Market Bulletin:
हरभरा दरात काहीशी सुधारणा
सरकारने पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ न दिल्याचा आधार हरभरा बाजाराला मिळाला आहे. आजपासून पिवळा वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क आणि २०० रुपये किमान आयात मूल्य लागू झाले. त्यामुळे आज हरभरा बाजारात सरासरी क्विंटलमागे ५० रुपयांची सुधारणा दिसून आली. आज बाजारात ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला. बाजारात पुढील दोन महीने आवकेचा दबाव राहणार आहे. त्यामुळे हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कारल्याला चांगला उठाव
राज्यातील बाजारात कारल्याची आवक सुधारली आहे. कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. मात्र बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला. कारल्याचे भाव मागील आठवडाभरापासून काहीसे कमी झाले. आठवडाभरात कारल्याचे भाव क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान कमी झाले. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. कारल्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत.
मक्याचा भाव स्थिर
देशात मक्याला यंदा चांगली मागणी आहे. इथेनाॅल, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील आवकही स्थिर आहे. देशात मक्याचा स्टाॅकही चांगला आहे. रब्बीतील मक्याची लगावडही वाढली आहे. या कारणांनी बाजार मागील दोन महिन्यांपासून एका दरपातळीच्या दरम्यान दिसत आहे. आजही मक्याला सरासरी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मक्याच्या भावात पुढील दोन -तीन आठवडे काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीनमध्ये नरमाई
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. बाजारभाव एका पातळीपेक्षा वाढताना दिसत नाहीत. देशातही भावपातळी दबावात असून हमीभावापेक्षा आजही किमान एक हजार रुपये कमी भाव मिळत आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार २५० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान स्थिर होते. तर बाजारातील सोयाबीनची आवकही स्थिर आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसात काहीशी सुधारणा
कापसाचा भाव जागतिक पातळीवर कमी आहेत. अमेरिकेतील कापूस बाजारावर वाढलेल्या डाॅलरच्या भावाचा परिणाम होत असून निर्यात कमी होत आहे. त्यामुळे चालू आठवड्यात कापूस भावात पुन्हा २ टक्क्यांची घट दिसून आली. तर देशातील बाजारात कापसाची आवक स्थिर असून बाजारभावही कायम आहेत. आजही देशातील बहुतांशी बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशात बाजारातील आवक कमी होत असल्याने दराला काहीसा आधार मिळत आहे. कापसाची आवक मार्च महिन्यातही कमी होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.