The nematodes that cause nodules on the roots adversely affect the water and nutrients absorbed by the crop.
The nematodes that cause nodules on the roots adversely affect the water and nutrients absorbed by the crop. 
कृषी सल्ला

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना

डॉ. कल्याण आपेट, डॉ. धीरज कदम

विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान व उपाययोजनांना उशीर होतो. तोपर्यंत १२ ते १३ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊन जाते. त्यामुळे सूत्रकृमींची शंका आल्यास त्वरित प्रयोगशाळेतून निदान करून घ्यावे. सूत्रकृमी म्हणजे काय? सूत्रकृमी हे जमिनीमध्ये राहणारे अतिसूक्ष्म कृमी असून, यजमान झाडांच्या मुळांवर प्रादुर्भाव करतात. सूत्रकृमी आपली सोंड मुळात आणि झाडाच्या जमिनीखालील भागात खुपसतात. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर झाडाला मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. काही प्रजाती पान आणि फुलातही सोंड खुपसून रस शोषतात. सूत्रकृमीमुळे अन्य रोगकारक जिवाणू, विषाणू किंवा बुरशीचे वहन केले जाते. मात्र सर्वच सूत्रकृमी पिकांसाठी हानिकारक असतात, असे नाही. तर त्यांच्या काही प्रजाती या पिकांसाठी हानिकारक सूक्ष्मजीवांवरही जगतात. त्यामुळे त्यांचा वापर मित्र कीटकाप्रमाणेच जैविक नियंत्रणासाठी केला जातो. यामुळे होतो प्रसार

  • सूत्रकृमीचा प्रसार हा प्रादुर्भावग्रस्त जमिनीत वापरली जाणारी शेती अवजारे, चप्पल व बूट यासोबत येणाऱ्या मातीमधून होऊ शकतो.
  • प्रादुर्भावग्रस्त रोपे, बेणे
  • प्रादुर्भावग्रस्त जमिनीतून वाहत येणाऱ्या पाण्यासोबतही सूत्रकृमी शेतात येऊ शकतात.
  • काही वेळा पक्षी किंवा कीटकांमार्फतही प्रसार होतो.
  • त्वरित निदान आवश्यक 

  • सूत्रकृमींच्या अनेक जाती असून, त्यातील काही जाती मुळांवर गाठी निर्माण करतात. अशा प्रकारे मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या जातींना इंग्रजीमध्ये ‘रूट नॉट निमॅटोड’ असे म्हणतात. मुळावरील गाठी या एका लक्षणाव्यतिरिक्त अन्य सर्व लक्षणे सारखीच दिसतात. अन्य सूत्रकृमींनी केलेल्या मुळांवरील इजा शोधणे अवघड असते. गाठी तयार न करणाऱ्या सूत्रकृमींमुळे पिकांच्या मुळ्या वेड्यावाकड्या होतात. सूत्रकृमी असल्याचे नक्की करण्यासाठी प्रयोगशाळेतच विश्‍लेषण करावे लागते.
  • दोन्ही प्रकारचे सूत्रकृमी मुळांच्या पेशीमधून रस शोषतात. त्यामुळे मुळांवर जखमा होतात, तेथील पेशी मरतात. पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळांची व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते. वनस्पतीच्या जमिनीवरील लक्षणांमध्ये पाने पिवळी पडलेली दिसतात. जमिनीमध्ये पाण्याचा अंश पुरेसा असतानाही पीक सुकल्यासारखे दिसते किंवा झाड संपूर्ण सुकते.
  • सूत्रकृमींमुळे आढळणारी लक्षणे ही अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखीच असल्याने सहजासहजी लक्षात येत नाहीत. लक्षात येऊन उपाययोजना करेपर्यंत सूत्रकृमींमुळे उत्पादनात १२ ते १३ टक्के घट होते.
  • सूत्रकृमींच्या गाठी वेगळ्या कशा ओळखायच्या? सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या मुळावर वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार सूज येऊन गाठी तयार होतात, त्यास निमॅटोड गॉल्स असे संबोधले जाते. त्यावरून सूत्रकृमींचा प्रादुर्भाव ओळखणे सोपे असते. लक्षणे दाखणाऱ्या झाडांभोवतीची माती बाजूला सारून ते झाड, रोपटे उपटून घ्यावे. त्याची मुळे पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावीत. मुळांवर गाठी आहेत का, हे पाहावे. काही डाळवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठी आणि सूत्रकृमींच्या गाठी यामध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ शकतो. मात्र त्यांमधील फरक लक्षात घ्यावा. डाळवर्गीय पिके उदा. हरभरा, मुग, मटकी, उडीद, तूर किंवा तेलबिया पिके उदा. सोयाबीन, भुईमूग यांच्या मुळावर असलेल्या गाठी सहजासहजी वेगळ्या होतात. त्या पूर्णपणे गोलाकार आणि काही प्रमाणात लालसर असतात. या गाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंमुळे तयार होतात. सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या गाठी वरीलप्रमाणे सहजासहजी वेगळ्या होत नाहीत. या गाठी म्हणजे मुळाचीच जादा झालेली बाह्यवाढ होय. या गाठींचा रंग मुळाप्रमाणेच असतो. याआधारे आपण फरक ओळखू शकतो. मुळांवर अशा गाठी तयार झाल्या की मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य वहनाची क्षमता कमी होते. भाजीपाला पिकात अशा गाठींना तडे जाऊन त्या उघड्या पडतात. त्यामधून अन्य हानिकारक बुरशी, जिवाणूंचा शिरकाव होऊन रोग निर्माण झाल्याने गुंतागुंत वाढते. लक्षणे 

  • सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकात मरसदृश लक्षणे दिसतात. जमिनीमध्ये मुबलक प्रमाणावर ओलावा असूनही पीक सुकून जाते. -प्रादुर्भावग्रस्त भाजीपाला पीक निरोगी पिकापेक्षा कमी वाढते. त्यास फुले, फळे कमी लागतात. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत असे पीक मरून जाते. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव उष्ण, बागायती वालुकामय जमिनीत जास्त दिसून येतो.
  • जरी सूत्रकृमींच्या अतिप्रादुर्भावामुळे पीक पूर्णतः मरून जाऊ शकते. मात्र मोठ्या वृक्षांमध्ये फारसे नुकसान दिसून येत नाही. मोठ्या झाडामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव शोधणेही कठीण असते. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाझुडपांची वाढ मंदावून उत्पादन कमी होते. शोभिवंत वृक्षांमध्ये सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटते. फांद्या वरून खाली वाळू शकतात.
  • सूत्रकृमी विषयी तुलनेने जागरूकता कमी आहे. तसेच अन्नद्रव्यांच्या लक्षणाशी असलेल्या साधर्म्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येण्यातच उशीर होतो. नियंत्रण थोडे कठीण होते.
  • सूत्रकृमी नियंत्रणाचे एकात्मिक उपाय 

  •  उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  •  पिकांची फेरपालट करावी.
  •  पिकामध्ये झेंडूची लागवड हा सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी उत्तम उपाय आहे.
  • मिश्र पिकांची लागवड करावी.
  • धैंचा, ताग यासोबतच मूग, उडीद, चवळी या सारखी द्विदलवर्गीय किंवा हिरवळीची पिके घ्यावीत.
  • सेंद्रिय खते उदा. निंबोळी किंवा एरंड पेंड १.५ ते २ टन प्रति हेक्टर या प्रमाणात १५ दिवस अगोदर वापर करून पाणी द्यावे.
  • सूत्रकृमींचा प्रादुर्भाव नसलेल्या किंवा प्रतिकारक रोपांचा वापर करावा.
  • पॅसिलोमायसिस लिलियानस ही मित्रबुरशी सूत्रकृमींची नैसर्गिक शत्रू आहे. पॅसिलोमायसिस लिलियानस प्रमाणेच स्युडोमोनस फ्ल्यूरोसन्स किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी यांची १० ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
  • जमिनीत शेणखतातून पॅसिलोमायसिस लिलियानस, स्युडोमोनस फ्ल्यूरोसन्स किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी या पैकी एक ५ ते १० किलो प्रमाणात १०० किलो संपूर्ण कुजलेल्या, ओलसर शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी जमिनीत किंवा फळझाडांना खोडालगत मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. (ॲग्रेस्को शिफारस)
  • फ्लुयोपायरम (३४.४८ % एससी) २५० ते ३०० मि.लि. प्रति एकर या प्रमाणात आळवणीद्वारे द्यावे. किंवा ॲबामेक्टीन (१.८ ईसी) ४० मि.लि. प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून जमिनीमधून द्यावे.
  • -  डॉ. कल्याण आपेट (विभागप्रमुख), ९९२३३५७४३० (वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

    Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

    Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

    Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

    Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

    SCROLL FOR NEXT