रकाश न मिळणे अशा प्रकारामुळे या झाडांना मर आली आहे. सध्या काजू मोहरण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे तूर्तास नुकसान किती होईल, याचा ठोकताळा मांडता येणार नाही. - डॉ. बी. एम. सावंत, संचालक, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

    बदलत्या हवामानाचा फळपिकावर मोठा दुष्परिणाम होत आहे. सध्या ढेकण्या, रोठा या कीडरोंगामुळे  काजू पिकाचे नुकसान झाले आहे. या कीडरोगांना आळा घालण्यासाठी फळमाश्‍यांना ज्याप्रमाणे सापळे आहेत तशा पद्धतीचे सापळे निर्मितीचे संशोधन होणे आवश्‍यक आहे. - प्रा. विवेक कदम, कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी, जि. सिंधुदुर्ग.

    ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काजू झाडांना पालवी येणे अपेक्षित होते; परंतु सध्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काजूंना पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही काजू मोहोराला कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडणार आहे. सुरुवातीला आलेला मोहोर राहिला नाही तर  मोठे नुकसान होते. यावर्षी काजूचे किमान ३० टक्के नुकसान होणार हे निश्‍चित आहे. - प्रकाश पांचाळ, कोकीसरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग.

    हवामानबदलाचा परिणाम काजू पिकावर होण्याची दाट शक्यता आहे. काजूला पोषक थंडी या कालावधीत आवश्‍यक होती, ते वातावरण सध्या दिसत नाही. त्याचा परिणाम काजूच्या उत्पादनावर होणार आहे. - विवेक बारगीर, बागायतदार, मांजरे, जि. रत्नागिरी.

    बदलत्या वातावरणामुळे काजूच्या झाडांना वाळवी लागत आहे; तसेच पानेही झडली आहेत. बुरशी येत असल्याने मोहोर येण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. हंगाम लांबल्याने भविष्यात काजू उत्पादनास अडथळे येणार आहेत. पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे यंदा हंगाम जाम अडचणीत आला आहे - दत्ताराम दळवी, गुडवळे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT