Go Palan Agrowon
काळजी पशुधनाची

Dairy Farming : पाथर्डीचे सुखदेव पाठक कसे करतात गायींचे व्यवस्थापन? पहाटे पाच वाजता गोठ्यातल्या कामांना सुरूवात...

नगर जिल्ह्यातील घाटसिरस (ता. पाथर्डी) हा तसा दुष्काळी भाग. येथील शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीसोबत पूरक व्यवसायांना प्राधान्य देत आहेत.

Team Agrowon

शेतकरी : सुखदेव साहेबराव पाठक

गाव : घाटसिरस ता. पाथर्डी, जि. नगर

एकूण शेती : २ एकर

एकूण गाई : १३

Ahmednagar Dairy Farming: नगर जिल्ह्यातील घाटसिरस (ता. पाथर्डी) हा तसा दुष्काळी भाग. येथील शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीसोबत पूरक व्यवसायांना प्राधान्य देत आहेत. विशेषतः दुग्ध व्यवसाय अनेक शेतकरी करतात.

येथील सुखदेव साहेबराव पाठक या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने पारंपरिक दुग्ध व्यवसायास योग्य व्यवस्थापनाची जोड देत व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न ठेवले आहेत. त्यांच्याकडे आधीपासूनच एक-दोन गाई होत्या.

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेती आणि दुग्ध व्यवसायात लक्ष देण्याचे ठरविले.

आधीपासून असलेला घरचा दुग्ध व्यवसाय वाढविला. सध्या त्यांच्याकडे लहान- मोठ्या मिळून १३ एचएफ गाई आहेत. गाईंसाठी मुक्तसंचार पद्धतीच्या गोठ्याची उभारणी केली आहे. गायींसाठी सावली उपलब्ध होण्यासाठी १४ बाय ६० फूट आकाराची जागा उपलब्ध केली आहे.

त्यापुढे ५० बाय ५० फूट आकाराची मोकळी जागा आहे. बाजूने तारेच्या कुंपण केले आहे. प्रतिदिन साधारणपणे ७० लिटरपर्यंत दूध संकलन होते. शिवाय त्यांनी स्वतःचे दूध संकलन केंद्र सुरु केले आहे.

तेथे दररोज सव्वा दोनशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. गाईसाठी दोन एकरांत मका, घास, गिन्नी गवत अशा चारावर्गीय पिकांची लागवड केली आहे.

व्यवस्थापनातील बाबी :

- दररोज सकाळी पाच वाजता गोठ्यातील कामांस सुरवात होते.

- प्रथम सर्व गाईंचे दूध काढले जाते. त्यानंतर दुभत्या जनावरांना साडेतीन ते ४ किलो तर कालवडींना दीड ते २ किलो पशुखाद्य दिले जाते.

- चाऱ्यामध्ये मोठ्या जनावरांना घास, मका व गिन्नी गवत १५ किलो प्रति गाय तर कालवडींना ७ ते ८ किलो कुट्टी प्रति कालवड याप्रमाणे दिले जाते.

- मुक्तसंचार गोठा असल्याने पाण्यासाठी गव्हाणीची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

- साधारणपणे ४ ते ५ वाजता गोठ्यातील गाईंचे दूध काढले जाते. त्यानंतर चारा व पशुखाद्य दिले जाते.

- मुक्त संचार गोठा असल्याने जमा होणारे शेण दररोज उचलण्याची गरज भासत नाही. एकदम शेण गोळा करून गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यामध्ये जमा होणाऱ्या शेणाला चांगली मागणी आहे.

- चाऱ्यासाठी यंदा प्रथमच १० टन मुरघास तयार केला आहे.

- गाभण गाईंची विशेष काळजी घेतली जाते. गाय व्यायल्यानंतर दोन महिन्यापर्यंत तिला दररोज २ वेळा पशुखाद्यातून कॅल्शिअम सारख्या पूरक घटक दिले जातात. जेणेकरून गाईची प्रतिकारशक्ती कमी होणार नाही. आवश्यकतेनुसार पशुवैद्यकांच्या सल्ला घेतला जातो.

- उच्च प्रतीच्या कालवडींची पैदास होण्यासाठी योग्य गुणधर्म असलेल्या उच्च दर्जाच्या वळूची वीर्यमात्रा भरली जाते.

लसीकरण

- मागील काही महिन्यांपूर्वी लम्पी या त्वचा आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात दिसून आला. गोठ्यातील गाईंनी आजाराची बाधा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले आहे.

- जंत निर्मूलनासाठी दर तीन महिन्यांतून एक वेळ मोठ्या गाईस जंतनाशकाची १ गोळी दिली जाते. सहा महिन्यांपर्यंतच्या वासराला औषधाची मात्रा दिली जाते.

- लाळ्या खुरकूत आजारासाठी दर सहा महिन्यांतून एकदा लसीकरण केले जाते. मागील चार महिन्यापूर्वी हे लसीकरण केले आहे. पुढील २ महिन्यांत पावसाळ्यापूर्वी लसीकरण केले जाईल.

- मुक्तसंचार गोठा असल्याने गोचीडाची समस्या जास्त भेडसावत नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरजेनुसार गोचीड निर्मूलनाची लस दिली जाते. शिवाय दर दीड ते २ महिन्यांनी गोठ्यात गोचीड प्रतिबंधक कीटकनाशकांची फवारणी केली जाते.

वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्था :

- गाय व्यायल्यानंतर नवजात वासरांचे तीन महिन्यांपर्यंत स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. त्यांना वेगळ्या जागी ठेवून त्यांचे व्यवस्थापन केले जाते.

- वासरांचे वजन वाढ अत्यंत महत्त्वाची असते. वजन वाढ व पुढील काळात कालवडीला कोणत्याही समस्या उद्भवू नये यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने दुधामधून पोषक घटकांचा पुरवठा केला जातो.

- गाईचे दूध वासराला थेट पिऊ दिले जात नाही. बाटलीच्या मदतीने दूध पाजले जाते.

- गाय व्यायल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये वासराला कोवळे दूध पाजण्यावर भर दिला जातो. जेणेकरून त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार होईल.

- त्यानंतर पाच दिवसापर्यंत दोन वेळा प्रत्येकी दीड लिटर, दहा दिवसानंतर दोन महिन्यापर्यंत दोन वेळा प्रत्येकी अडीच लिटर दूध पाजले जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दूध पाजणे कमी केले जाते. आणि खुराक खाण्याची सवय लावली जाते.

- वासरू चार महिन्यांचे झाल्यानंतर दूध पाजणे पूर्णपणे बंद केले जाते.

- वासराला दररोज किमान १ किलो खुराक देण्याचे नियोजन असते. योग्य व्यवस्थापनामुळे वासरांची अपेक्षित वजनवाढ आणि लवकर वयात येण्यास मदत होते. साधारणतः अकरा महिन्यांमध्येच कालवडी गाभणी राहत असल्याचा सुखदेव पाठक यांचा अनुभव आहे.

सुखदेव पाठक, ८४५९१५०२२०, (शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेकडून ९४९ कोटींचा कर्जपुरवठा

Orchard Farming : सांगली जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्र एक लाख एकर

Onion Cultivation : लेट खरीप कांदा लागवडीची खानदेशात तयारी

SCROLL FOR NEXT