जळगाव ः धनलक्ष्मी महिला बचत गटाचा पोळी भाजी स्टॉल.
जळगाव ः धनलक्ष्मी महिला बचत गटाचा पोळी भाजी स्टॉल. 
महिला

बचत गटाच्या साथीने मिळविला बारमाही रोजगार

Chandrakant Jadhav

जळगाव शहरातील अरुणा वानखेडे यांनी २००५ मध्ये धनलक्ष्मी महिला बचत गटाची स्थापना केली. जळगाव शहरातील कामगार, नोकरदारांची गजबज असलेल्या भागात अल्प दरात स्वादिष्ट भोजनाचे गटाने तीन स्टॉल उभारले. दर्जेदार सेवेमुळे त्यांच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळतो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी शाश्‍वत रोजगार व उत्पन्नाचा भक्कम स्राोत तयार केला आहे.

जळगाव शहर जसजसे वाढत आहे, तसतशा रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. या संधी शोधून तिचे सोनं करणेही तेवढच जिद्द, चिकाटीचे काम. जिद्द, सातत्य ठेवून धनलक्ष्मी बचत गटाने आदर्शवत कामगिरी करून दाखविली आहे. या बचत गटात दहा महिला आहेत. मनीषा ठाकूर या बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. गटामध्ये अरुणा वानखेडे, वैशाली वानखेडे, पुष्पा पाटील, अनसुया वानखेडे, दीपाबाई शिंपी, निर्मला मोराळे, कल्पना माळी, सुनीता ठाकूर व सविता माळी या सदस्या आहेत. 

पापडनिर्मितीतून सुचली संकल्पना

महिला बचत गटातील अरुणा वानखेडे या पापडनिर्मिती करायच्या. जशी मागणी मिळायची तेवढे पापड बनवून त्या ग्राहकांना द्यायच्या़, परंतु पावसाळ्यात पापड बनविण्याचा व्यवसाय बंद ठेवावा लागतो. अनेकदा ऑर्डरही नसायच्या. मग दुसरा रोजगार बघावा लागायचा. अनेकदा जळगाव शहरातील नवीन बस स्थानकानजीकच्या झुणका भाकर केंद्रातून त्यांना पापडाची मोठी ऑर्डर मिळायची. या केंद्रात १५ रुपयांत पोळीभाजी आणि २० रुपयांत वरण, भात, एक भाजी, तीन पोळ्या असे  भोजन अनेक वर्षांपासून मिळते. आपणही अशी सेवा लहान स्वरूपात सुरू करावी, इतर महिलांना त्या माध्यमातून रोजगारही देता येईल आणि आपल्यालाही बारमाही रोजगार मिळेल, अशी संकल्पना त्यामागे होती. त्यांनी लागलीच संपर्कातील महिलांना ही संकल्पना सांगितली. यातून धनलक्ष्मी बचत गटाची स्थापना केली.

औद्योगिक वसाहतीनजीक पहिला स्टॉल

सुरवातीला धनलक्ष्मी बचत गटाने औद्योगिक वसाहत आणि नागपूर महामार्गालगत अजिंठा चौकात एक हातगाडी घेऊन पोळी भाजी व ठेचा-पराठा स्टॉल सुरू केला. वीस रुपयांत एक भाजी, तीन पोळ्या दिल्या जातात. आजही हीच पद्धत आहे. एक आलू पराठासोबत ठेचा व लोणचे १० रुपयांत, एक पालक किंवा मेथी पराठासोबत ठेचा व लोणचे दहा रुपयात असे दर आहेत. सकाळी रोज तीन भाज्या व कढी असा मेनू असतो. कढीसाठी वेगळा दर आहे. तीनपैकी कुठलीही एक आवडती भाजी ग्राहक घेऊ शकतो. वीस रुपयांत घरगुती जेवणाची सुविधा या गटाने उभी केल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.   स्टॉलच्या कामकाजाबाबत गटाच्या सदस्या अरुणा वानखेडे म्हणाल्या की, सकाळी दहा वाजता गटाचा पोळी भाजीचे स्टॉल सुरू होतो तो  रात्री आठ वाजेपर्यंत चालतो. चांगला प्रतिसाद मिळत गेल्याने गटाने सराफ बाजारानजीकच्या सुभाष चौकात स्टॉल सुरू केला. यासाठी सुभाष चौक मित्र मंडळाने मोफत जागा उपलब्ध करून दिली. २०१५ मध्ये नवीन बस स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर एका हॉटेलच्या जागेत गटाने स्टॉल सुरू केला. आजघडीला गटाचे तीन स्टॉल आहेत. महापालिकेने चेन्नईमधील अम्मा खिचडी सेंटरप्रमाणे पोळी भाजी सेंटर किंवा अल्प दरात भोजनाची सेवा देऊन रोजगार मिळवून देणाऱ्या बचत गटांना जागा उपलब्ध करून द्यावी.

शाश्‍वत रोजगाराची सोय बचत गटातर्फे भोजनाचे तीनही स्टॉल बारमाही सुरू असतात. स्टॉलवर फक्त पराठा व पोळ्या तयार केल्या जातात. भाज्या, ठेचा, कढी घरूनच तयार करून आणली जाते. गटाने  भाज्या बनविण्यासह किराणा साठविण्यासाठी एका खोलीची व्यवस्था केली आहे. गटातील १० महिलांसह इतर पाच अशा १५ महिलांचा सतत राबता असतो. चार महिला घरीच भाज्या बनविणे, गहू, तांदूळ स्वच्छता, भांडी धुण्याचे काम करतात, तर ११ महिला तीन स्टॉलवर असतात. दर महिन्याला लागेल तेवढा किराणा एकाच वेळी खरेदी केला जातो. भाजीपाल्याची खरेदी बहुतेक वेळा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते. या कामातून सर्व महिलांना प्रतिदिन किमान २५० रुपये मिळतात. काही वेळेस एखाद्या कार्यालयातून किंवा खासगी संस्थेतून जेवणाची आॅर्डर असते. त्या वेळी अधिकचा नफा मिळतो. रतन वानखेडे यांची या गटाला मदत असते. भाजीची गरज भासली तर ती बनवून पोचविण्याची जबाबदारी घरी कार्यरत असलेल्या महिलांवर असते. मागणीनुसार गटातील महिला लागलीच रिक्षाने भाजी पोचविते. त्यासाठी संबंधित स्टॉलवरून दीड ते एक तासभर आधी मोबाईलद्वारे संबंधित महिलेस सूचना दिली जाते.

बॅंकेत चांगली पत महिला बचत गटाने २००७ मध्ये जळगाव शहरातील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून एक लाख कर्ज घेतले होते. त्याची परतफेड केली. गटाने दरम्यानच्या काळात सत्तर हजार रुपयांची बचत केली होती. या पैशांचा उपयोग गटाने स्टॉलसाठी आवश्‍यक साहित्य, हातगाड्या, भांडी आदींच्या खरेदीसाठी केला. गटातील प्रत्येक महिला दरमहा १०० रुपये बचत करते. अलीकडेच आणखी एक राष्ट्रीयीकृत बॅंक या बचत गटाला वित्तसाहाय्य करायला तयार झाली आहे. या बॅंकेत गटाची चांगली पत तयार झाली आहे.

संपर्क ः अरुणा वानखेडे ः ९८८१८४५६६४   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT