Dishi Govansh Agrowon
काळजी पशुधनाची

Khillar Cattle Breed : रुबाबदार खिल्लार गोवंश

Khillar Govansh : खिल्लार, माणदेशी, शिकारी अशा नावांनी सुपरिचित असलेला खिल्लार गोवंश चपळ व उत्तम भारवाहक जात म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. ‘खिल्लार’ म्हणजे गायींचा कळप आणि तो राखणारा गुराखी म्हणजेच ‘खिल्लारी’ असा अर्थबोध आहे.

Team Agrowon

डॉ.प्रवीण बनकर

Khillar Cow : खिल्लार, माणदेशी, शिकारी अशा नावांनी सुपरिचित असलेला खिल्लार गोवंश चपळ व उत्तम भारवाहक जात म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. ‘खिल्लार’ म्हणजे गायींचा कळप आणि तो राखणारा गुराखी म्हणजेच ‘खिल्लारी’ असा अर्थबोध आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात तसेच लगतच्या कर्नाटकातील बेळगाव, विजापूर आणि धारवाड या भागात खिल्लारी गोवंश आढळतो.

हल्लीकर आणि अमृतमहाल या भारवाहक गोवंशापासून खिल्लारी उगम पावली असल्याचे मानले जाते. आखीव व रेखीव, उंचपुरा, चपळ, बांध्याची भक्कम शरीरयष्टीची खिल्लारी जनावरे अथकपणे ओझे वाहून नेऊ शकतात, या गुणधर्मामुळे एकेकाळी खिल्लारी गोवंश श्रीलंकेतील स्थानिक गोवंशाच्या भारवाहक क्षमतावृद्धीसाठी निर्यात झाला होता.

गोवंश संपदेत महाराष्ट्राची रुबाबदार ओळख मिरवणाऱ्या खिल्लार गोवंशाचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. १९ व्या (२०१२) पशुगणनेत १२,९३,१८९ एवढी संख्या तब्बल २० व्या (२०१९) पशुगणनेत ५,८२,३२८ इतकी प्रचंड रोडावली असल्याचे दिसून येते. जत, जुनोनी येथील शासकीय प्रक्षेत्रावर खिल्लारचे जतन केले जाते.

कर्नाटक राज्यात बंकापुर येथे खिल्लार फार्म आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे देखील खिल्लार प्रक्षेत्र असून संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत.
गोपालकाकडून खिल्लारची पैदास आणि संवर्धन पारंपरिक पद्धतीने आणि जिव्हाळ्याने केले जाते. गोऱ्हा जन्माला आल्यावर गायीचे दूध न काढता वासरासाठी ती आटेपर्यंत ठेवले जाते. इतर गोधनपेक्षा खिल्लार लवकरच वयात येत असल्याने एक दीड वर्षांचे खोंड बाजारात विक्रीला येतात. नोव्हेंबर, डिसेंबरमधील म्हसवड, नागोबाच्या यात्रेत तसेच स्थानिक बाजारात पशुपालकांनी मोठ्या हौसेने आणलेली खिल्लारची उमदी जनावरे पाहायला मिळतात.


वैशिष्टे ः
१) राखाडी- पांढरा रंग, क्वचित चेहऱ्यावर ठिपके दिसून येतात. कपाळावर शिंगापासून नाकपुड्यांपर्यंत खाच दिसत असल्याने कपाळ फुगीर दिसते.
२) लांबट तोंड, टोकदार काळ्या नाकपुड्या (क्वचित गुलाबी). लांबट डोळे, लांबलचक मागे वळून पुढे वरच्या दिशेने आलेली टोकदार शिंगे (धनुष्याकृती), मजबूत वशिंड, काळी खुरे, मऊसर त्वचा तुकतुकीत असते.
३) प्रति वेत सरासरी दूध सरासरी ४०० किलोग्रॅम मिळते.
४) साडेचार ते साडेपाच फूट उंचीच्या बैलजोड्या शेतीकामास उत्तम असल्याने स्थानिक बाजारात भरपूर मागणी व किंमत असते.



उपजाती ः
१) खिल्लारीच्या प्रमुख ४ उपजाती आहेत. दक्षिण महाराष्ट्रात ‘आटपाडी महाल’, सोलापूर, सातारा भागात ‘म्हसवड’, सातपुडा पर्वत रंगात ‘थिल्लारी’ आणि इतर लगतच्या भागात ‘नकली’ या अनेक नावांनी या जाती परिचित आहे.
२) आटपाडी खिल्लार दिसायला पांढरेशुभ्र असतात. त्यांची शिंगे, नाकपुड्या, खुरे लालसर गाजऱ्या रंगाची असतात.
३) म्हसवड खिल्लारचा रंग तांबूस कोसा आणि सडपातळ बांधा, तर एका बाजूला झुकलेले वशिंड म्हणजे ओळखीची खूण म्हणता येईल. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात दिसणारी ‘कोसा खिल्लार’ रंगाने किंचित काळसर, चेहरा, गळ्याची पोळी आणि वशिंडाच्या भागावर कोसा रंगछटा तर नाकपुड्या आणि डोळे काळेभोर आपले वेगळेपण सिद्ध करते.
४) खानदेश भागात दिसणारी ‘नकली’ खिल्लार गोवंशाची नोंद इंग्रजांनी थिल्लार अशी केली असून ते दिसायला जरा स्थूल असते. नकली खिल्लारमध्ये मानेची पोळी लोंबती आणि जाडसर तर कपाळ व नाक फुगीर असते. याशिवाय अभ्यासकांनी आणखी काही
खिल्लारच्या उपजातींची नोंद घेतल्याची आढळते.

५) पंढरपूर खिल्लार ः पांढरा व आटपाडीशी साम्य, शिंगे काळपट गाजऱ्या रंगाची, नाकपुड्या, खुरे- गाजऱ्या किंवा पांढऱ्या रंगाची.
६) धनगरी खिल्लार ः कोसा व म्हसवड यांच्या संकरातून उगम झाल्याचे मानले जाते. शिंगे काळपट गाजऱ्या रंगाची,नाकपुड्या, खुरे गाजऱ्या या किंवा पांढऱ्या रंगाची, चेहरा आखूड, कपाळ हे सपाट व रुंद.
७) ब्राह्मणी खिल्लार ः रूपाने कोसा प्रमाणे चेहरा, वशिंड, मान, मांड्या काळ्या रंगाच्या, खूर व नाकपुड्या काळ्या, शिंगे जाड बुंद असतात.
८) डफळया खिल्लार ः सांगली जिल्ह्यात आढळणारे आणि दिसायला हल्लीकर गोवंशाप्रमाणे, चेहरा, वशिंड, मान, मांड्यांचा काळा रंग, खूर व नाकपुड्यांचा रंग काळा, शिंगे जाड बुंद असतात.
९) हरण्या खिल्लार ः उभट कपाळ , चेहरा लांब, शिंगे, खूर व नाकपुड्या या गाजऱ्या रंगाची
१०) काजळ्या खिल्लार ः शरीराचा बहुतांश भाग काळपट रंगाचा असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT