क्रमविकास, उत्क्रांतीतून घडली सजीवसृष्टी
क्रमविकास, उत्क्रांतीतून घडली सजीवसृष्टी 
कृषी सल्ला

क्रमविकास, उत्क्रांतीतून घडली सजीवसृष्टी

डॉ. विजयश्री हेमके

सर चार्ल्स डार्विन जयंती विशेष एखाद्या पुस्तकाने सर्व धर्म, विचारधारा आणि जगाची उलथापालथ केल्याची फारच मोजकी उदाहरणे आहेत. त्यात सर चार्ल्स डार्विन “ओरिजिन ऑफ स्पेसीज” हे २४ नोव्हे १८५९ रोजी प्रकाशित झालेले भरपूर संशोधन, पुराव्यानिशी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, उत्क्रांतीची प्रक्रिया मांडणारे पुस्तक येते. निसर्ग हा उत्क्रांतीच्या माध्यमातून उन्नत होत असतो. उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत सतत आणि अविरत घडत राहणारी बदलाची प्रक्रिया म्हणजे क्रमविकास. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होत होत प्रगत प्राणी आणि वनस्पती उत्पन्न झाले आहेत. चार्ल्स डार्विन नावाचा २२ वर्षीय ब्रिटिश युवक १८३१ मध्ये ‘बीगल’ नावाच्या जहाजावरून प्रवासाला निघाला. त्याला जहाजावर निसर्गाचा अभ्यासक म्हणून आमंत्रण होते. प्रवासामध्ये विविध देश, प्रदेश, बेटे यांना भेटी देत वनस्पती, प्राणी, सजीव यांचा अभ्यास सुरू केला. पाच वर्षानंतर हे जहाज मायदेशी परतल्यानंतर डार्विन हे प्रवासादरम्यान अनुभव, प्राणी, वनस्पतीचे विविध नमुने, त्याच्या नोंदी आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष यावर सातत्याने काम करत राहिले. येणारे निष्कर्ष हे ब्रिटन आणि तत्कालीन युरोपमधील धर्म, धर्मग्रंथ यांच्यापेक्षा वेगळे असल्याने लोकपवाद, सामाजिक बहिष्काराची भीती यामुळे संशोधनाचे निष्कर्ष डार्विनने प्रकाशित करण्यात घाबरत होता. धर्मग्रंथ, धर्मनियम प्रामाण्य मानणाऱ्या त्या काळात डार्विनने काढलेले निष्कर्ष सहजासहजी मान्य करणारी समाज परिस्थिती नव्हती. त्यावर अनेक वर्षे लोटली. त्यांच्या निसर्ग अभ्यासातील तज्ज्ञतेविषयी शास्त्रज्ञांना शंका नव्हती. त्याच वेळी त्यांच्याकडे वॉलेस या तरुण शास्त्रज्ञाने याच विषयावर केलेल्या अभ्यासाचे बाड त्यांच्याकडेच तपासण्यासाठी आले. त्याने जवळपास त्यांच्याप्रमाणेच निष्कर्ष काढले होते. या संशोधनाचे हक्क कोणाचे यावरून वाद होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी ते ठरवण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांच्या सोसायटीवरच सोपवली. अखेरीस हा शोधनिबंध दोघांच्या नावे १ जुलै १८५८ रोजी लिनियन सोसायटीच्या सभेत वाचला गेला. अखेरीस “ओरिजिन ऑफ स्पेसीज” नावाने डार्विनने जगासमोर आणला. ही सृष्टी कशी निर्माण झाली असावी? या सृष्टीत, जीव कसे निर्माण झाले? मानव वंश कसा निर्माण झाला? आणि या प्रकियेचा हेतू काय? हे मानवाच्या मनात असलेले चिरंतन प्रश्‍न. प्रत्येक धर्माने आणि धर्ममार्तंडांने यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात देवाने पृथ्वी आणि सजीव सृष्टीची निर्मिती केली यावरच अधिक भर आहे. ख्रिश्‍चन धर्मानुसार ६ हजार वर्षापूर्वी सहा दिवसांमध्ये ही सृष्टी निर्माण केली आणि सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली, असा दावा केला जातो. अन्य धर्मातही अशीच वेगळीवेगळी आणि परस्परविरोधी माहिती दिली आहे. मात्र डार्विनच्या या संशोधन निष्कर्षांमुळे एक वेगळीच कलाटणी दिली. जीवनाचा हा प्रवाह, मुळात हेतूशून्य असल्याचे त्याने सप्रमाण सिद्ध केले. विज्ञानातील अशा धर्मग्रंथामध्ये नमूद माहितीपेक्षा भिन्न संशोधनांना धर्ममार्तंडांचा प्रचंड विरोध होत असे. मानवाची निर्मिती ॲडम आणि इव्ह या पहिल्या जोडप्यापासून झाल्याचे अब्राहमिक धर्मांमध्ये सांगितले आहे. त्यामुळे माकडापासून माणूस विकसित होत गेला, या उत्क्रांतीच्या सिद्धांताला