premature maturation of  Finger millet
premature maturation of Finger millet 
कृषी सल्ला

उन्हाळी नाचणी अकाली पक्वतेची कारणे

पराग परीट 

सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य रोपांना फुलोरा अवस्थेत कणसे येऊ लागली आहेत. पंचवीस दिवसांहून जास्त वयाच्या रोपांची लागवड, हवामान बदलामुळे हे दिसून येत आहे. नाचणीचे आहारातील महत्त्व, बाजारात वाढलेला खप आणि दुभत्या जनावरांना ऐन उन्हाळ्यात उपलब्ध होणारा हिरवा सकस चारा या हेतूने नाचणीची उन्हाळी लागवड वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राबविलेल्या उन्हाळी नाचणी उत्पादन प्रात्यक्षिकांच्या यशस्वितेनंतर या वर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी प्रयोगशील शेतकऱ्यांनी उन्हाळी नाचणीची लागवड केली.  सध्या राज्यातील काही भागांत नाचणी रोपांची लागवड झाल्यावर अल्पावधीतच मुख्य रोपे फुलोरा अवस्थेत येत असल्याचे किंवा रोपांना कणसे येऊ लागल्याचे दिसून येत आहे. पिकाची उंची, फुटवे, पालेदार वाढ, पेरांची संख्या हे अपेक्षेप्रमाणे न येता अगदी पाच ते सात इंच उंचीची रोपेच अकाली पक्व होत असल्याचे काही भागातील चित्र आहे. उन्हाळी हंगामात नाचणी अकाली पक्व होण्यामागे काही कारणे आहेत. त्याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना केल्यास पुढे चांगले उत्पादन मिळू शकते. पीक व्यवस्थापनाचे मुद्दे 

  •  रोपाद्वारे उन्हाळी नाचणीची लागवड करण्यासाठी डिसेंबरच्या वीस तारखेपर्यंत बियाण्याची रोपवाटिकेत पेरणी करणे आवश्यक असते. रोपे २१ ते २५ दिवसांची असताना त्याची मुख्य शेतात लागवड झाली पाहिजे. पंचवीस दिवसांहून जास्त वयाच्या रोपांची लागवड केल्यास फुटव्यांची संख्या कमी मिळते. या रोपाला कमी कालावधीमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर लहान कणीस बाहेर पडते. हेच कणीस रोपावर वाढू दिल्यास फुटव्यांची वाढ चांगली होत नाही. उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होतो. 
  •  रोप लागवड करताना मुख्य शेतात आधी पाणी देऊन शेत भिजवून घेतले असल्यास उपलब्ध ओलाव्याच्या स्थितीत रोपांची मुळे अंगठ्याच्या साह्याने साधारण अर्धा इंच खोलीपर्यंत रुतवून रोपांची मुळे मातीआड करणे अपेक्षित असते. पण जर रोपांची मुळे जास्त खोलीवर रुतवली गेली असतील, तर मात्र फुटवे फुटायला वेळ लागतो. अपेक्षित फुटव्यांची संख्या मिळत नाही आणि रोप अकाली पोटरी अवस्थेत येते. 
  •  जमिनीतून नत्राची उपलब्धता कमी झाली तर पिकाची शाखीय वाढ रोडावते, उंचीदेखील कमी राहते. 
  •  रोपवाढीच्या काळात रात्रीच्या वेळी थंडी आणि दिवसा कडक ऊन असे वातावरण जास्त काळ राहिले, तर रोपांवर वातावरणातील बदलांचा परिणाम होऊन अकाली पोसवतात. 
  •     तणनाशकांचा अतिवापर  रोपांच्या खुरट्या वाढीस कारणीभूत ठरतो. 
  • (टीपः कोल्हापूर भागात अकाली पक्वतेला पोसवणे हा शब्द वापरला जातो.) उपाययोजना 

  • सध्या नाचणीच्या प्रक्षेत्रावरील दहा टक्के पीक अकाली फुलोरा किंवा कणसे भरण्याच्या अवस्थेत आले असेल तर हे नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. पण प्रमाण यापेक्षा जास्त असेल तर ज्या रोपांना सध्या कणसे आली आहेत, ती धारदार विळ्याने कापून घ्यावीत.
  • कणसे कापल्यानंतर प्रती लिटर पाण्यात पाच ग्रॅम १९:१९:१९ आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास फुटव्यांची जोमदार वाढ होण्यास सुरुवात होते.
  • जमिनीतून एकरी बारा किलो नत्र दिल्यास फुटवे वाढण्यासाठी चांगला उपयोग होतो. 
  • अधूनमधून पिकावर दशपर्णी अर्काची फवारणीदेखील उपयुक्त ठरते.
  • (टीप : लेखातील माहिती गेल्या दोन वर्षांत पन्हाळा तालुक्यात राबविलेल्या उन्हाळी नाचणी उत्पादनविषयक प्रयोगातील निरीक्षणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आलेल्या अनुभवांवरून दिली आहे.) संपर्क ः पराग परीट, ९९२११९०६७१, (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, गगनबावडा, जि. कोल्हापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

    Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

    Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

    Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

    Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

    SCROLL FOR NEXT