जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण माध्यम आहे. जमिनीची सुपीकता जपण्यात तिच्यामध्ये असणाऱ्या जिवाणूंचा मोठा वाटा असतो. या जिवाणूंचा अभ्यास स्पेनमधील माद्रीद येथील रे जॉन कार्लोस विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. संशोधनातून जिवाणूंचे निश्चित कार्य, गुणसूत्रीय रचना याबाबत त्यांना माहितीचा साठा मिळाला आहे. भविष्यात जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी व कृषी उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी या माहितीचा निश्चितच फायदा होईल असा दावा त्यांनी केला आहे.
रे जॉन कार्लोस विद्यापीठातील संशोधक फर्नांडो मेस्रे व त्यांच्या चमूने हे संशोधन केले आहे. संशोधकांनी जगभरात विविध देशांतील माती गोळा करून तिचा अभ्यास केला. साधारणपणे जिवाणूंच्या ५०० प्रजाती सर्व देशातल्या जमिनीत प्रभावीरीत्या कार्यरत असतात असे त्यांना दिसून आले आहे. संशोधनाबाबत ‘सायन्स’ या संशोधनपत्रिकेत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधनाबाबत अधिक माहिती देताना मुख्य संशोधक फर्नांडो मेस्रे म्हणाले, ‘‘जमिनीतील जैविक संपदेमध्ये जमिनीतील जिवाणूंचा मोठा वाटा असतो. पिकाच्या उत्पादनातही त्या भूमिका बजावतात. जमिनीतील पर्यावरणाचे संतुलन ठेवून सुपीकता टिकविण्यासाठी मोठा हातभार जिवाणू लावतात. जमिनीतील कर्बाच्या प्रमाणावरही ते प्रभाव टाकत असतात. मातीच्या छोट्याशा नमुन्यात जिवाणू व इतर सजिवांच्या लाखो प्रजाती दिसतात. ज्याबद्दल अद्याप पुरेशी माहिती नाही. त्यामुळे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना प्रभावी ठरत नाहीत. जमिनीतील बहुतांश जिवाणूंची रचना सद्यस्थितीत शास्त्रज्ञांकडे असलेल्या जिवाणूंच्या रचनेपेक्षा खूपच वेगळी आहे. प्रयोगशाळेत अद्यापपर्यंत या जिवाणूंची निर्मिती करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आम्ही जगभरातील जमिनीतील जिवाणूंचा अभ्यास केला.’’
असे केले संशोधन :
प्रतिक्रिया : अामच्या संशोधनात जगभरातील जमिनीत जिवाणूंच्या ५०० प्रजाती प्रभावी असल्याचे दिसून आले. त्यातील अनेक प्रजातींच्या गुणसूत्रीय रचना व जमिनीच्या जडणघडणीत त्यांचे कार्य याबाबत भरपूर माहिती मिळाली. अभ्यासातून जमिनीतील या जिवाणूंची संख्या जपण्याबाबत नेमके काय करता येईल याची माहिती मिळाली. त्याचा उपयोग कृषी उत्पादन वाढविण्यासाठी करता येऊ शकतो. माहितीचा उपयोग करून विविध देशातील जमिनीतील प्रभावी जिवाणूंच्या वितरणाचा नेमका नकाशाकृत आराखडा करता येईल. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी व त्यामाध्यमातून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत धाेरण ठरविण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. फर्नांडो मेस्त्रे, मुख्य संशाेधक, रे जॉन कार्लोस विद्यापीठ, माद्रिद, स्पेन
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.