शुध्द पाणी सुविधा, झा़डांची लागवड व संगोपन
शुध्द पाणी सुविधा, झा़डांची लागवड व संगोपन 
ग्रामविकास

विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक पावले 

रवींद्र भताने 

लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला विविध समस्यांनी ग्रासले होते; पण स्वतःला बदलायचे असे ठरवल्यानंतर लोकसहभाग, सरपंच, प्रशासन आदींच्या साथीने विविध उपक्रम गावात राबवण्यास सुरवात झाली. त्यातून गावाने अल्पावधीत आपले रुपडे बदलण्यास व विकासाच्या वाटेवर आश्‍वासक पाऊल टाकण्यास सुरवात केली आहे.  अलीकडील काळात अनेक गावांनी विधायक उपक्रमांद्वारे आपली प्रगती करण्यास सुरवात केली आहे. लोकसहभाग व त्यास प्रशासनाची साथ हा घटक त्यात महत्त्वाचा राहिला आहे. लातूर जिल्ह्यात अलगरवाडीच्या (ता. चाकूर) ग्रामस्थांनी याच पद्धतीने विकासाचा संकल्प केला. आपल्यात बदल करण्यास सुरवात केली. सन २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोविंद माकणे यांच्यावर ग्रामस्थांनी सरपंचपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर एकमेकांना विश्‍वासात घेत गावाने विविध उपक्रमांना सुरवात केली आहे.  कंपोस्ट खतनिर्मिती  घनकचरा व्यवस्थापन झाले तरच गावात स्वच्छता नांदेल हे ओळखून माकणे यांच्या संकल्पनेतून कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू झाला आहे. ओला व वाळलेला कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छतादूत नेमण्यात आला आहे.  कार्यालयाचे नवे रूप  ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत मोडकळीस आली होती. आता इमारतीचे रूपांतर सुसज्ज इमारतीत झाले आहे. काही दुरुस्तीची कामे करण्याबरोबरच काही भाग नव्याने बांधून इमारत वातानुकूलित केली आहे. तालुक्यात सुसज्ज अशी ही ग्रामपंचायतीची इमारत म्हणता येईल.  व्यायामशाळा  गावात खुली व्यायामशाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी साडेसात लाख रुपयांची मदत केली आहे. ग्रामस्थ त्याचा दररोज फायदा घेताना दिसत आहेत.  ई-लर्निग शाळा  पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत असलेल्या इथल्या जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तापूर्ण आणि डिजिटल शिक्षणाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलांसाठी शुद्ध पाणी, सुसज्ज संगणक कक्ष, अद्ययावत इमारत आदी सोयी आहेत. विद्यार्थी संख्याही वाढली आहे.  सीसीटीव्ही  गावावर निगराणी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी १२ ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात आले आहेत. गावात अस्वच्छता पसरविणाऱ्यास समज दिली जाते.  महिला बचत गट  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ३० महिला बचत गट स्थापन केले आहेत. उमेद अंतर्गत या गटांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. पापड, मिरची पावडर, लोणचे, चटणी अशा लघू उद्योगांतून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहात आहेत.  स्वच्छ पाण्यासाठी ‘आरओ’ फिल्टर ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ‘आरओ प्लॅंट’ बसविला आहे. गावातील सर्व सार्वजनिक कूपनलिका सुरू करून एक हजार लिटर प्रतितास क्षमतेची फिल्टर प्लॅंट सुविधा देण्यात आली आहे. स्वच्छ पाणी अल्पदरात दिले जाते. पाच रुपयांना २० लिटर असा दर आहे.  जल पुनर्भरण, सांडपाणी व्यवस्थापन घरातील सांडपाणी अथवा पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. गाव डासमुक्त करण्यासाठी व जमिनीतील पाणीपातळी वाढावी यासाठी प्रत्येक घराशेजारी एक असे ३०७ शोषखड्डा बांधण्यात आले आहेत. प्रत्येक घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जल पुनर्भरण व्यवस्थापन करण्यात आले आहे. परिणामी गावातील घाणीचे साम्राज्य हद्दपार झाले असून, पाणीपातळीही वाढली आहे. प्रत्येक शोषखड्ड्याशेजारी एक झाड लावण्यात आले आहे. गेल्या वर्षात गावात आरोग्याची समस्या फारशी उद्भवलेली नाही. मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे. ‘गावात डास दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.  हागणदारीमुक्तीचे पेलले आव्हान  जवळपास तीन हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावात शौचालय घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याचे आव्हान होते. जनजागृती व ग्रामसभेत प्रत्येकाचा सहभाग नोंदविण्याच्या माध्यमातून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. गाव हागणदारीमुक्ती म्हणून प्रशासनाकडून घोषित झाले आहे.  गावचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम 

  • ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के भरणाऱ्यांना दळण मोफत दळून दिले जाते. 
  • ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित 
  • गावात वॉश बेसिनची सुविधा 
  • स्वच्छ भारत अभियांतर्गत संपूर्ण गाव हागणदारीमुक्त 
  • पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना मीटर 
  • मृतांच्या अंत्यविधीसाठी संबंधित कुटुंबीयांना पाच हजार रुपयांची मदत 
  • गावात विविध प्रकारच्या आठ हजार ७०० झाडांची लागवड. संगोपन ग्रामपंचायतीमार्फत. 
  • गावातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढून सिमेंट रस्ते 
  • गावाला मिळालेले सन्मान 

  • २०१८- आयएसओ ९००१:२०१५ मानांकन 
  • २०१७-१८- पंचायत समिती, चाकूरचा तालुकास्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा प्रथम पुरस्कार. 
  • लातूर जिल्हा परिषद- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार 
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान- विभाग स्तरावर प्रथम पुरस्कार 
  • प्रतिक्रिया  ग्रामस्थांचे जीवनमान सुसह्य करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. शासनाच्या योजना यशस्वी राबविल्या जात आहेत. विकासाचा पायंडा गावाने घालून दिला आहे. तो पुढेही कायम टिकवण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात प्रत्येक घरावर संबंधित कुटुंबातील प्रमुख महिलेचे नाव टाकण्याचा मानस आहे. गोविंद माकणे - ९४२२४६९५०६  सरपंच, अलगरवाडी  माझी १६ एकर शेती आहे. नित्यनियमाने अॅग्रोवनचे वाचन करत असतो. त्यातील यशोगाथा वाचून टोमॅटो, कोबी, कांदा पिकांची शेती करीत आहे. गावातील शेतकरीदेखील पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला व अन्य पिके घेत आहेत.  महादेव सांगवे - ९७६४०७९७९२  तरुणांना खेळाचे मैदान व वाचनालय, त्यात विविध प्रकारची पुस्तके व वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. बरेच तरुण त्याचा लाभ घेत स्वतःला घडवत आहेत.  - रमाकांत ढोबळे - ८४२१९७५५४८  पोलिस पाटील  बचत गटांच्या माध्यमातून आम्ही महिला वेगवेगळे पदार्थ बनवत आहोत. त्यामुळे हातात पैसे येत आहेत. ग्रामपंचायतीकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.  -ज्योती कोरे - ८६९८९९३६१९  अध्यक्षा, बसवेश्वर स्वंय साह्यता महिला बचत गट   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT