१) सोयाबीन दरात चढ उतार (Soybean Market Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन (Soybean), सोयातेल (Soya oil) आणि सोयापेंडच्या (Soymeal) दरात सुधारणा पाहयाला मिळाली. आज दुपारी २ वाजेपर्यंत सोयाबीन १५. ४२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडने आज ४९६ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता. देशात मात्र सोयाबीन बाजार टिकून आहे.
आजही सोयाबिन सरासरी दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. भारतीय सोयापेंडला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगली मागणी आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापूस बाजार स्थिरावला
देशात तसचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस दरात (Cotton Rate) चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत पुन्हा ८२ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत नरले होते. तर देशात कापूस दर ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिले.
आजही कापसाची बाजारातील आवक कमीच होती. तर अनेक शेतकऱ्यांनी कापूस मागं ठेवला. त्यामुळं कापूस दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
३) हरभरा भाव दबावातच
देशातील अनेक बाजारांमध्ये नवा हरभरा (Chana Arrival) दाखल होतोय. गेल्या हंगामातील हरभरा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळं हरभरा बाजार दबावात दिसतोय. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांच्य दरम्यान दर मिळतोय.
तसंच अनेक शेतकरी सध्या कापूस आणि सोयाबीन मागं ठेऊन हरभरा विकताना दिसत आहेत. त्यामुळंही आवक काहिशी अधिक दिसते. तर नाफेडची खरेदी सुरु झाल्यास हरभरा बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
४) ज्वारी खातेय चांगलाच भाव
देशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक कमी आहे. मात्र ज्वारीला चांगला उठाव दिसतो. यंदा खरिपातील ज्वारी उत्पादन घटल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यातच ग्राहकांची पसंती वाढली. त्यामुळं सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत.
सध्या ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. ज्वारीचे हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज ज्वारी व्यापारी व्यक्त करत आहेत.
५) सध्या कांद्याला काय भाव मिळतोय?
यंदाच्या खरिपात देशातील कांदा उत्पादन (Onion Production) बंपर झालं. विशेष म्हणजे कांदा लागवडीच्या (Onion Cultivation) काळात उत्पादन कमी राहीलं, असं सांगितलं जात होतं. पण पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील कांदा लागवड वाढीचा अंदाज कुणाला बांधता आला नाही.
त्यामुळं बाजारात अचानक आवक वाढल्यानं सर्वांचेच डोळे पांढरे झाले. सर्वच बाजारांमध्ये कांदा आवक वाढली. दुसरीकडे कांदा निर्यातही (Onion Export) यंदा वेगाने सुरु आहे. पण तरीही कांदा दरावर दबाव वाढत गेला. राज्यातील बाजारात कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय.
सध्या मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत. कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. इतर राज्यांमध्येही उत्पादन वाढल्यानं राज्यातून कांदा उठाव कमी झाला. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना जास्त फटका बसत आहे.
एकीकडे उत्पादन खर्च वाढला, मात्र दर कमी आहेत. त्यामुळं कांदा उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे येत आहे. यापुर्वी २०१९ मध्ये सरकारने अशी मदत दिली होती. तसचं कांदा निर्यात वाढविण्यासाठी निर्यात अनुदानही द्यावे, अशीही मागणी केली जातेय.
कांद्याचा उत्पादन खर्च क्विंटलसाठी १ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचला. शेतकऱ्यांना किमान २ हजार रुपये दर मिळाला तरचं पीक परवडेल. पण खरिपातील उत्पादन आणि आवक बघता, कांद्याचे भाव पुढील काही दिवसतरी दबावात राहण्याची शक्यता आहे, असे कांदा बाजारातील जाणकार सांगत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.