Nashik News : जिल्ह्यात लेव्हीच्या मुद्द्यावरून हमाल मापारी व व्यापारी वर्गात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खासगी बाजार समित्यांची स्थापना होत आहे. त्यामुळे खासगी बाजार समितीच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीवर व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या बाजार शुल्कात शेकडा एक रुपयावरून ५० पैसे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
असा निर्णय घेणारी पिंपळगाव बाजार समिती राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. आमदार सभापती दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाच्या मासिक सभेत तसा ठराव करण्यात आला.
व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये लेव्हीच्या वादामुळे बाजार समितीचे ठप्प होत होते. त्यात खासगी बाजार समितीमध्ये बाजार शुल्क शेकडा ५० पैसे आकारले जायचे. निम्मेच बाजार शुल्क असल्याने व्यापारीही खासगी बाजार समितीमध्ये कांदा खरेदीला प्राधान्य देतात. शिवाय माथाडी, मापारी कामगारांच्या वाद नव्हता. यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची आवक काहीशी घटली होती. त्यामुळे संचालकांच्या मासिक बैठकीत बाजार शुल्क ५० पैसे करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
या वेळी उपसभापती जगन कुटे, संचालक दिलीप मोरे, सोहनलाल भंडारी, रामभाऊ माळोदे, दीपक बोरस्ते, गोकूळ गिते, ज्ञानेश्वर शिरसाट, डॉ. प्रल्हाद डेलें, मनीषा खालकर, अमृता पवार, यतीन कदम, राजेश पाटील, शिरीष गडाख, महेंद्र गांगुर्डे, शंकरलाल ठक्कर, नारायण पोटे, सचिव संजय लोढे उपस्थित होते.
२४ वर्षांपासून एक रुपया फी
बाजार समितीची स्थापना झाल्यापासून कांद्याच्या उलाढालीवर शेकडा एक रुपयाप्रमाणे बाजार शुल्क आकारले जात होते. खासगी बाजार समितीची स्थापना होऊन तेथे बाजार शुल्क ५० पैसे शेकडा आकारले जाते. या बाजार शुल्कामुळे व्यापारी खासगी बाजार समितीला प्राधान्य देत होते. त्यातूनच संचालक मंडळाने मार्केट स्पर्धेत टिकण्यासाठी २४ वर्षांनंतर असा निर्णय घेतला.
खासगी बाजार समितीचे आक्रमण रोखण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीने कांद्यासाठी शेकडा ५० पैसे मार्केट फी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून पुन्हा एकदा पिंपळगाव बाजार समिती कांद्याच्या आवकेने गजबजेल.- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती
बाजार समितीच्या हितासाठी या निर्णयाला आमच्या गटाने एकमताने पाठिंबा दिला आहे. अधिक प्रमाणात व्यापारी कांदा खरेदीसाठी पिंपळगाव बाजार समितीत येऊन स्पर्धेतून शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिक भाव मिळेल हा उद्देश आहे.- अनिल कदम, संचालक, पिंपळगाव बसवंत बाजार समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.