Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Desi Cow Management: आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गोशाळा हेच धोरण

Animal Husbandry India: गोशाळेतील किमान पाच गोवंश एका वर्षात इतर ९५ गोवंशापासून वेगळ्या पद्धतीने आणि व्यवस्थापनात सांभाळत अमूल्य आणि भरपूर उत्पादकतेचा निर्माण करणे पथदर्शक ठरेल.

Team Agrowon

डॉ. नितीन मार्कंडेय

Gaushala Reform: राज्यात गेल्या पाच वर्षांत पशुगणनेच्या आधारे एक कोटी ३९ लक्ष गोवंश उपलब्ध असून, मार्च २०२५ मध्ये पूर्ण झालेल्या पशुगणनेची आकडेवारी नजीकच्या काळात उपलब्ध होईल. या संख्येत संकरित आणि विदेशी गोवंश दूध व्यवसायासाठी प्रामुख्याने उद्योजकांच्या हाती असल्यामुळे अशा २७ लक्ष गोवंशाबाबत आर्थिक फायद्याची मांडणी आपोआप केली जाते किंवा त्यासाठी पाठपुरावा सतत चालू असतो. राज्यातील उर्वरित एकूण एक कोटी बारा लक्ष गोवंश असून त्यातील एक कोटी दहा लक्ष गोवंश शेतकरी, पशुपालकांच्या गोठ्यात आहे आणि अंदाजे दोन लक्ष गोवंश गोशाळेत सांभाळण्यात येतो.

अधिकृत आणि नोंदणीकृत शुद्ध गोवंश जातींचा म्हणजे वर्गीकृत असणारी संख्या बारा लक्ष एवढी तर अवर्गीकृत म्हणजेच देशी/ गावठी/ स्थानिक/ घरची/ गावरान गोवंश साधारण दहा पट अधिक संख्येत आहे. गोशाळेतील गोवंश प्रामुख्याने अवर्गीकृत असणारा आणि शुद्ध वंशात दिसून येत नाही. आकडेवारीनुसार गोसेवा आयोगाकडे अधिकृत नोंदणी केलेल्या ९३० गोशाळांकडे केवळ दीड लक्ष एवढा गोवंश राज्यात आहे. अजुनही शंभर गोशाळांची नोंद आयोगाकडे झालेली नाही.

गोवंश शुद्धतेवर भर

गोवंश कुठे सांभाळला, यापेक्षा तो कसा सांभाळला यावर आर्थिक आत्मनिर्भर गोपालन अवलंबून असते. शुद्ध जातिवंत गोवंश अधिक फायदेशीर दिसून येतो म्हणजे गोवंशाची शुद्धता वाढत गेली तर त्याची उत्पादकताही मोठ्या प्रमाणात वाढते. कमी संख्येने असणाऱ्या गोवंशासाठी अधिक लक्ष दिले गेल्यामुळे जास्त उपयुक्तता साहजिकच दिसून येते, मात्र एका गोठ्यात/प्रक्षेत्रावर अधिक गोवंश संख्या कमी उत्पादकतेसाठी कारणीभूत ठरते. सांभाळलेल्या गोवंशबाबत उत्पादकतेसाठी आग्रही भूमिका असल्यास उत्पन्नात वाढ होते, मात्र केवळ गोरक्षण हाच उद्देश असल्याची मानसिकता असल्यास सहजही मिळू शकणारे गोवंशाचे उत्पन्न हाती लाभत नाही.

गोवंशाकडून अनेक लाभ मिळतात, मात्र त्यातील निवडक बाबीच नियमित आर्थिक उत्पन्नाची साधने ठरतात. केवळ सुदृढ गोवंशांकडून लाभ मिळणे अपेक्षित असते. अशक्त, आजारी, जर्जर, खंगत जाणाऱ्या, प्रकृती अस्वास्थ्याच्या सतत तक्रारी असणाऱ्या, अंग न धरणाऱ्या गोवंशांकडून नियमित मिळणारे लाभही अजिबात उपयोगाचे नसतात. निसर्ग साखळीत मानवी आरोग्य उच्च स्थानी असल्यामुळे, गोवंशांकडून मानवापर्यंत अजिबात आरोग्याबाबत अडचणी येणार नाहीत. यासाठीच सांभाळलेला गोवंश धष्टपुष्ट नसला तरी साधारण आरोग्यात आणि प्रकृती मनात उत्कृष्टपणे जगणारा असणे अपेक्षित असते. अशा साधारण गोवंशांकडून गोमय आणि गोमूत्र या नियमित मिळणाऱ्या बाबी तरी विविध प्रकारे उत्पन्नासाठी वापरता येणे शक्य होते.

गोशाळेचे व्यवस्थापन

दुर्लक्षित सांभाळण्यात आलेल्या गाई पशुपालकाकडून गोशाळेत आणून सोडल्या जातात. राज्यात गोहत्या बंदी कायदा दहा वर्षांपासूनच अंमलात असतानाही दररोज होणाऱ्या पोलिस कार्यवाहीत आढळून आलेला गोवंश गोशाळेत सोडला जातो. शरीर ताण, गुजराण होण्याइतका चारा, व्यवस्थापनातील त्रुटी, वातावरणातील बदल, दररोज हाताळणीतील हेळसांड यामुळे गोशाळेतील गोवंश सामान्य आरोग्य आणि प्रकृतिमानात असत नाही. राज्यात प्रत्येक ऋतूत गोशाळेसाठी चारा टंचाई असल्यामुळे उसाचे वाढे हाच पर्याय गोवंशाला दररोज पचवावा लागतो. यातून गोवंश सांभाळण्याचे समाधान जरी गोशाळा संचालकास मिळाले, तरी खाल्लेल्या चाऱ्यासाठी पचनातून अधिक शरीर ऊर्जा वापरली जाऊन गोवंशाने शरीरातील साठवलेलीच ऊर्जा कमी होत राहते.

गोशाळेतील गोधन सांभाळताना त्याची उपयुक्तता वाढावी यासाठी सोपे उपाय असले तरी त्याबाबत अवलंबाचा फारसा विचार केला जात नाही. राज्यातील एकाही गोशाळेत वर्गवारीसह आणि विविध कप्प्यांत गोवंश सांभाळला जात नाही, ही मोठी अडचणीची गोष्ट आहे. व्यवस्थापन आणि पोषण योग्य होण्यासाठी वासरे, वाढीच्या कालवडी, नर गोवंश, बैल, गाई, वृद्ध गोवंश, आजारी गोवंश, विकलांग गोवंश यांच्यासाठी वेगळा कप्प्यातील सांभाळ अत्यंत आवश्यक असून त्यासाठी बांबू, लोखंडी बारीक पाईप, लोखंडी सळई अशा विविधप्रकारे कुंपण करता येते, आणि हा केवळ एक वेळ होणारा खर्च असल्यामुळे त्याची निरंतर उपलब्धता लाभते. वय आणि वंश आधारित कप्प्यासह गोवंश व्यवस्थापन गोशाळेत सुरू झाल्यास आत्मनिर्भरतेचे पहिले पाऊल पडेल.

गोशाळा संचालकांकडून गोवंश जतन, संवर्धन, विकास याबाबत मोठी चर्चा करताना गोशाळेत मात्र परराज्यातून कौतुक आणि किमतीचा आणलेला वळू मुक्तपणे गोशाळेतील सर्वच गोवंशाच्या पैदाशीसाठी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निकृष्ट, अवर्गीकृत, वंशरहित, अल्पउत्पादक पिढी निर्मितीचा मोठा कारणीभूत ठरतो. त्याची पैदास अडथळा असल्याबाबत अजिबात जाणीव नसल्याचे गोशाळेत दिसून येते. कहर म्हणजे ज्या गोशाळांना गोमूत्र आणि गोमय याच उत्पन्नासाठी गोवंश सांभाळायचा आहे, त्याही गोशाळात मोठी रक्कम खर्च करून परराज्यातील वळूची खरेदी केली जाते.

वर्गीकृत/ गावठी/ देशी/ स्थानिक या गोवंशाची उपयुक्तता नेहमीच कमी आणि होणारा खर्च सर्वाधिक असल्याने किमान पुढील पिढ्यांत शुद्धच गोवंश दिसावा असे धोरण अपेक्षित आहे. देशातील सगळा अवर्गीकृत गोवंश संख्येने शून्य करण्यासाठी केंद्र शासनामार्फत मोठे प्रयत्न सुरू आहेत. यात सध्या उपलब्ध असलेला सगळा अवर्गीकृत/ वंशरहित गोवंश रुपांतरीत करून शुद्ध जातिवंत स्वरूपात पुढील पिढ्यांत कसा मिळवायचा याबाबत भूमिका आणि शिफारशी करण्यात आल्या आहेत.

जातिवंत पैदाशीवर भर

गोवंशाच्या नैसर्गिक संयोगाचा पैदाशीसाठी पाठपुरावा करणारी मानसिकता जोपासण्याबाबत अजिबात अडचण नसून केवळ संबंधित शुद्धवंशाच्या गायींसाठी त्याच गोवंशाचा शुद्ध- सिद्ध- सशक्त- सुदृढ- रोगरहित वळू वापरण्याची गरज आहे. ‘शुद्ध गोवंश’ म्हणजे नेमकं काय? याचा अभ्यास आवश्यक ठरतो. शुद्ध गोवंश जनमानसात प्राधान्याने सांभाळला जावा, यासाठीच राज्य शासनाने दरवर्षी ‘शुद्ध देशी गोवंश जतन संवर्धन दिवस’ साजरा करण्याचे सुनिश्‍चित केले आहे.

गोशाळेत गोवंश सांभाळ सुलभ करण्यासाठी आज असणाऱ्या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे. गोशाळेतील किमान पाच गोवंश एका वर्षात इतर ९५ गोवंशापासून वेगळ्या पद्धतीत आणि व्यवस्थापनात सांभाळत अमूल्य आणि भरपूर उत्पादकतेचा निर्माण करणे पथदर्शक ठरेल. दरवर्षी पाच टक्के गोवंश संख्येने सुदृढ, सशक्त झाल्यास अधिक उत्पादक होत गोशाळेतील इतर गोवंशासाठी त्याची उपयुक्तता मोठी लाभदायक ठरू शकेल. आत्मनिर्भर गोशाळाचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिलं पाऊल दरवर्षी केवळ पाच टक्के गोवंशापासून प्रारंभ केल्यास पुढील दहा वर्षांत राज्यातील प्रत्येक गोशाळा आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होऊ शकेल.

बिनखर्चिक गोवंश सक्षमीकरण

गोशाळेतील मोठ्या संख्येचा सगळा गोवंश वर्गीकृत कप्प्यात सांभाळणे अजिबात शक्य नसल्यास निर्धारित केलेल्या पाच टक्के गोवंशास मात्र वेगळ्या कप्प्यात सुधारित व्यवस्थापनात सांभाळणे गरजेचे आहे. उपलब्ध गोवंशापैकी एकाच शुद्धवंशाच्या पाच गाई गोशाळेत उपलब्ध शंभरातून सहज मिळू शकतात. जर अशा गाई नसल्या तरी दोन-तीन वेगवेगळ्या शुद्ध वंशाच्या गाई निवडता येतील, ज्या इतरांपेक्षा प्रकृतीने अधिक चांगल्या आहेत.

गोशाळेतील पाच गायींना वेगळा मुक्त संचार कप्पा - साधारणपणे तीनशे फूट बाय दहा फूट आकारात असावा. त्याचे कुंपण नायलॉन दोरीने करता आले तरी योग्य ठरेल. या कप्प्यात जमिनीवर वर्षभर थेंबभर पाणी पडणार नाही एवढा कोरडेपणा राखावा आणि दिवसा सूर्यप्रकाश मिळणे अपेक्षित आहे. या पाच निवडक गोवंशास इतर गोवंशाप्रमाणे चारा देताना दर आठ दिवसास शरीर वजनाच्या नोंदी तसेच केवळ छातीचा घेर मोजला तरी चालेल. नोंदी लिखित स्वरूपात ठेवाव्यात.

निवडक गोवंशासाठी दर सहा महिन्यास पशुवैद्यकीय विभागातर्फे शेण, मूत्र, रक्त तपासणी करून घ्यावी. शरीर वजन वाढीसाठी काळा, तीन नंबरचा, जुना, दीर्घकाळ टिकून ठेवलेला गूळ दररोज १०० ग्रॅम आणि क्षार मिश्रणाची जोड दिल्यास शरीर वजनातील वाढ दिसू शकेल. निवडलेला गोवंश माजावर आल्यास जातिनिहाय वंशाच्या गोशाळेतील अथवा इतरत्र उपलब्ध असणाऱ्या वळूकडून भरवता येतील. यातील गाभण ठरणाऱ्या गाईंना प्रसूती पूर्वी आणि नंतर प्रतिबंधात्मक उपचाराची जोड देता येईल. अशा प्रसूत गाईंचे दूध तिच्या वासरांना आणि गोशाळेतील वासरांना उपयोगी पडू शकेल. मात्र सुदृढ प्रकृतीमानातील या पाचही गोवंशाच्या गोमूत्र आणि शेणास येणारी वर्षभर किंमत निश्चित चांगली असेल. असेच गोमय, गोमूत्र गो-उत्पादन म्हणून वापरणे अपेक्षित आहे.

- डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१

(लेखक महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

Watermelon Farming : खरिपातील कलिंगडाची लागवड यंदा कमीच

MSP committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

SCROLL FOR NEXT