चेतन टोंगे यांनी बेडवर कपाशी व आंतरपीक तुरीची लागवड केली आहे.
चेतन टोंगे यांनी बेडवर कपाशी व आंतरपीक तुरीची लागवड केली आहे.  
ग्रामविकास

‘जल है तो कल है’चा मंत्र धामणा गावाने आणला कृतीत

Vinod Ingole

पाण्याचे महत्त्व समजलेल्या धामणा (ता. जि. नागपूर) गावातील शेतकऱ्यांनी जलसंवर्धनाचा वसा घेतला. पाणीबचतीचा वारसा जपण्याचे काम करणाऱ्या या गावातील एकूण क्षेत्रापैकी ९० टक्‍के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. कापूस, भाजीपाला, चारा पिके यांच्यात ठिबकचा वापर होत असून ठिबकला व्यवस्थापनाची जोड देत हेक्टरी उत्पादकता वाढविण्याचेही शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जल है तो कल है’ हाच मंत्र या गावाने आपल्या कृतीतून दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील धामणा गावात सुमारे ४० खातेदार आहेत. त्यालगत असलेल्या मोहगाव खुर्द व शिरपूरचे प्रत्येकी ७८ खातेदार आहेत. धामणाचे भौगाेलिक क्षेत्र ४०० हेक्‍टर तर वहितीखाली ८१ हेक्‍टर क्षेत्र आहे. मोहगावचे १४५ हेक्‍टर तर शिरपूरचे १४७ हेक्‍टर क्षेत्र आहे. या गावामध्ये बहुतांश क्षेत्र आज ठिबकखाली आले अाहे. आकडेवारीतच सांगायचे तर धामना परिसरात ३०.२० हेक्‍टर, मोहगाव ६२ हेक्‍टर, शिरपूर ३० हेक्‍टर याप्रमाणे ठिबकखालील क्षेत्र आहे. यात कृषी विभागाचे अनुदान मिळालेल्या क्षेत्राचीच नोंद घेण्यात आली. आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांनी आपल्या बळावर उभारलेल्या ठिबक सिंचनाची नोंद त्यात नाही. परिवर्तनासाठी पुढाकार गावाला परिवर्तनाची दिशा दाखवण्यामध्ये गोविंदा आणि चंद्रभान टोंगे यांचा पुढाकार आहे. गावात सर्वात प्रथम ठिबक त्यांनी २०१० च्या दरम्यान बसविले. गोविंदा यांच्यासह चार भावंडे शेतीत राबतात. त्यांची एकूण जमीनधारणा १२ एकर आहे. हे संपूर्ण शिवार ठिबकखाली आहे. त्यांच्या अनुकरणातून गावात ठिबक संच बसविण्यास सुरवात झाली. कृषी सहायक श्रीप्रकाश टोंगसे यांचाही गावाला परिवर्तनाच्या वाटेवर नेण्यामध्ये पुढाकार आहे. ठिबकच्या जोडीला सरी वरंब्यावरील लागवडीलादेखील चालना देण्यात आली. पावसाचे अतिरिक्‍त पाणी सरीतून निघून जाते आणि ‘बेड’वर ओलावा कायम राहतो. उत्पादकता वाढीसाठी ठिबकच्या जोडीला हे देखील कारण ठरले. या तंत्राचा प्रसार टोंगसे यांनी गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर केला आहे. त्याचीच दखल घेत कृषी विभागाचे तत्कालीन अवर सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्‍त विकास देशमुख यांनीदेखील गावाला भेट देत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास उत्सुक या गावाचे कौतुक केले. संपूर्ण गाव झाले कृतिशील आज धामणा गाव ९० टक्‍के ठिबकखाली आले आहे. पाणी थेंबानं आणि पीक जोमानं हा विचार गावाने आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणला. भाजीपाला पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र गावात आहे. गावातील गोविंदा आणि चंद्रभान यांनी अभ्यासूबाणा जपत राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. शेडनेट, पॉलीहाउससारखे हायटेक तंत्रज्ञान डोळ्याखालून घातले. त्यातील विदर्भातील कोरडवाहू शेतीला पोषक असे तंत्रज्ञान अंगीकारण्याचे ठरविले. त्यातच ठिबकचा समावेश होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (अकोला) मार्गदर्शक पुस्तक हाताळले. पैशाची सोय नसली तरी नातेवाइकांकडून उसनवारी करीत ठिबकचा पाठपुरावा न सोडल्याचे टोंगे म्हणाले. स्वमालकीचा ट्रॅक्‍टर, टूमदार घर, नैसर्गिक स्राेतांचा विकास या बाबी साधताना ‘पाण्याचे व्यवस्थापन’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरला. कपाशीची वाढली उत्पादकता ठिबक आणि प्रभावी व्यवस्थापन यामुळे एकरी उत्पादनात वाढ झाल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला. देवा टोंगे यांनी कपाशीची उत्पादकता टप्प्याटप्प्याने एकरी चार ते पाच क्विंटलवरून २२ ते २५ क्‍विंटल पर्यंत मिळविली आहे. खासगी कंपनीत नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर देवा आता शेतीतच कष्ट उपसतात.

युवा शेतकऱ्याचा पाणीबचतीवर भर चेतन टोंगे हा गावातील युवा शेतकरी. वयाच्या १८ व्या वर्षीच चेतनने कुटुंबाच्या शेतीची सूत्रे आपल्याकडे घेतली. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देण्यासाठी त्याने तीन गायींचे संगोपन चालविले आहे. चेतनकडे जेमतेम साडेतीन एकर शेती. पाणी बचतीच्या ध्यासाने हे संपूर्ण क्षेत्र त्याने ठिबकखाली आणले आहे. चवळी, वांगी, टोमॅटो, तूर यासारखी पिके ठिबकवरच घेतली आहेत. ‘जल है तो कल है' असे म्हटले जाते. त्यामुळेच उद्याच्या भविष्यासाठी आजच पाणी व्यवस्थापन सक्षमपणे राबवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत वातावरणातील बदल आणि त्यामुळे शेतीक्षेत्रावर अनिश्चिततेचे मळभ दाटले आहे. त्या पार्श्वभूमीवर धामणा गावाने परिवर्तनवादाचा वारसा जपत येणाऱ्या धोक्‍यांना ओळखत ठिबकच्या माध्यमातून जलसंरक्षणाचा हेतू साधत भविष्य निश्चित केले आहे. श्रीप्रकाश टोंगसे- ९४०४९५१०७८ कृषी सहायक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT