1. सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांनी आज पुन्हा १३ डाॅलरपेक्षा कमी पातळी गाठली होती. तर सोयापेंड मात्र ४१९ डाॅलरवर होते. देशातील बाजारातही भावपातळी क्विंटलमागं ५० रुपयांनी नरमली होती. सोयाबीनच्या भावात पुढील काही आठवडे चढ उतारदिसू शकतात. मात्र भावपातळी ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. कापसाच्या वायद्यांमध्ये आज नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे ८१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज दुपारपर्यंत ५७ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर होते. मागील काही आठवड्यांतील हा निचांकी भाव आहे. तर बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ६ हजार ३०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होती. कापसाचे भाव आणखी काही दिवस या पातळीदरम्यान दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
3. हिरव्या मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीचा उठाव कायम आहे. यामुळे दराला आधार मिळत आहे. सध्या हिरवी मिरची प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार रुपयाने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची बाजारातील आवक पुढील काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
4. वांग्याला सध्या चांगला उठाव आहे. बाजारातील आवक मात्र स्थिर दिसते. वाढत्या उष्णतेचा वांगी पिकाला फटका बसतो, असे शेतकरी सांगत आहेत. यामुळे आवकेवर परिणाम झाला. सध्या वांगीचे व्यवहार २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत. वांगी आवक आणखी काही काळ स्थिर राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
5. जिऱ्याच्या दरातील तेजी मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. जिऱ्याचे वायदे उच्चांकी ६५ हजार रुपये प्रतिटनांवरून कमी झाले. वाढलेल्या भावात जिऱ्याची विक्री वाढल्याने दरातील तेजी नरमली. तसेच व्यापारी लागेल तेवढाच माल घेत आहेत. भावात चढ उतार सुरु असल्याने स्टाॅक करण्यासाठी कुणी इच्छूक दिसत नाही. जिऱ्याचे वायदे आज ५४ हजार ७०० रुपयांवर होते. तर हजर बाजारात जिऱ्याचे व्यवहार ५५ हजार रुपयाने झाले. जिऱ्याच्या भावाने हजर बाजारात ६० हजारांचा टप्पा गाठल्यानंतर स्टाॅकमधील माल बाजारात आला होता.
मागील काही वर्षात वाढलेल्या भावात स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांनी जिरा खरेदी करून ठेवला होता. हा माल मोठ्या प्रमाणात बाहेर आल्याचे अभ्यासकांनी सांगितले. यामुळे बाजारातील दरावर दिसून आला होता. चालू हंगामात देशात जिऱ्याचे उत्पादन घटले होते. तसेच निर्यातीला चांगली मागणी होती. यामुळे भाव वाढले. पण वाढलेल्या भावात मागमी कमी झाल्याचं दिसतं. परिणामी भावावर दबाव आला होता. पण येऊ घातलेल्या हंगामातही जिरा उत्पादनाला फटका बसू शकतो. यामुळे पुढील काळात जिऱ्यातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे. जिऱ्याचे भाव आणखी काही आठवडे ५५ हजार ते ६५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान राहू शकतात, असाही अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.