जनावरांना कोवळा, अतिप्रथिनयुक्त चारा जास्त प्रमाणात देऊ नये.
जनावरांना कोवळा, अतिप्रथिनयुक्त चारा जास्त प्रमाणात देऊ नये. 
कृषी पूरक

जनावरांतील पोटफुगीची कारणे अन् उपाय

डॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे

जनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक अाजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात.   

शेळ्या, मेंढ्या व मोठ्या जनावरांमध्ये सर्व मोसमात पोटफुगी ही समस्या जास्त प्रमाणात अाढळून येते. खाद्यामधील झालेल्या बदलामुळे, अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे जनावरांनी खालेल्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते, त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरीत्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यांवर होतो यालाच ‘पोटफुगी’ म्हणतात.  

कारणे

  •  कोवळा, जास्त प्रथिनयुक्त अाणि किण्वन करू शकणाऱ्या ज्वारी, बाजरी, वाटाणा अाणि मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जास्त प्रमाणात उसाचा  चोथा जनावरांच्या खाद्यात गेल्यास पोट फुगते. 
  •  अन्ननलिका कोंडल्यास, जनावरांच्या आंतरपटलाच्या हर्निया, धनुर्वात, अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जंतांचा प्रादुर्भाव व शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पोटफुगी होते. 
  • काही जनावरांत अानुवंशिकतेमुळे तोंडातील लाळेचा स्राव कमी प्रमाणात होत असल्यास अन्न चावताना किंवा रवंथ करताना लाळ अन्नात योग्य प्रमाणात मिसळू शकत नाही, त्यामुळेसुद्धा पोटफुगी होते. 
  • ज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे चारा व पाण्याशिवाय खाल्ल्यावरसुद्धा पोटफुगी होते. अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू खाल्ल्यास पोटफुगी होते.
  • लक्षणे

  •   प्रथम जनावर खात- पीत नाही, ते सुस्तावते. 
  •  जनावरांच्या पोटाचा आकार विशेषतः डाव्या भकाळीचा अाकार जास्त प्रमाणात वाढतो, जनावर डोळे व मान उंचावून ताणते, पोटात त्रास होत असल्यामुळे जनावर दात खाते, मागच्या पायाने पोटावर लाथा मारते, डाव्या भकाळीकडे पाहते, तोंडाने श्वासोच्छ्‍वास करते, लाळ गाळते. 
  •  पोटातील वाढलेल्या वायूमुळे फुफ्फुसावर व हृदयावर दाब पडतो, त्यामुळे जनावरास श्वासोच्छ्‍वासास त्रास होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. 
  •  जनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मारून पाहिल्यास पोटात वायू असल्याचा आवाज येतो. कधी कधी पोटफुगी एवढी वाढते, की पोटाच्या पिशव्यांचा ताण फुफ्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दमकोंडी होऊन जनावर कोसळते. फुफ्फुसावर जास्त दाब वाढला तर श्वास कोंडून जनावर दगावते.
  • उपचार

  • पोटफुगीची लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. जनावरांना दिले जाणारे व पोटात वायू तयार करणारे अन्न व पाणी त्वरित थांबवावे. पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील अशाप्रकारे जनावराला बांधावे, जेणेकरून फुगलेल्या अन्नाच्या पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही.
  •  जनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मालिश करावे. जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वायुनाशक औषधे तोंडातून पाजावीत.
  • जनावराच्या तोंडात आडवी कडुलिंबाची १ फूट लांबीची लाकडी काठी ठेवून ती मुरकीस दोन्ही बाजूस बांधावी. अशाप्रकारे ही काठी तोंडात राहिल्यामुळे जनावर त्या काठीस सतत चघळत राहील, त्यामुळे लाळेचे प्रमाण वाढून पोटफुगी कमी होण्यास मदत होईल. 
  • कोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त व किण्वन करू शकणाऱ्या वनस्पती, ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती, उसाची मळी, चोथरी जास्त प्रमाणात देऊ नये. 
  • जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर ३ महिन्यांनंतर जनावरांना जंतनाशक पाजावे. रोज ५० ग्रॅम क्षार मिश्रण खाद्यातून द्यावे. उरलेले शिळे अन्न, भाज्या देऊ नये.  
  • ज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे जास्त प्रमाणात खाऊ देऊ नये. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू जनावराच्या पोटात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
  •  -  डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६ (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

    Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

    Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

    Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

    Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

    SCROLL FOR NEXT