कांदा सल्ला
कांदा सल्ला 
कृषी सल्ला

कांदा, लसूण पीक सल्ला

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे

सद्यस्थितीत रब्बी कांद्याची; तसेच बीजोत्पादनाकरिता लावलेल्या कांद्याची रोपे शेतात उभी आहेत. रांगडा कांद्याची काढणी एकतर झालेली आहे किंवा होण्याच्या स्थितीत आहे. काहींच्या शेतात लसूण पक्व झाला असून तो काढून त्याला साठवणीत ठेवणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत पुढील प्रकारे व्यवस्थापन करावे. रब्बी कांद्याच्या उभ्या पिकासाठी :

  • सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड २) ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी फवारणी करावी. कांदा पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर राहते.
  • पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच करपा, पांढरी सड, मुळकूज आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांचे नियंत्रण करावे; तसेच लाल कोळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
  • बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांपूर्वी बंद कराव्यात.
  • डेंगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरित काढून टाकावे.
  • पिकाला जमिनीचा मगदूर, तापमान व पिकाची गरज पाहून ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीकसंरक्षण :
  • फुलकीड व करपा, पांढरी सड, मुळकूज नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी पहिली फवारणी ः प्रोफेनोफॉस १ मि.लि. अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम दुसरी फवारणी ः फिप्रोनील १ मि.लि. अधिक प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम तिसरी फवारणी ः कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्लाझोल १ ग्रॅम
  • पहिली फवारणी अगोदरच केली असल्यास आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी करावी. दोन्ही फवारण्यांनंतरही नियंत्रण न झाल्यास तिसरी फवारणी करावी. फवारणीमध्ये आवश्‍यकतेनुसार १०-१५ दिवसांचे अंतर ठेवावे.
  • लाल कोळी नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी ८० टक्के विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डायकोफॉल २ मि.लि.
  • लसूण पिकाची काढणी व साठवण

  • लसूण काढण्याच्या २० दिवस आधी कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्या फवारण्या थांबवाव्यात.
  • पिकाची जवळ-जवळ ५० टक्के पाने सुकल्यानंतर लसणाची काढणी करावी.
  • लसणाची काढणी गड्ड्यांसहित करावी.
  • लसूण गड्ड्यांसह २-३ दिवस शेतातच सुकू द्यावा. यामुळे लसणाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होते.
  • लसूण लहान कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा. फुटलेले गड्डे वेगळे करावेत. तसेच लहान गड्डे प्रतवारी करून वेगळे काढावेत.
  • काढलेल्या लसणाची पाने ओली असताना २० ते २५ सारख्या आकाराच्या गड्यांची जुडी बांधावी व पानांची वेणी बांधून घ्यावी.
  • त्यानंतर अशा जुड्या झाडाखाली किंवा उघड्या असलेल्या छपरीत १५ दिवस सुकवाव्यात. त्यानंतर त्या साठवणगृहात ठेवाव्यात.
  • कांदा बीजोत्पादनाच्या उभ्या पिकाकरिता

  • फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची फवारणी टाळावी; अन्यथा मधमाश्‍यांना हानी पोचते.
  • अत्यंत आवश्यक असेल तरच हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मधमाश्‍यांची संख्या कमी झाल्यास एकरी एक-दोन मधमाश्‍यांच्या पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
  • पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • सामान्यतः बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यात ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरवात करावी.
  • सर्व गोंडे एकदम तयार होत नाही. ते जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे ३ ते ४ वेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत.
  • गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले व पाेचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.
  • मळणी केलेले बी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.
  • डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५-२२२०२६ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT