cotton seed
cotton seed  
मुख्य बातम्या

राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची विक्री 

टीम अॅग्रोवन

पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) बियाण्यांचा फैलाव झालेला आहे. यंदा या बेकायदेशीर बियाण्यांची किमान ७५ लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली गेली आहेत, असा धक्कादायक अंदाज बियाणे उद्योगातून वर्तविण्यात आला आहे. 

फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया (एफएसआयआय) व नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाने (एनएसएआय) या दोन्ही संस्थांनी ‘एचटीबीटी’ कपाशीच्या अवैध बियाणे लागवडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एचटीबीटीला नियंत्रणात आणण्यासाठी देशभर कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अवैध प्रसाराच्या कामांमध्ये सामील असलेल्या गैरप्रवृत्ती शोधाव्यात आणि कठोर कारवाई करावी, असे या संस्थांनी सुचविले आहे. 

जैव तंत्रज्ञानाच्या आधारे ‘एचटीबीटी’ बियाण्यांमधून बेकायदेशीरपणे काही बाबी वापरण्याचा प्रयत्न होतो आहे. ही बाब भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरू शकते. याशिवाय या बियाण्यांची विक्री अवैधपणे होत असल्याने सरकारी महसूलदेखील बुडवला जात आहे, असाही मुद्दा फेडरेशनने मांडला आहे. 

अनेक राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे ‘हर्बिसाईड टॉलरन्स ट्रान्सजेनिक कॉटन’च्या हायब्रीड बियाण्यांची लागवड झाल्याचे २०१७ मध्ये निदर्शनास आले होते. हा विषय लोकसभेत चर्चेला आला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाद्वारे जैवतंत्रज्ञान विभागाच्या (डीबीटी) अंतर्गत क्षेत्र तपासणी आणि वैज्ञानिक मूल्यांकन समितीची (डीआयएसईसी) स्थापना केली गेली. ‘‘आनुवांशिकरीत्या सुधारित कपाशीची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात राज्यात बेकायदेशीरपणे केली जात आहे,’’ असा निष्कर्ष या समितीने देखील काढला होता.  यंदा दुप्पट बियाणे बाजारात  या संस्थांनी थेट केंद्रीय कृषी मंत्रालय आणि अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समितीला (जीईएसी) पत्र लिहून काही मुद्दे लक्षात आणून दिले आहेत. ‘एफएसआयआय’चे अध्यक्ष डॉ. एम रामासामी म्हणाले, की अवैध असूनही ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांच्या लागवड क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वाढ होते आहे. आमच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात गेल्या हंगामात ‘एचटीबीटी’ची ३० लाख पाकिटे महाराष्ट्रात आली होती. मात्र चालू हंगामात ७५ लाख पाकिटे बाजारात विकली गेली आहेत. ‘एचटीबीटी’ बियाण्यांचा केवळ पर्यावरणालाच नव्हे; तर शेतकरी आणि बियाणे कंपन्यांना मोठा धोका आहे.  प्रतिक्रिया  एचटीबीटी बियाण्यांमुळे तंत्रज्ञान, पर्यावरण, शेतकरी आणि चांगल्या बियाणे कंपन्याही धोक्यात आल्या आहेत. अवैध बियाणे बाजारात येत राहिल्यास संशोधन व विकासावर चांगल्या कंपन्या गुंतवणूक करणार नाहीत. टंचाई असलेल्या सर्वच बियाण्यांच्या बाबत अवैध प्रकार आता वाढू लागले आहेत.  - अजित मुळे, व्यवस्थापकीय संचालक, ग्रीनगोल्ड सीड्‌स 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT