दर्जेदार मिरची पीक व अमर चव्हाण
दर्जेदार मिरची पीक व अमर चव्हाण 
फळभाज्या

मिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेख

Raj Chougule

सुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य, बाजारपेठेतील मागणीनुसार मिरची वाणांची निवड, उसानंतर मिरची किंवा टोमॅटो अशी फेरपालट या पद्धतीतून अमर चव्हाण (चन्नेकुप्पी, जि. कोल्हापूर) यांनी आपल्या शेतीचा आर्थिक आलेख उंचावला आहे. एकरी ३५ ते ४० टन उन्हाळी मिरची उत्पादनात सातत्य ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या तालुका ठिकाणापासून चार किलोमीटरवर चन्नेकुप्पी हे दोन हजार लोकसंख्येचे छोटे गाव आहे. भाजीपाला क्षेत्रासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. गडहिंग्लज तालुक्याचे नाव प्रामुख्याने मिरची पिकासाठी घेतले जाते.

मिरची पिकात नाव कमावलेले चव्हाण चन्नेकुप्पी गावातील अमर रामचंद्र चव्हाण (वय ४०) सन २००६ पासून मिरची शेती करतात. त्यांचा या पिकातील किमान १२ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. त्यांची एकूण ११ एकर शेती आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांची सहा एकर शेती कसण्यासाठी घेतली आहे. हिरण्यकेशी नदी असल्याने पाण्याची समस्या नसते. त्याचबरोबर दोन विहिरी, तीन कूपनलिकांच्या माध्यमातून शेती बागायत करणे शक्य झाले आहे.

उत्पादनात सातत्य चव्हाण म्हणाले, की मिरचीचे एकरी उत्पादन शक्यतो ३० टनांपेक्षा खाली येत नाही. त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पादन ३५ ते ४० टनांपर्यंतही घेतो.  

मार्केट चव्हाण यांच्यासाठी गावापासून सुमारे ८० किलोमीटरवर असलेले बेळगाव हे मुख्य तर २० किलोमीटरवरील संकेश्‍वर हे अन्य मार्केट आहे. दररोज सुमारे ८०० किलोपर्यंत मिरचीची काढणी होऊन ती मार्केटला पाठविली जाते. चव्हाण म्हणाले, की मार्केटच्या मागणीनुसार भज्यांसाठी व लांब अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतो. बेळगाव मार्केटला भज्यांसाठीची मिरची चालते.

यंदा दर घसरले गेल्या पाच वर्षांत मिरच्यांचे दर किलोला ३५, ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळायचे. खर्च वजा जाता एकरी दोन ते तीन व काही परिस्थितीत त्याहून अधिक नफादेखील हाती यायचा. यंदा मात्र हेच दर १० रुपये प्रति किलो एवढे खाली आले आहेत. त्यामुळे यंदा तरी मिरची परवडण्याजोगी राहिली नाही. टोमॅटोचीदेखील हीच स्थिती आहे. टोमॅटोचेही एकरी ४० टनांपर्यंत उत्पादन घेतो. मात्र मागील डिसेंबरपासून त्याचेही दर किलोला १० रूपयांपर्यंत मिळू लागल्याने संकटात वाढ झाली आहे. उसाचे एकरी ८० टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याचे उत्पन्न मात्र शाश्वत राहते असे चव्हाण यांनी सांगितले.

पदे सांभाळली; पण शेतीत दररोज कष्ट चव्हाण यांनी स्वत:च शेती फुलवताना आपल्या सहकाऱ्यांनाही मोलाची मदत केली आहे. ते ‘आत्मा’ समितीचे तालुकाध्यक्ष आहेत. गडहिंग्लज पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले आहे. गडहिंग्लज कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. चव्हाण म्हणतात, की विविध पदांची जबाबदारी सांभाळली तरी शेतीतील कष्ट मात्र थांबवलेले नाहीत. सल्लागार मित्र रवी घेज्जी यांच्यासह शेतकरी मंडळातील सदस्यांबरोबर त्यांची दररोजची चर्चा होते. या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून कूपनलिका पुरर्भरणाचा कार्यक्रम राबविला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडील बंद असलेल्या कूपनलिकांना पाणी येत त्यांची शेती समृद्ध झाली आहे. चव्हाण यांनी खंडाने ही जमीन कसायला घेतली आहे त्यातही सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जमिनीची प्रत चांगली ठेवत उत्पादनातही वाढ करण्याचा प्रयत्न त्यात केला आहे.

ॲग्रोवन ठरला मार्गदर्शक सखा चव्हाण ॲग्रोवनचे नियमित वाचक आहे. हवामानाचे अंदाज, त्याविषयीची माहिती ॲग्रोवनमधून समजत असल्याने शेती व्यवस्थापन सुलभ करणे शक्य होते असे ते सांगतात. पूरक व्यवसायांचीही विविध माहिती समजते. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जोखीम घेऊन शेतीत प्रयोग केले ते वाचून प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेती दृष्टिक्षेपात

  • ऊस- मिरची व टोमॅटो असा मेळ
  • दरवर्षी उन्हाळ्यात (फेब्रुवारीत) मिरची- साधारण दोन एकर क्षेत्र
  • यात एक एकर भजीच्या मिरच्यांंचे तर एक एकर लांब मिरचीचे
  • मिरचीचा प्लॉट जुलै-आॅगस्टपर्यंत राहतो.
  • त्यानंतर उसाची लागवड
  • खोडवा ऊस काढल्यानंतर त्यात पुन्हा मिरची किंवा टोमॅटो
  • पीक फेरपालटावर भर. पीक बदलामुळे जमिनीची सुपीकता ठेवण्याचा प्रयत्न
  • झिगझॅग पद्धतीने मिरचीची लागवड
  • उसात सुरवातीच्या तीन फुटी सरीऐवजी पाच फुटी सरीला प्राधान्य
  • पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा वापर
  • विद्राव्य खतांचा अधिकाधिक वापर
  • मल्चिंग पेपरचा प्रभावी वापर
  • वेल बांधणी करून वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळले
  • सेंद्रिय व रासायनिक कीडनाशके असा मेळ  
  • गरजेनुसार तंत्रज्ञानात केले बदल
  • पहाटेपासून रात्रीपर्यंत स्वत: कष्ट करण्याची तयारी
  • प्रयोगशील शेती करणाऱ्या मित्रांचा सहवास
  • उसामधून येणारी रक्कम अन्य कामांसाठी तर भाजीपाला शेतीतील रक्कम दैनंदिन खर्चासाठी
  • शेतीत आई-वडिलांचीही मोठी मदत
  • चव्हाण यांनी मिरची शेतीस सुरवात केली त्या वेळी केवळ एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन मिळत होते. तीन फुटी सरी, पाटाने पाणी आदी पारंपारिक पद्धतीचाच वापर व्हायचा. सन २००३ नंतर या परिसरात पहिल्यांदा त्यांनी पॉली मल्चिंगचा वापर करण्यास सुरवात केली. त्याचबरोबर व्यवस्थापनातही सुधारणा केल्या. 
  • संपर्क : अमर चव्हाण, ९०११४१५७७७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

    Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

    Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

    Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

    Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

    SCROLL FOR NEXT