Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : देशात अजूनही ७० लाख टन सोयाबीन शिल्लक?

सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता ६ महिने होऊन गेले. यंदा गेल्याहंगामातील शिल्लक साठा अधिक होता. त्यामुळं सोयाबीन पुरवठा जास्त झाला.

Anil Jadhao 

Soybean Rate : सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता ६ महिने होऊन गेले. यंदा गेल्याहंगामातील शिल्लक साठा अधिक होता. त्यामुळं सोयाबीन पुरवठा (Soybean Supply) जास्त झाला. पण हंगामाच्या मध्यापर्यंत बाजारात जवळपास ६५ टक्के सोयाबीन बाजारात आलं.

तर दुसरीकडं सोयापेंड निर्यातीनं (Soyameal Export) बाजाराच्या आशा पल्लवीत केल्या. सोयापेंड निर्यामुळं सोयाबीन दराला आधार आहे. देशातील बाजारात मार्चपर्यंत ७७ लाख टन सोयाबीन आले, तर जवळपास ७० लाख टनांचा स्टाॅक शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सकडे असल्याचे सोपाने म्हटले आहे.

देशात यंदा १२० लाख टन सोयाबीन उत्पादन झालं. तर गेल्याहंगामातील २५ लाख टन शिल्लक आहे. तसचं आयात धरून यंदा देशात १४७ लाख टन सोयाबीनचा पुरवठा असल्याचं सोपानं सांगितलं.

यापैकी ७७ लाख टन सोयाबीन आतापर्यंत बाजारात आलं, तर अजूनही शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सकडे जवळपास ७० लाख टनांचा स्टाॅक असल्याचा अंदाजही सोपानं दिलाय. पण यापैकी शेतकऱ्यांकडे किती सोयाबीन आहे याचा नक्की अंदाज नाही.

पण मागील हंगामातील शिल्लक साठा शेतकऱ्यांकडं आता असण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा साठा प्रक्रिया प्लांट्सकडेच असू शकतो. हे सगळ सोयाबीन बाजारातही येणार नाही.

त्यामुळं यंदाच्या हंगामातील आवक वगळून शेतकऱ्यांकडं सध्या देशात शिल्लक असलेल्या एकूण साठ्यापैकी निम्माच असू शकतो. म्हणजेच शेतकऱ्यांकडे ३० ते ३५ लाख टन सोयाबीन असू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

यंदा बाजारात सोयाबीनची आवक जास्त झाल्यानं गाळपही वाढलं. गेल्या हंगामात मार्च महिन्यापर्यंत केवळ ४२ लाख टनांचं गाळप झालं होतं. तर यंदा ६० लाख टनांवर सोयाबीन गाळलं गेल्याचं सोपानं म्हटलंय.

यंदा खाद्यतेल बाजार दबावात होता. पण सोयापेंड बाजाराकडून सोयाबीनला आधार मिळाला. त्यामुळं खाद्यतेलाला उठाव नसतानाही सोयाबीन गाळप वाढलं.

सोयाबीन गाळप यंदा वाढल्यानं सोयापेंड निर्मितीही वाढली. मार्चपर्यंत देशात ४८ लाख टन सोयापेंड निर्मती झाली. गेल्या हंगामात मार्चपर्यंतची सोयापेंड निर्मिती ३३ लाख टनांवरच स्थिरावली होती.

यंदा भारताच्या सोयापेंडला मागणी होती. अर्जेंटीनात उत्पादन घटल्यानं शेजारच्या देशांनी भारताकडून आयात वाढवली. परिणामी देशात सोयापेंड निर्मितीही वाढली.

सोयापेंड निर्यात पोचली १० लाख टनांवर

सोयापेंड निर्यातीचा विचार करता यंदा भारताला दिलासा मिळाला. कारण महिल्या सहा महिन्यांमध्ये भारतानं जवळपास दुप्पट निर्यात केली. गेल्या हंगामात देशातून पहिल्या सहा महिन्यांमध्ये ४ लाख ७४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. यंदा मात्र निर्यातीने मार्चमध्येच १० लाख टनांचा टप्पा गाठला. त्यामुळं यंदा भारताची सोयापेंड निर्यात विक्रमी होण्याचीही आशा आहे.

पशुखाद्यात सोयापेंडचा वापर वाढला

निर्यातीसोबतच यंदा देशातील पशुखाद्यासाठी सोयापेंडचा वापर वाढला. यंदा पशुखाद्यासाठी सोयापेंडचा वापर पहिल्या सहा महिन्यांमध्येच ३.५० लाख टनांनी वाढला. गेल्या हंगामात मार्चपर्यंत देशातील पशुधन क्षेत्राकडून केवळ ३० लाख टन सोयापेंडचा वापर झाला होता. पण यंदा पशुधनासाठी ३३ लाख ५० हजार टन सोयापेंड वापर झाला. त्यामुळंही सोयापेंडचा स्टाॅक कमी झाला.

सोयाबीनला आधार मिळेल का?

यंदा सोयाबीनसाठी सोयापेंडचे दरच महत्वाचे ठरत आहेत. कारण सोयातेलाचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात गेले. यंदा पहिल्या सहा महिन्यातच देशातून १० लाख टन सोयापेंड निर्यात झाली. एप्रिल महिन्यातही निर्यातीची गती कायम राहण्याचा अंदाज आहे.

त्यातच शेतकऱ्यांकडील स्टाॅक घटला. तर प्रक्रिया प्लांट्सकडे २ लाख ३५ हजार टनांचा सोयापेंड स्टाॅक आहे. त्यामुळे पुढील काळात सोयापेंड निर्यातीचे सौदे पूर्ण करण्यासाठी सोयाबीनला उठाव मिळेल.

सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात बाजारातील पुरवठा कमी होऊन सोयाबीन दरात आणखी सुधारणा होऊ शकेल. पण दरात चढ उतारही होऊ शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT