Jalgaon News : खानदेशात सरत्या हंगामात पपईचे दर दबावात होते. पपई फेकण्याची वेळ आली. अशात नव्या म्हणजेच २०२४-२५ च्या हंगामात पपईची लागवड कमी होईल, असे दिसत आहे. परिणामी पपई रोपांचे दरही घसरले आहेत.
मागील हंगामात पपई रोपांचे दर ११ ते १५ रुपये प्रतिरोप होते. त्यात कमाल शेतकऱ्यांनी ७८६ या वाणाच्या लागवडीस पसंती दिली होती. तसेच अनेकांनी १५ नंबर पपई वाणाची लागवडही केली होती. खानदेशात २०२३-२४ मध्ये पपईची लागवड सुमारे सात हजार हेक्टरवर झाली होती. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात ५२०० हेक्टरवर पपई होती. त्यात शहादा तालुक्यात ४८०० हेक्टरवर पपई पीक होते.
धुळे व जळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे १८५० हेक्टरवर पपई पीक होते. धुळ्यातील शिरपूर, धुळे, शिंदखेडा, जळगावातील जामनेर, यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर या भागात पपई लागवड बऱ्यापैकी झाली होती. परंतु पपईचे दर सरत्या हंगामात दबावात होते. दरांचा तिढा चार वेळेस तयार झाले.
डिसेंबर व जानेवारीत १५-१५ दिवस पपई काढणी बंद करण्यात आली. पपई शेतातच पिकून खराब झाली. डिसेंबरमध्ये सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. जानेवारीतही सरासरी अडीच रुपये प्रतिकिलोचा दर होता. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दरात सुधारणा झाली.
परंतु दोन ते अडीच महिने पपईचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी नव्या हंगामात लागवड कमी करण्याचा व काहींनी लागवड न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नव्या हंगामात खानदेशात पपई लागवड घटेल, असे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. यामुळे पपई रोपेनिर्मिती करणाऱ्या मंडळीला फटका बसत आहे. कारण रोपवाटिकांची संख्या अधिक आहे. यातच दुष्काळी स्थितीमुळे मोठ्या भागात लागवड होणार नसल्याने त्या भागातील पपई रोपांची विक्री करायची कोठे, असाही मुद्दा आहे.
खानदेशात यंदा पपई रोपांचा पुरवठा अधिक व मागणी कमी, अशी स्थिती आहे. धाराशीव, सोलापूर, जालना या या भागातूनही खानदेशात पपई रोपांचा पुरवठा रोपवाटिकाचालक करीत आहेत. ९ ते ११ रुपये प्रतिरोप या दरात रोपे थेट शेतात पोहोच केली जात आहेत.
१५ नंबर वाणाची मागणी अधिक
स्थानिक रोपवाटिकाचालकांसमोर यामुळे अडचण तयार होत आहे. त्यात ७८६ या वाणाच्या रोपांना अल्प मागणी आहे. कारण त्यात नैसर्गिक समस्यांनी मोठे नुकसान मागील दोन-तीन हंगाम झाले आहे. तुलनेत १५ नंबर पपई वाणाचे उत्पादन बरे आले आहे. यामुळे १५ नंबर पपई वाणाची लागवड विविध भागांत शेतकरी करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.