डॉ. प्रमोद बकाने, उदयकुमार खोब्रागडे
Food Processing : विदर्भातील गावपातळीवर कृषी प्रक्रिया केंद्रांची स्थापना करण्यासाठी तांत्रिक माहिती, प्रशिक्षण आणि सल्ला देण्याचे काम अकोला येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाद्वारे केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी नवनवीन कृषी प्रक्रिया यंत्राची निर्मिती आणि त्यांच्या विस्तारासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सामान्यतः गावपातळीवरील कृषी प्रक्रिया केंद्रामध्ये तूर, मूग, हरभरा, गहू इ. अन्नधान्याची सफाई, प्रतवारी आणि पॉलिशिंग यांची यंत्रे, डाळ मिल आणि कोरडवाहू फळांवरील छोट्या मोठ्या प्रक्रिया करण्याची आवश्यकता भासते. हे लक्षात घेऊन अकोला विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाद्वारे पिकेव्ही मिनी डाळ मिल, पीकेव्ही सफाई प्रतवारी यंत्र, पीकेव्ही स्क्रू पॉलिशर, पंदेकृवि सीताफळ गर व बिया निष्कासन यंत्र, पंदेकृवि जांभूळ गर व बिया निष्कासन यंत्र इ. यंत्रे विकसित केलेली आहे. अशा यंत्रांचा समावेश असलेले कृषी प्रक्रिया केंद्र गावपातळीवर स्थापन केल्यास सर्वांचा फायदा होतो. काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासोबतच दर्जेदार उत्पादन मिळू शकते. या विभागाच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सुमारे ३१ कृषी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यातून शेतकरी आणि त्यांची कुटुंबे प्रक्रिया केंद्राशी जोडली जात आहेत. कृषी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीबाबत या विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. अधिक माहितीसाठी संपर्क ः ०७२४- २२५८२६६.
कृषी प्रक्रिया केंद्रासाठी आवश्यक यंत्रांची माहिती
पीकेव्ही मिनी डाळ मिल
कमी भांडवल उभारणीतही सर्व प्रकारच्या दाळी तयार करण्यासाठी उपयुक्त. तूर, हरभरा, सोयाबीन, मसूर, चवळी, लाखोळी इ. कडधान्याची डाळ यंत्रामध्ये करता येते. या मिनी डाळ मिलचा रोलर बदलून टुश्या असलेले गहू साफ करण्याकरिता तसेच पावसामुळे अंशत: खराब झालेले मूगही स्वच्छ करता येतात. ग्रामीण स्तरावर घरगुती उद्योग म्हणूनही हे यंत्र उत्कृष्ट आहे. हे यंत्र ३ अश्वशक्तीवर चालते. तुरीसाठी १०० ते १२५ किलो प्रति तास, मूग १२५-१५० आणि उडीद १००-१२५ किलो प्रति तास डाळ तयार करण्याची क्षमता आहे.
पीकेव्ही सफाई, प्रतवारी यंत्र
डाळ मिलचा व्यवसाय अधिक प्रमाणात वाढल्यास धान्याची सफाई, प्रतवारी करण्याकरिता वेगळ्या यंत्राची गरज भासते, म्हणून तूर, मूग, उडीद यासोबतच अन्य धान्यांची सफाई व प्रतवारी करण्याकरिता या यंत्राचा उपयोग होतो. सफाई केलेल्या धान्याला बाजारात चांगला मिळण्यास मदत होते. हे यंत्र ३ अश्वशक्तीवर चालत असून, कार्यक्षमता ९२ टक्के आहे.
पीकेव्ही स्क्रू पॉलिशर
हे यंत्र डाळीला पॉलिश करण्यासाठी उपयुक्त आहे. या यंत्रामध्ये तेल व पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. या दोन्ही घटकाच्या वापरामुळे डाळ पिवळी होऊन, चकाकी येते. पॉलिश केलेल्या डाळीला अधिक बाजारभाव मिळतो. हे यंत्र १ अश्वशक्तीवर चालते. त्याची क्षमता १०० ते १२५ किलो प्रति तास आहे.
पंदेकृवि सीताफळ गर व बिया निष्कासन यंत्र
या मशिनमध्ये सीताफळ गर व बिया वेगळे करण्याची प्रक्रिया खूपच जलद होते. यंत्राद्वारे गर काढण्याच्या प्रक्रियेत मानवी हाताळणी कमी राहून गराची प्रत चांगली राहते. काढलेला गर सीलबंद करून शीतगृहामध्ये (- २० अंश सेल्सिअस) तापमानात साठविता येतो. या पद्धतीने साठवण केल्यास गराचा रंग बदलत नाही. सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर या गराला बाजारात चांगला दर मिळतो. हे यंत्र ०.५ अश्वशक्तीवर चालत असून, क्षमता ७० ते ८० किलो प्रति तास आहे. तसेच या यंत्राच्या साह्याने जांभूळ गर व बियासुद्धा वेगळ्या करता येतात. जांभळाचा गरही -२० अंश सेल्सिअस तापमानास १ वर्षापर्यंत साठवता येतो. या साठवलेल्या गरापासून विविध सरबते, रस करता येत असल्याने त्याचा चांगली मागणी असते.
उदयकुमार खोब्रागडे, ८६९८५७९६८९
(वरिष्ठ संशोधन सहायक, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.