गांडूळ कल्चर सोडून चांगल्या दर्जाचे खत तयार केले जाते.
गांडूळ कल्चर सोडून चांगल्या दर्जाचे खत तयार केले जाते.  
ग्रामविकास

कचरा प्रक्रियेद्वारे गांडूळखत निर्मितीचा बनवडी पॅटर्न

हेमंत पवार

गावे आणि शहरांमधून सध्या कचऱ्याचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यावरून वादावादी, संघर्षाचे स्वरूपदेखील पाहायला मिळाले आहेत. मात्र कचऱ्याचा योग्य वापर म्हणजे त्यावर प्रक्रिया करून उत्तम प्रकारे खतनिर्मिती साधता येते. हेच सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड या तालुका ठिकाणापासून जवळच्या बनवडी ग्रामपंचायतीने सिद्ध करून दाखवले आहे. त्या पावलावर पाऊल ठेवून तालुक्यातील ५५ गावांनीही पुढाकार घेतला. प्रायोगिक तत्त्वावर राज्यात पहिलीच ठरावी अशी गांडूळखत निर्मितीची सामूहिक चळवळ असे त्यास म्हणता येईल. त्यासाठीची कार्यवाही सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कचऱ्याची समस्या त्यातून कमी होऊन ग्रामपंचायतींना उत्पन्नाचेही साधनही उपलब्ध होणार आहे. राज्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या व शहरांमधून कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हा कचरा कोठे टाकायचा यावरूनही अनेक वाद सुरू आहेत. अनेक ठिकाणी ही बाब न्यायप्रविष्टही झाली आहे. त्याची समस्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून आत्ताच त्यावर उपाय शोधणे गरजेचे होते. त्याचाच विचार करून सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड पंचायत समितीने तोडगा काढण्यासाठी पाऊल टाकले. त्याचाच भाग म्हणून राज्यात बहुधा पहिल्यांदाच कऱ्हाड तालुक्यातील तब्बल ५५ ग्रामपंचायतींमध्ये कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती करण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. पंचायत समितीच्या सभापती सौ. शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित गावात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या ३२ ग्रामपंचायतींमध्ये हे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. काय आहे बनवडी पॅटर्न? कऱ्हाड शहराजवळच बनवडी गाव वसले आहे. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकरराव खापे व सहकाऱ्यांनी कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचा मानस केला. त्यास ग्रामस्थांनाही प्रतिसाद दिला. मात्र बनवडी हे गाव शहराजवळच असल्याने तेथे जागेची मोठी अडचण आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर जागा घेऊन गांडूळखत प्रकल्प सुरू केला. केवळ सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्च असणाऱ्या या प्रकल्पामुळे गावातील ६० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होऊ लागली. या उपक्रमाची शासन स्तरावर दखल घेण्यात येऊन शासनाने हा ‘बनवडी पॅटर्न’ गावोगावी राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हजारमाची, किवळचाही पुढाकार कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची (ओगलेवाडी) किवळ व अन्य ग्रामपंचायतींनीही बनवडीच्या पाऊलावर पाऊल टाकत असा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाचे शेड तयार केले आहे. बनवडी पॅटर्नप्रमाणे अनेक ठिकाणी सध्या कचऱ्यापासून खतनिर्मितीची कार्यवाही सुरू आहे. सध्या बारा ग्रामपंचायतींंमधून खत तयार झाले असून, अनेक ठिकाणी पॅकिंग करून विक्रीही सुरू झाली आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती ज्या ग्रामपंचायतींकडे स्वतःची जागा नाही, त्यांनी ती भाडेतत्त्वावर घेऊन प्रकल्प राबवून दाखवला आहे. शेड तयार केल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा कुजवण्यासाठी ‘बेड’ तयार करून घ्यावे लागतात. त्यासाठी गावातील ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे नियोजन संबंधित ग्रामपंचायतींनी करावयचे आहे. या शेडमध्ये काही दिवसांनी गांडुळे सोडली जातात. सुमारे अडीच महिन्यानंतर दर्जेदार खत तयार होते. या प्रकल्पासाठी सुमारे दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. एकदा गुंतवणूक केली की ती दीर्घकाळ असल्याने ग्रामपंचायतींना खतापासून कायमस्वरूपी उत्पन्न मिळण्याचेही साधन तयार झाले आहे. त्याचा उपयोग गावच्या विकासकामांसाठी करता येणार आहे. या प्रकल्पासाठी युनियन बॅंकेच्या कऱ्हाड शाखेच्या वतीने सामाजिक बांधीलकीमधून ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी ६५० बकेटस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया शहरासह गावोगावी सध्या कचऱ्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे खतनिर्मिती हा कमी खर्चिक व कामयस्वरूपी उत्पन्न देणारा चांगला पर्याय आहे. तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी आम्ही या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास केला. त्यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निधीतून भाडेतत्त्वावर जागा घेतली व शेड उभारले. -शंकरराव खापे - ९५२७३१३३७५ प्रवर्तक, कचरा प्रकल्प, बनवडी कऱ्हाड पंचायत समितीने हजारमाची ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यांना आवाहन दिले. त्यानुसार सुमारे दोन लाख ९० हजार रुपयांचा निधी संकलित झाला. -एन. व्ही. चिंचकर ग्रामसेवक, हजारमाची  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT