Cotton Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीला यवतमाळमध्ये ब्रेक

Cotton Market : खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) कापूस विक्रीसाठीची लगबग वाढली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) कापूस विक्रीसाठीची लगबग वाढली आहे. अशातच साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण देत ‘सीसीआय’कडून यवतमाळ जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर कापूस खरेदीला ब्रेक लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. साधारणतः दहा फेब्रुवारीपर्यंत खरेदी बंद राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात खरिपाखालील असलेल्या एकूण ९ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे पावणेपाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होते. त्यावरुनच कपाशी हे यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य पीक असल्याचे अधोरेखित होत आहे. मात्र शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी वणवण करावी लागत असल्याची स्थिती आहे. केंद्र सरकारकडून कापसाला लांब धाग्यासाठी ७५२१ रुपये क्‍विंटलचा दर जाहीर केला आहे.

पहिल्या वेचणीत अशा प्रकारच्या दर्जाचा कापूस उपलब्ध होतो. त्यानंतर कापसाची प्रत आणि स्टेपल लेंथ देखील अपेक्षित मिळत नसल्याने दर कमी केले जातात. सध्या ७४२१ रुपये क्‍विंटल या दराने कापसाची खरेदी होत आहे. कॉटन सिटी अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १५ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती.

आतापर्यंत या १५ केंद्रांच्या माध्यमातून १३ लाख पाच हजार ७३२ क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. एकट्या यवतमाळ तालुक्‍यातील केंद्रावर नोंदणी केलेल्या बारा हजार शेतकऱ्यांनी एक लाख १२ हजार क्‍विंटल कापसाची विक्री केली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नोंदणीत अडचणी येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यातच शुक्रवारी (ता. ३१) कापूस खरेदी ठप्प पडली होती.

बाजार समितीच्या यार्डात शेतकऱ्यांची शेकडो वाहने मोजणीच्या प्रतीक्षेत असताना अचानक कापूस साठवणुकीसाठी जागा नसल्याच्या कारणाआड खरेदी बंद करण्यात आली. आवक जास्त आणि त्यावर प्रक्रियेचा वेग कमी असल्याने यवतमाळमधील ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद पडली आहे. साधारणतः दहा फेब्रुवारीपर्यंत ही खरेदी बंद राहील, असे सांगितले जात आहे. ही संधी साधत खासगी खरेदीला वेग येणार असून या व्यवहारात शेतकऱ्यांची लुट होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नेमक्‍या कारणांचा उलगडा होऊ शकला नाही

दरम्यान, ‘सीसीआय’ कापूस खरेदी अनिश्चित कालावधीसाठी बंद आहे. परिणामी कापूस उत्पादकांना खुल्या बाजारात कापूस विकावा लागणार आहे. या बाबत ‘सीसीआय’चे अकोला झोनचे व्यवस्थापक अजय कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खरेदी बंद असण्यामागील नेमक्‍या कारणांचा उलगडा होऊ शकला नाही.

कापूस उत्पादकांना हमीभावाचा फायदा मिळावा याकरिता पाठपुरावा करून ‘सीसीआय’ केंद्र मंजूर करून घेतले. आता प्रक्रिया केलेल्या गाठी आणि सरकीचा साठा सदर केंद्रावर उघड्यावर आहे. पाऊस आल्यास ते भिजण्याची शक्‍यता पाहता संबंधित जिनिंग व्यावसायिकाच्या सूचनेवरून खरेदी बंद करण्यात आली आहे. साधारणतः आठ ते दहा दिवस खरेदी बंद राहील, असा अंदाज आहे.
- रवी ढोक, सभापती, बाजार समिती, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT