Mumbai News : ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत दरवर्षी सोयाबीनची खरेदी केली जाते. पणन विभाग यात मध्यस्थाची भूमिका बजावतो. पुढील वर्षीपासून कोणत्याही अडथळ्याशिवाय ही खरेदी व्हावी यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १३) केली. सह्याद्री अतिथिगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावेत अशी सूचनाही केली. राज्यात यंदा सोयाबीनचा बाजारातील दर पडल्याने हमीभावाने खरेदी करण्यासाठी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’कडून खरेदी केंद्रे उभारण्यात आली. मात्र, सुरुवातीला ओलावा जास्त असल्याने खरेदीच झाली नाही.
तर १५ टक्के ओलावा गृहीत धरून खरेदी करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतरही केंद्रांनी सोयाबीन स्वीकारले नाही. ओलावा कमी झाल्यानंतर राज्यातील सोयाबीनचा बारादाना संपला. त्यामुळे खरेदीचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. या संपूर्ण घोळावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी सूचना दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करा. शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे. राज्यातील चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा, असेही ते म्हणाले.
कांदा साठवणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त मागणी ही आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
बैठकीला पणनमंत्री जयकुमार रावल, सहकार व पणन विभागाचे प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहसचिव संतोष देशमुख, पणन महासंघ, वखार महामंडळ, कापूस पणन महासंघाचे अधिकारी उपस्थित होते.
‘ॲग्रो हबचा आराखडा सादर करावा’
समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हब मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभी करावीत. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.