१) कापूस दरात चढ-उतार सुरुच (Cotton Rate)
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. देशातील बाजारात कापसाची आवक अजून कमी झालेली नाही. दैनंदिन आवक आजही एक लाख गाठींच्या पुढेच आहे. याचा दबाव दरावर दिसत आहे. त्यामुळे कापसाचे भाव आजही सरासरी प्रति क्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७९.५३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशात कापसाची आवक मर्यादीत झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीनवरील दबाव कायम (Soybean Market)
देशातील बाजारांत सोयाबीनच्या दरात काहीसे चढ-उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलचं सोयाबीन दाखल झाल्यानंतर बाजारावर दबाव आला. सोयाबीनचे वायदे निचांकी १४.२४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आले. तर सोयापेंडचे वायदे ४३६ डाॅलर प्रतिटन आहेत.
देशातील बाजारात दोन लाख टनाच्या आसपास सोयाबीनची आवक आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे देशात सोयाबीन स्थिर आहे. सोयाबीनला सध्या सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये क्विंटल भाव मिळतोय. पुढील काही दिवस सोयाबीनचे भाव स्थिर राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
३) नाफेडची हरभरा खरेदी जोमात (Chana Procurement)
नाफेडकडून हमीभावाने हरभरा खरेदी जोमात सुरु आहे. नाफेडने आतापर्यंत १३ लाख ७६ हजार टन हरभरा खरेदी केला. प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी हरभरा उतारा घटल्याचं सांगत आहेत. परंतु सरकार मात्र यंदा देशात विक्रमी हरभरा उत्पादन होण्याचा अंदाज देत आहे.
त्यामुळं नाफेडची खरेदी वाढल्यानंतरही खुल्या बाजारातील भाव दबावात आहेत. खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये भाव मिळतोय. यंदा इतर कडधान्याचे दर तेजीत असल्याने पुढील काळात हरभरा दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय.
४) तुरीच्या दरातील तेजी टिकून (Tur Rate)
तुरीच्या दरातील तेजी अद्यापही टिकून आहे. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपये क्विंटल दर मिळतोय. तर बाजारातील आवक अद्यापही कमीच आहे. पण तुरीला उठाव मात्र टिकून आहे. त्यामुळं तुरीच्या दरातील तेजी कायम दिसते.
पुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होईल. मागणी मात्र कायम राहण्याचा चिन्हे आहेत. त्यामुळं तुरीच्या दरातील तेजी पुढील काळात वाढेल, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
५) गव्हाला सध्या काय भाव मिळतोय? (Wheat Rate)
भारताला मागील हंगामात गहू दरवाढीच्या मोठ्या झळा बसल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली दरवाढ आणि भारतातून वाढलेली निर्यात यामुळं देशातील बाजारात गव्हाचे दर वाढले होते. परिणामी सरकारला केवळ १८८ लाख टन गहू खरेदी करता आला. त्यामुळे खुल्या बाजारात गव्हाचा तुटवडा पडला. त्यामुळे दर आभाळाला भिडले.
सरकारने दर पाडण्यासाठी स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकला. त्यामुळे सरकारकडे सध्या गव्हाचा स्टाॅक कमी प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून मग यंदा सरकारने जादा गहू खरेदी करायचं ठरवलंय. सरकारने ३४१ लाख टन गहू खरेदीचं उद्दीष्ट ठेवलंय.
यंदा अवकाळी पावसामुळं गहू काढणीला अनेक भागांमध्ये उशीर झाला. परिणामी सरकारची गहू खरेदी धिम्या गतीने सुरु झाली. यामुळं यंदा सरकारला गहू खरेदीचं उद्दीष्ट गाठता येईल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण असं असतानाही सरकारने गहू खरेदी आघाडी घेतलीय.
२५ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरकारने १८३.८ लाख टन गहू खरेदी केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १४१.९ लाख टन गहू खरेदी करण्यात आला होता. याचा अर्थ यंदा गेल्या वर्षीपेक्षा २९.५ टक्के जास्त खरेदी झाली आहे.
सरकारने नवा गहू बाजारात येण्याच्या सुमारास आपल्याकडला स्टॉक खुल्या बाजारात विकला. त्यामुळे गव्हाचे दर पडले. सध्या गव्हाचे दर हमीभावाच्या आसपास आहेत. सध्या गव्हाला सरासरी १ हजार ९५० ते २ हजार १५० रुपये क्विंटल भाव मिळतोय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.