चर्चने पराकोटीचा विरोध केला. पूर्ण पुराव्यानिशी निष्कर्ष काढलेला असल्याने शास्त्रज्ञ आणि शहाण्या मंडळींनी मात्र त्यांना मोठा पाठिंबा दिला. याबाबत उत्क्रांतीबाबत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक स्कोप्स विरुद्ध चाललेला स्कोप्स मंकी ट्रायल नावाचा कोर्ट खटला प्रसिद्ध आहे. त्यावर पुढे एक नाटक, एक सिनेमाही आला. पुढे तर गुणसूत्रांच्या (डीएनए) शोधामुळे, सापडत गेलेल्या विविध जिवाश्मांमुळे डार्विनचा मूळ सिद्धांत अधिकच बळकट होत गेला. अनुवंशशास्त्र, उत्क्रांतीय जैवशास्त्र व त्यातून निर्माण झालेल्या अनेक विद्याशाखांमुळे तो विशाल वृक्षाप्रमाणे विस्तारला आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत ः चार्ल्स डार्विन यांनी जहाज प्रवासामध्ये विविध देशांतील, बेटांवरील वनस्पती व प्राण्यांचे वेगवेगळे नमुने गोळा केले. त्याचा अभ्यास आणि विश्‍लेषण केले. त्यातून जे सजीव त्या त्या वेळच्या पर्यावरण, परिस्थितीस जुळवून घेण्यास सक्षम असतात. तेच सजीव कालौघात टिकून राहतात असे त्यांनी मांडले. जगण्यासाठी आवश्यक ते बदल सजीवांमध्ये घडतात. असे बदल घडल्यामुळेच ते प्राणी आणि वनस्पती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन जगतात. अन्य कालौघात नष्ट होतात. ही प्रक्रिया लक्षावधी वर्षे चालू आहे. अभ्यासाअंती, सर्व प्रजाती या मूलतः एकाच पूर्वजांपासून उत्पन्न झाल्याचा निष्कर्ष त्याने काढला. बदलत्या परिस्थितीनुरूप स्वतः बदल केल्यामुळे प्रजातींमध्ये एवढी विविधता निर्माण होत गेली. आपल्या ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ या पुस्तकामध्ये त्याने हाच उद्‍घोष केला. आज बऱ्यापैकी स्वीकारलेले हे विचार त्या काळी अत्यंत क्रांतिकारी ठरले. संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत होत आली. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे. जीवात, किंचित किंचित बदल होत जातात. परिणामी, बऱ्याच पिढ्यांनंतर मूळ जीव आणि नवा जीव यांच्यात मोठा बदल जाणवतो. नवा जीव पुढे नवीन प्रजाती म्हणून उदयास येते. हा बदल होण्यास लागणारा कालावधी प्रचंड मोठा असतो. आज फरक दिसणारे हे जीव एकाच जीवनमाळेचे मणी असल्याचे ते सांगतात. माणूस हाही एक प्राणीच असून, या उत्क्रांतीचंच फलित आहे. ही जाणीव त्यांनी दिली. उदा. डार्विनने गालापागोस बेटावरील फिंच पक्ष्यांच्या चोचींमधील बदलांची माहिती देतो. तेथील उपलब्ध खाद्यांप्रमाणे त्यांच्या चोचीच्या ठेवणीमध्ये बदल होत गेला. त्यातून त्यांना जगण्याच्या, तगून राहण्याची अधिक संधी मिळाली. परिणामी, पिढ्यांपिढ्या त्याच खाद्य प्रकारामुळे कीटक खाणारे, फळे खाणारे अशा वेगवेगळ्या फिंच पक्ष्याच्या नवीनच प्रजाती उत्पन्न झाल्या. थोडक्यात, नव्या प्रकारचे जीव निर्माण होण्यात कर्ताकरविता हा ‘नैसर्गिक निवड’ हाच ठरतो.

डार्विनचे विचार, त्याने मांडलेला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत हा आधुनिक जैवशास्त्राचा पायाच आहे. डार्विनने जीवशास्त्राचे विश्‍व उलथेपालथे तर केलेच, पण मानवी प्रज्ञेच्या प्रत्येक आविष्कारावर आपली अविट छाप सोडली आहे. आजचे आधुनिक जीवशास्त्र. जैवउत्क्रांतीशास्त्र, वर्तनशास्त्र, सामाजिक वर्तन, ते अगदी सृष्टीनिर्मितीपर्यंतचा कोणताही संशोधन प्रवास हा डार्विनच्या विचारावरच पुढे जातो. डार्विन या मानव इतिहासातील सर्वकालीन, सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाचा आज (१२ फेब्रुवारी) हा जन्मदिवस. त्याला शतशः नमन! डॉ. विजयश्री हेमके, ९४२१७३२६८० (प्राणिशास्त्र विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, चिखली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT