Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Rate : हळदीच्या दरात नरमाई

Turmeric Market : सध्या हळदीला १४ हजार ते १६ हजारांचा भाव मिळत आहे. दुसरीकडे देशातील हळदीचे उत्पादन यंदा २० ते ३० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : हळदीच्या भावात मागील दोन आठवड्यांत क्विंटलमागे ३ हजारांपर्यंत नरमाई आली. सध्या हळदीला १४ हजार ते १६ हजारांचा भाव मिळत आहे. दुसरीकडे देशातील हळदीचे उत्पादन यंदा २० ते ३० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा अपेक्षित असून भाव यंदा तेजीत राहू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

दोन, तीन आठवड्यांपूर्वी हळदीचे भाव सरासरी १७ ते १९ हजार होते. ते आता १४ ते १६ हजारांपर्यंत नरमले आहेत. नव्या मालाची आवक वाढल्याचा हा परिणाम असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. भाव कमी झाले तरी सध्याचा भाव गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. गेल्यावर्षी याच काळात हळद ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात होती. बाजारातील आवक वाढली तरी सण आणि लग्नसराईमुळे हळदीचे भाव स्थिर असून नरमाई थांबली. तसेच सध्याच्या भावात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.

हळदीचे भाव वाढण्याला प्रामुख्याने यंदाचे घटलेले उत्पादन हे महत्त्वाचे कारण आहे. यंदा पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हळद लागवड कमी झाली होती. तर पिकालाही दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास २० ते ३० टक्के घट येण्याचा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. यंदा हळद उत्पादन ७ ते ८ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी देशात ११ लाख ६१ हजार टन उत्पादन झाले होते.

उत्पादन कमी झाल्याने देशात हळदीचे भाव वाढल्यानंतर निर्यात मंदावली आहे. चालू वर्षात जानेवारी ते मार्च २०२४ या काळात निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली. तसेच बाजारात हळदीची आवक वाढत आहे. मराठवाड्यातील बाजारांत हळदीची आवक चांगली सुरू आहे. त्यातच निर्यात मंदावल्याचा परिणाम दरावर दिसून आला. आणखी काही आठवडे बाजारातील हळदीची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. मे च्या मध्यानंतर बाजारातील हळदीची आवक कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाढलेली आवक आणि मंदावलेल्या निर्यातीमुळे नरमाई

दरात आता आलेली नरमाई प्रामुख्याने बाजारातील वाढलेली आवक आणि मंदावलेली निर्यात यामुळे आल्याचे काही व्यापारी सांगतात. तसेच नेमके पीक किती हेही अद्याप स्पष्ट नाही. प्रत्येकाचे अंदाज वेगळे दिसतात. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर जूनच्या दरम्यान उत्पादनाचाही अंदाज येऊ शकतो. पण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर शिल्लक साठाही कमी झालेला असेल. तर पुढचे पीक यायला किमान १० महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यातच बाजारात हळदीचे भाव टिकले आणि निर्यात सुरू झाली तर हळदीच्या भावाला पुन्हा आधार मिळू शकतो. यामुळे सणांच्या काळात हळदीचा भाव पुन्हा तेजी दाखवू शकतो.

लागवड वाढण्याची शक्यता

पण यंदाच्या मॉन्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यातच हळदीला भाव चांगले आहेत. त्यामुळे हळदीची लागवड वाढू शकते, असे चित्र आहे. हळदीची लागवड जास्त वाढल्यास याचा परिणाम काही काळ बाजारावर दिसू शकतो. पण दिवाळीपर्यंत बाजारात हळदीचा स्टॉक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीचा भाव मागणी वाढल्यानंतर २५ हजार ते २७ हजारांची पातळीही गाठू शकतो. पण ही तेजी नेमकी कधी येईल हे त्या काळातील मागणी आणि पुरठ्यावर अवलंबून राहील, असे अभ्यासकांनी सांगतिले.

टप्प्याटप्प्याने विक्री फायदेशीर

शेतकऱ्यांनी बाजारातील तेजीत किमान तीन टप्प्यांत आपला माल विकल्यास फायदेशीर ठरू शकते. सध्याचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या काहीशी नरमाई आली आहे. पण आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे. त्याकाळात एक टप्पा विकण्यास हरकत नाही. तसेच दुसरा हंगामाच्या मध्यात अपेक्षित भावाला आणि एखादा टप्पा तेजी मंदीसाठी ठेवण्यास हरकत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT