Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांदा उत्पादकांचे नुकसान ३१०० कोटींवर

Onion Export Ban : देशातील सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झाले आहे. ग्राहकांची ओरड झाली, की सरकारने अधिकाराचा वापर करून हस्तक्षेप करायचा असे यापूर्वी घडले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : केंद्र सरकारने कांद्यावर ८ डिसेंबरपासून थेट निर्यातबंदी लादली. केंद्राने ग्राहकांचे हित यातून साधले, मात्र गेल्या ९६ दिवसांत (बुधवारपर्यंत, ता. १३) कांदा उत्पादकांचे ३१६१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

देशातील सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झाले आहे. ग्राहकांची ओरड झाली, की सरकारने अधिकाराचा वापर करून हस्तक्षेप करायचा असे यापूर्वी घडले आहे. मात्र यंदा ग्राहकांची कुठलीही ओरड नसताना फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणासाठी कांदा निर्यातबंदी लादण्यात आली.

निर्यातबंदीपूर्वी प्रतिक्विंटल ३३०० रुपये असलेले दर १८०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे नंतर जानेवारी ते मार्च कालावधीत क्विंटलमागे १५०० ते २००० रुपयांपर्यंत तोटा सोसण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली. परिणामी, जिरायती भागातील कांदा हे नगदी पीक घेणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आले. त्यामध्ये नाशिक, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे.

‘‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे आहे’’, अशा वल्गना कांदा पट्ट्यातील केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे मंत्री व लोकप्रतिनिधींनी केल्या. निवेदने, पाठपुरावा केल्याचे भाषणातून सांगितले गेले. मात्र ही फक्त राजकीय आश्‍वासने ठरली. मात्र केंद्र व राज्यात सत्ता असतानाही शेतकऱ्यांना दुय्यम स्थान देत अर्थकारण अडचणीत आणले गेले. त्यामुळे कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. याशिवाय राष्ट्रीय नेत्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत कांद्याचा मुद्दा पुढे आणून केंद्राला सवाल केले जात आहेत.

शेतकऱ्यांचे ‘कल्याण’ कुठे?

केंद्र सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. त्यासाठी वेळोवेळी हस्तक्षेप केला जातो. यामध्ये ग्राहकधार्जिणे केंद्रातील मंत्री ‘सरकारी बाबू’ यांच्या आडून कागदावर खेळून निर्णय घेत आहेत. तसेच नोव्हेंबर महिन्यात राज्य दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीने कांदा लागवड, उत्पादन व कांदा उपलब्धता संबंधीची चुकीची व अतिरंजित माहिती केंद्र सरकारला दिली. त्यामुळे निर्यातबंदी झाली. त्याची कबुली भाजपच्या एका जबाबदार नेत्याने दिल्लीत दिली होती.

शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून दर पडल्याने आक्रोश करत असतानाही सरकारने दुर्लक्ष केले. जे सरकार देशात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगते, तेच सरकार व त्यांचे अधिकारी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होऊ देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. जसे ग्राहकांसाठी ‘ग्राहक व्यवहार मंत्रालय’ काम करते. असे असताना केंद्राचे ‘शेतकरी कल्याण मंत्रालय’ कुठे हरवले, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

अचानक निर्यात बंदी करून दर पाडले. त्यामुळे एकरी १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान आहे. पाऊस, गारपीट यातूनही मार्ग काढून दर्जेदार माल बाजारात आणला. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतीमालाची माती केली आहे.
- निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक, वाहेगाव साळ, ता. चांदवड
निर्यात बंदीनंतर दरात मोठी घसरण होऊन गेल्या सव्वातीन महिन्यांत शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सरकारने सरसकट निर्यात खुली करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्‍वासन दिले होते; परंतु निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्याने घटले आहे. तसेच शेतकऱ्यांवरील कर्ज दुप्पट वाढले आहे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

राज्यातील आवक, दर, आर्थिक तोटा स्थिती

महिना आवक (क्विंटल) सरासरी दर (रुपये) तोटा (रुपये)

डिसेंबर (ता. ८ पासून) ५९,२५,५०० १,८५३ ८५७ कोटी ४१ लाख

जानेवारी ९,४६,९५४ १,७९८ २९२ कोटी ६२ लाख

फेब्रुवारी ७३,७२,५८६ १,३२३ १४५७, कोटी ५६ लाख

मार्च (ता.१३ अखेर) ३२,६४,१९७ १,६०२ ५५४ कोटी २६ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT