Grape Vine Yard Management Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Management : पावसाळी स्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

Grape Vineyard Management : सध्याच्या वातावरणाचा विचार करता द्राक्ष बागेतील तापमानामध्ये बऱ्यापैकी घट झाली आहे. तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले असून, आर्द्रतेचे प्रमाण (८० टक्क्यांपुढे) वाढले.

Team Agrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय
---------------------
Grape Advisory : सध्याच्या वातावरणाचा विचार करता द्राक्ष बागेतील तापमानामध्ये बऱ्यापैकी घट झाली आहे. तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले असून, आर्द्रतेचे प्रमाण (८० टक्क्यांपुढे) वाढले. इतकेच नाही, तर सध्याचे पावसाळी वातावरण पुढे तसेच राहण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात प्रत्येक भागात मध्यम ते जास्त प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत ओलांड्यावर मुळे येणे आणि शेंडा वाढ वेगाने होण्याच्या समस्या दिसून येतील.

१) ओलांड्यावर मुळे तयार होणे -
वेलीची वाढ व्यवस्थितरीत्या होण्याकरिता त्या बागेतील तापमान (३५ अंश सेल्सिअसपर्यंत) व आर्द्रता (५० ते ६० टक्क्यांपर्यंत) राहण्यासोबतच सूर्यप्रकाशही तितकाच महत्त्वाचा असतो. अशा वातावरणामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग अपेक्षेप्रमाणे होतो. वाढीच्या त्या अवस्थेत सूर्यप्रकाशाचा पुरेपूर फायदा घेऊन अन्नद्रव्याचा साठा असेल किंवा काडीची वाढ या गोष्टींकरिता वेलीच्या बोदामधील मुळे कार्यक्षम असणे गरजेचे असते. मुळे कार्यरत राहण्यासाठी जमीन वाफसा परिस्थितीत राहिली पाहिजे. म्हणूनच आपण शाकीय वाढीच्या अवस्थेत किंवा बागेत आवश्यकतेनुसारच पाण्याची उपलब्धता करतो. आजच्या वातावरणाचा विचार करता ही परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे.

हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीतून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असल्यामुळे मुळांच्या कक्षेमध्ये पाणी साचून राहत नाही. अशा प्रकारची जमीन कोणत्याही वेळी वाफसा स्थितीत लवकर येते. या तुलनेमध्ये भारी जमिनीमध्ये रेती किंवा मुरुमाचे प्रमाण कमी असून मातीच्या कणांची संख्या जास्त असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता हलक्या जमिनीच्या तुलनेत जास्त असते. जमिनीत पाणी जास्त काळ धरून ठेवले जाते. येथे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे वेलीची मुळे कार्यरत राहण्याची शक्यता कमी होते.


एका ठराविक अनुकूल परिस्थितीमध्ये द्राक्ष वेलीची मुळे संजीवकाची उत्पत्ती करतात. हीच संजीवके वेलीच्या मुळांपासून वर शेंड्यापर्यंत पुरवली जातात. त्याचे परिणाम आपल्याला फुटींची, पेऱ्याची व पानांची वाढ होण्यात दिसून येतात. मुळांच्या कक्षेत वाफसा योग्य प्रमाणात असल्यास संजीवकांची उत्पत्ती होते. त्यासोबत उपलब्ध अन्नद्रव्यांची सांगड घातल्यास अपेक्षेप्रमाणे वेलीची वाढ होते. त्यात सूक्ष्मघड निर्मिती होऊन काडीची परिपक्वताही होते.

सध्याच्या पावसाळी परिस्थितीचा विचार करता भारी जमिनीमध्ये वाफसा मिळणे शक्य नाही. त्याचा विपरीत परिणाम वेलीच्या मुळांच्या वाढीवर दिसून येईल. बोद खोदून बघितल्यास मुळे काळी पडलेली दिसून येतात. मुळाचा शेंडा (रूट टीप) पूर्णपणे काळा पडून सडल्याप्रमाणे दिसून येतो. वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली यामुळे व्यवस्थित होणार नाहीत. परिणामी शेंडा पूर्णपणे थांबलेला दिसेल. पाने पिवळी पडताना दिसून येतील. काही स्थितीमध्ये पानगळ होतानाही दिसून येईल. बऱ्याचदा आपण खते व पाणी वेलीला दिले नसले तरी ती वेल जमिनीत उपलब्ध घटकांचा वापर करून वाढ करून घेण्याचा प्रयत्न करते.

तशाच प्रमाणे जमिनीतील मुळे कार्यक्षम नसल्याच्या परिस्थितीतही वेल आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी वेलीच्या काडी, ओलांडा व खोडांवरील भागांवर मुळे तयार करते.

याला ‘एरियल रूट्स’ असेही म्हणतात. जमिनीत जोपर्यंत पाणी साचलेले आहे, तोपर्यंत वेलीवर तयार झालेली ही मुळे कार्य करून आपण गरज पूर्ण करते. पाऊस संपल्यानंतर किंवा जमिनीतून पाणी निघून गेल्यानंतर जमीन वाफश्यात आल्यानंतर तेव्हा पुन्हा बोदात थोडे खोदून मुळे तपासल्यास पांढरी मुळे तयार होताना दिसतील.

एरियल मुळांचे फारसे विपरीत परिणाम जरी दिसत नसले तरी वरील मुळे सुकणे व जमिनीतील मुळे तयार होणे यातील कालावधी जास्त राहिल्यास मात्र घडाच्या विकासात किंवा काडीमध्ये अन्नद्रव्य साठविण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतील. ही समस्या कमी करण्यासाठी भारी जमीन असलेल्या किंवा पाणी साचून राहणाऱ्या बागेत काडी परिपक्वतेच्या कालावधीत दोन ओळीमध्ये एक नांगरांच्या साह्याने छोटी चारी घेतल्यास बोद किंवा मुळाच्या कक्षेतील पाणी वेळीच निघून जाईल.

वाफसा लवकर येईल. म्हणूनच ही पाणी साचण्याची स्थिती टाळण्यासाठी आपण द्राक्ष लागवडीपूर्वीच बागेला दोन ते तीन टक्के उतार देण्याची शिफारस करत असतो. असा योग्य उतार दिलेला असल्यास भरपूर पाऊस पडला तरी बागेतून पाण्याचा त्वरित निचरा होतो. जमीन वाफसा स्थितीमध्ये लवकर येऊन त्याचे फायदे बागेस मिळतात.


२) शेंडा वेगाने वाढणे -
बऱ्याचशा बागेत सध्याच्या वातावरणामुळे शेंडा वाढ जास्त प्रमाणात दिसून येते. या वेळी वेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण कमी होऊन जिबरेलिन्सची मात्रा जास्त प्रमाणात वाढते. यामुळे शाकीय वाढ तितक्याच जोमाने होताना दिसते. परिणामी पेऱ्यातील अंतर वाढते, बगलफुटी जोमात निघणे व शेंडा वाढ जास्त होणे इ. बाबी दिसून येतील. या वाढत असलेल्या कॅनोपीमुळे पुढील भागात गर्दी निर्माण होईल. जसजशी काडी तळापासून १२ ते १३ डोळ्याच्या पुढे जोमाने वाढू लागते, तशी तिची परिपक्वता लांबणीवर जाईल.

अशी अपरिपक्व काडी कापून बघितल्यास ती पोकळ दिसेल. त्यात कापसासारखा द्रव जमा झालेला दिसेल. जास्त वाढू दिलेल्या कॅनोपीमुळे ही परिस्थिती निर्माण होते. या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा मुळीच राहत नाही. पुढील काळात फळछाटणी केल्यानंतर त्या डोळ्यामधून फक्त गोळीघड बाहेर पडेल किंवा त्या डोळ्याचे रूपांतर बाळीमध्ये (टेन्ड्रील) होईल. शेंड्याकडे निघालेल्या नवीन फुटीवर करपा व जिवाणूजन्य करपा, डाऊनी मिल्ड्यू सारख्या रोगाचा प्रादुर्भाव सहजपणे वाढेल.

करपा रोगासाठी कारणीभूत रोगकारक घटकांनी एकदा काडीमध्ये प्रवेश केल्यास फळछाटणीनंतर निघालेली नवीन फुटीवर व त्या सोबत निघालेल्या द्राक्षघडावरही रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जास्त प्रादुर्भाव झालेल्या स्थितीमध्ये फुटींची वाढ होत नाही व घडाचा विकासही थांबतो. यावर मात करण्यासाठी शेंडा पिंचिंग करणे, बगलफुटी काढणे, फुटी तारेवर बांधून घेणे इ. उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

पोषक वातावरण असल्यामुळे रोगनियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर फायद्याचा राहील. मांजरी वाईनगार्ड २ मिलि किंवा बाजारात उपलब्ध असलेला ट्रायकोडर्मा ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या करून घ्याव्यात. या सोबत मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे ड्रेंचिंग करून घ्यावे. दहा दिवसाच्या अंतराने चार ते पाच वेळा ठिबकद्वारे ड्रेचिंग केल्यास रोग नियंत्रण सोपे होईल.


शेंड्याकडील फूट अनावश्यक असल्यामुळे या फुटीवर काडी परिपक्वतेच्या काळात बोर्डो मिश्रण पाऊण टक्के (कोवळी काडी असल्यास) ते एक टक्के (काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात) या प्रमाणे एक किंवा दोन फवारण्या करता येतील. यामुळे कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग येऊन ही पाने प्रकाश संश्लेषणास तितकी सक्षम राहणार नाहीत. परिणामी वाढ नियंत्रणात राहून अन्नद्रव्याचे नुकसान टळेल.


जमिनीत जास्त पाणी साचलेल्या स्थितीमध्ये काडी परिपक्वतेसाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता ठिबकद्वारे न करता फवारणीद्वारे केल्यास ०-०-५० चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन ते तीन फवारण्या करून घ्याव्यात. वाफसा आल्यानंतर ठिबकद्वारे ०-०-५० या विद्राव्य खतांची सव्वा किलो प्रति एकर या प्रमाणे आठ ते दहा दिवस उपलब्धता करावी. तसेच एसओपी सव्वा किलो प्रति एकर व त्या सोबत १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट, ६ ते ८ किलो फेरस सल्फेट जमिनीतून द्यावे.
--------------------------------
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT