Jalgaon News: खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. यातच कापूस गाठींची निर्मिती सुरू असून, खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे १८ लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन या हंगामात (सप्टेंबर २०२५ अखेर) होईल, असे दिसत आहे.
दर वर्षी खानदेशात कापूस हंगामात २२ ते २३ लाख कापूस गाठींचे उत्पादन होते. पण उत्पादनात मागील काही वर्षांत सतत घट येत आहे. जळगाव जिल्ह्यातील घटलेली कापूस लागवड व रोगराईमुळे कापूस उत्पादकतेत घट होत असल्याने रुईचे उत्पादनही कमी येईल, असे दिसत आहे. कारण दिवाळीनंतरच्या काळात खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग गतीने कार्यरत असतो. परंतु यंदा कापूसपुरवठा कमी असल्याने प्रक्रिया संथ गतीनेच सुरू होती.
पाऊस ऑक्टोबरमध्ये व त्यापूर्वीही सतत सुरूच राहिल्याने कापूस पिकाला फटका बसला. यात कापसाचे उत्पादन कमी होत आहे. कारखानदार व इतर संस्थांना कापूस कमी मिळत असल्याने रुई उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे. खानदेशात सुरुवातीपासून कापूस आवक कमी आहे.
खानदेशात सध्या प्रतिदिन दीड हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी १८ हजार क्विंटल कापसाची आवक मागील हंगामात झाली होती. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कापसाची आवक सतत कमी दिसत आहे. दिवाळी व निवडणुका यामुळेही कारखाने संथ गतीने सुरू होते. खेडा खरेदी फारशी नाही. कारण आता फारसा कापूससाठा शेतकऱ्यांकडे नाही.
अनेकांनी कापूस पीक काढून त्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा, गहू, मका आदींची लागवड केली होती. कापूस वेचणी हंगाम अनेक गावांत जानेवारीतच आटोपला आहे. यामुळे कापूस आवकेबाबत गावोगावी फारशी सकारात्मक स्थिती नाही. कापूस आवकेत कुठलीही वाढ पुढे होणार नाही. कोरडवाहू कापूस पिकात वेचणी डिसेंबरमध्ये वेगात झाली. पण त्यातही उत्पादन कमी आहे. डिसेंबर महिन्यात कापूस आवकही बऱ्यापैकी होती.
शेतकऱ्यांकडील साठा अत्यल्प
शेतकऱ्यांकडे सध्या कापूससाठा अत्यल्प आहे. अनेकांनी कापूस वेचणीनंतर काही दिवसांत त्याची विक्री केली. काही भागात वेचणीनंतर लागलीच कापसाची विक्री झाली. कापूस कारखानदारांकडे येण्याची गती काही दिवस होती. पण आवक यंदा कमी होती. शेतकऱ्यांकडील साठा घटला आहे. आता आवक फारशी राहणार नाही. कमी उत्पादन झाल्याने यंदा खानदेशात कापूस गाठींचे उत्पादन घटेल, असे दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.