mulching in horticulture crops
mulching in horticulture crops 
कृषी सल्ला

फळबागेत आच्छादन करा

डॉ. आदिनाथ ताकटे

फळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी झाले तरी त्याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात झाडांच्या आळ्यात सेंद्रिय आच्छादन करावे. बागेला हलके पाणी द्यावे.

राज्यांत सध्या किमान तापमानात घट होऊन   गारठा वाढला आहे.उत्तरेकडील राज्यातून थंड वाऱ्याचे प्रवाह येत असले, तरी हवामानातील बदलामुळे त्यात अडथळे येत आहेत, त्यामुळे गेल्या दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहेत. पहाटे पडत असलेल्या धुक्याचा विपरीत परिणाम फळबागांवर होत आहे. कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. हिवाळ्यात अति थंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारे आणि गारा यामुळे झाडांना इजा होते. प्रतिकूल शीत लहरीमुळे फळझाडांचे नुकसान होते. कमी तापमानाचे परिणाम 

  • कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते.
  • वनस्पतींच्या पेशी मरतात, फळे तडकतात. प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते.
  • केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात.
  • फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यावर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशीत हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशीकणांतील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तिहीन होऊन मरू लागतात.
  • अति थंड तपमानामुळे खोड आणि फांद्या याच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो. रोपवाटिकेतील कोवळी रोपे यास बळी पडतात. कोवळी पाने, फूट आणि फांद्या सुकतात.
  • तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळ्यांपर्यंत पोचते. अशावेळी सालीचा इजा झालेला भाग खरडून जखमेला बोर्डो पेस्ट लावून त्यात बुरशीचा होणारा  प्रादुर्भाव थांबविता येतो.
  • उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शीत लहरींमुळे जास्त नुकसान पोचते. आंब्याच्या मोहोरावर परिणाम होतो. सदारहित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून थंडीचा विपरीत परिणाम 
  • होतो. तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यावर संत्रा, मोसंबीच्या फलधारणेवर परिणाम होतो. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.
  • पूर्वदक्षतेचे उपाय  

  • रब्बी हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटणा, घेवडा, कोबी, फ्लॉवर.
  • नवीन केळी, पपई व पानवेल लागवडीच्या भोवती दाट शेवरी लावावी.
  • उपाययोजना

  • फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा, ओली लाकडे टाकून धूर व उष्णता रात्रभर मिळेल असे पाहावे.
  • बागेस रात्री पाणी द्यावे, यामुळे जमिनीचे तापमान वाढते. पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.
  • थंडीची लाट येणार हे लक्षात येताच सायंकाळी फळझाडांना विहिरीचे हलके पाणी द्यावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते. अशी ओली जमीन लवकर थंड होत नाही.
  • झाडांच्या खोडापाशी व आळ्यात गवत, कडबा, पाचोळा, गव्हाच्या तुसाचे आच्छादन करावे.
  • केळीच्या बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावीत.
  • द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. त्यामुळे बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
  • डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून पाणी नियमित द्यावे.
  • रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालावे. सकाळी ते काढावे. यासाठी तुराटी, कडबा यांचे तट्टे, काळे प्लॅस्टिकचा उपयोग करावा.
  • पालाशयुक्त खत दिल्याने झाडांची पाणी, अन्नद्रव्य शोषण आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटकपणा वाढतो.
  • - डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

    Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

    Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

    SCROLL FOR NEXT